TEXT 16
nāty-aśnatas tu yogo ’sti
na caikāntam anaśnataḥ
na cāti-svapna-śīlasya
jāgrato naiva cārjuna
न-कधीच नाही; अति-अतिशय; अश्नत:- खाणार्याचा; तु-परंतु; योग:- भगवंतांशी युक्त होणे; अस्ति-आहे; न-तसेच; च-सुद्धा; एकान्तम्-मुळीच; अनश्नत:-न खाणारा; न-तसेच; च-सुद्धा; अति-अतिशय; स्वप्न-शीलस्य-जो झोपतो; जाग्रत:- जो अतिशय जागरण करतो; न-नाही; एव-कधीच; च-आणि; अर्जुन-हे अर्जुना.
हे अर्जुना! जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही.
तात्पर्य: या ठिकाणी योगिजनांसाठी, आहार आणि निद्रा यांचे नियमन सांगितले आहे. अतिशय खाणे म्हणजे प्राणरक्षणाकरिता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाणे. मनुष्याला पशूंचे मांस खाण्यची आवश्यकता नाही, कारण अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात. मांसाहार हा रजोगुणामधील व्यक्तींसाठी असतो. म्हणून जे लोक मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले अन्न खातात, त्यांना केवळ दुषित पदार्थ खाल्यामुळे पापकर्मांची फळे भोगावी लागतात. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् - जो कोणी इंद्रियतृप्तीकरिता खातो, स्वत:साठी अन्न शिजविाते आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करीत नाही तो केवळ पापच खात असतो. जो पापभक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करतो तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही. श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे. कृष्णभावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करीत नाही. म्हणून कवेळ कृष्णभावनाभावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णता प्राप्त करू शकतो. जो मनुष्य स्वत:च्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे, कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो तो योगाभ्यास करू शकत नाही. कृष्णभावनाभावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो. जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात आणि यामुळेच त्याला जरूरीपेक्षा अधिक झोपावे लागते.जो चोवीस तासांपैकी सहा तासापेक्षा अधिक झोपतो तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे. तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो. असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही.