TEXT 20
na prahṛṣyet priyaṁ prāpya
nodvijet prāpya cāpriyam
sthira-buddhir asammūḍho
brahma-vid brahmaṇi sthitaḥ
न-कधीच नाही; प्रहृष्येत्-हर्षित होतो; प्रियम्-प्रिय वस्तू; प्राप्य-प्राप्त झाल्यावर; न-होत नाही; उद्विजेत्-विचलित, उद्वेगित होतो; प्राप्य-प्राप्त झाल्यावर; च-सुद्धा; अप्रियम्-अप्रियाला; स्थिर-बुद्धि-स्थिर बुद्धी; असम्मूढ-मोहरहित; ब्रह्म-वित्-जो ब्रह्माला पूर्णपणे जाणतो; ब्रह्मणि-ब्रह्मामध्ये; स्थित:-स्थित.
जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत्विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो.
तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. पहिले लक्षण आहे की, तो स्वत:च्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की, आपण म्हणजे हे शरीर नाही तर आपण भगवंतांचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करीत नाही. मनाच्या या स्थिरतेला ‘स्थिरबुद्धी’ म्हटले जाते. म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीने समजून मोहित होत नाही तसेच देहाला शाश्वत मानीत नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही. या ज्ञानामुळे तो परम सत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो. तो, सर्व तर्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरुपस्थितीला पूर्णपणे जाणतो. यालाच ब्रह्म-साक्षात्कार असे म्हणतात. अशा स्थिरबुद्धीला कृष्णभावना म्हणतात.