TEXT 23
śaknotīhaiva yaḥ soḍhuṁ
prāk śarīra-vimokṣaṇāt
kāma-krodhodbhavaṁ vegaṁ
sa yuktaḥ sa sukhī naraḥ
शक्नोति-समर्थ आहे; इह एव- वर्तमान शरीरामध्ये; य:-जो; सोढम्-सहन करण्यास; प्राक्-पूर्वी; शरीर-शरीर; विमोक्षणात्-त्याग करणे; काम-इच्छा; क्रोध-आणि क्रोध; उद्भवम्-उद्भवणारा; वेगम्-आवेग; स:- तो; युक्त:-योगयुक्त; स:- तो; सुखी-सुखी; नर:-मनुष्य.
वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी, जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगत तो सुखी असतो.
तात्पर्य- जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. हे आवेग म्हणजे वाणीवेग, क्रोधवेग, मनोवेग, उदरवेग, जननेंद्रियांचे आवेग आणि जिह्वावेग होत. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यंाच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्ष:स्थळ क्षुब्ध होतात. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच, त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे.