No edit permissions for मराठी

TEXT 1

arjuna uvāca
sannyāsaṁ karmaṇāṁ kṛṣṇa
punar yogaṁ ca śaṁsasi
yac chreya etayor ekaṁ
tan me brūhi su-niścitam

अर्जुन:उवाच-अर्जुन म्हणाला; सन्न्यासम्-त्याग; कर्मणाम्-सर्व कर्मांच्या; कृष्ण-हे कृष्ण; पुन:-पुन्हा; योगम्-भक्तिपूर्ण सेवा; -सुद्धा; शंससि-तुम्ही प्रशंसा करीत आहात; यत्-जे; श्रेय:-अधिक लाभप्रद; एतयो:-या दोहोंपैकी; एकम्-एक; तत्-ते; मे-मला; ब्रूहि-कृपया सांगा; सु-निश्चितम्-निश्चितपणे.

अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता, या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का?

तात्पर्य: भगवद्गीतेच्या या पाचव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे, कारण भक्ती दिव्यस्वरुपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. बुद्धियोग किंवा भक्तिद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की, ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहात नाही आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की, सर्व प्रकारच्या यज्ञकर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत, अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला. अर्जुनाला वाटते की, ज्ञानयुक्त सन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे. परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास त्याला वाटते की, ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मांपासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि सन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की, ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे.

« Previous Next »