No edit permissions for मराठी

TEXT 21

nirāśīr yata-cittātmā
tyakta-sarva-parigrahaḥ
śārīraṁ kevalaṁ karma
kurvan nāpnoti kilbiṣam

निराशी:- फलासक्तिरहित; यत-नियंत्रित केलेले; चित्त-आत्मा-मन आणि बुद्धी; त्यक्त-त्याग करून; सर्व-सर्व; परिग्रह:- जवळ असणाऱ्या वस्तूवर स्वामित्वाची जाणीव; शारीरम्-प्राणरक्षणाकरिता; केवलम्-केवळ; कर्म-कर्म; कुर्वन्-करीत असताना; -कधीच नाही; आप्नोति-प्राप्त करतो; किब्लिषम्-पापकर्म.

असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो, आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की, आपण भगवंतांचे अंश असल्याकरणाने, अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यात आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करवून घेत आहेत. जेव्हा हात हालचाल करतात तेवहा ते स्वत:च्या इच्छेने हालचाल करीत नाही तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्णभावनाभावित मनुष्य नेहमी भगवंतांच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो. कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते त्याप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्णभावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वत:चा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलांपासून मुक्तच राहतो. एखाद्या पशूप्रमाणेच त्याचा आपल्या स्वत:च्या शरीरावरही अधिकार नसतो. एखाद्या पशूचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावराची कधी कधी हत्या करतो, पण तरीही ते जनावर प्रतिकार करीत नाही. तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या  कृष्णभावनाभावित मनुष्याकडे भौतिक गोष्टींवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो. प्राणरक्षणाकरिता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वामामार्गाचा अवलंब करावा लागतो नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो.

« Previous Next »