No edit permissions for मराठी

TEXT 15

yuñjann evaṁ sadātmānaṁ
yogī niyata-mānasaḥ
śāntiṁ nirvāṇa-paramāṁ
mat-saṁsthām adhigacchati

 युञ्जन-अभ्यास करून; एवम्-वर सांगितल्याप्रमाणे; सदा-निरंतर; आत्मानम्-शरीर, मन आणि आत्मा; योगी-योगी; नियत-मानस:- संयमित मनाने; शान्तिम्-शांती; निर्वाण- परमाम्-भौतिक जीवनाचा लय करून; मत्-संस्थाम्-आध्यात्मिक विश्‍व (भवगद्धाम); अधिगच्छति- प्राप्त करतो.

याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून, मन संयमित झालेला योगी, भौतिक जीवनाचा लय करून भगवद्धामाची (श्रीकृष्णांचे निवास) प्राप्ती करतो.

तात्पर्य: योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास असतो. भगवद्गीतेनुसार, जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्ती करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे, तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे ‘‘शून्यात’ प्रवेश नव्हे. हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे. भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाही. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मुनष्याला आध्यात्मिक विश्‍वात, भगवद्धामात प्रवेश करणे शक्य होते. भगवद्धामाचेही स्पष्ट वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवद्धाम म्हणजे असे ठिकाण आहे की, ज्या ठिकाणी सूर्य, चंद्र किंवा विद्युतशक्तीची मुळीच आवश्यकता नाही. भौतिक विश्‍वातील सूर्याप्रमाणेच आध्यात्मिक जगतातील सर्व ग्रहलोक हे स्वयंप्रकाशित आहेत. भगवंतांचे राज्य हे सर्वव्यापी आहे; परंतु आध्यात्मिक विश्‍व आणि त्यातील ग्रहलोक यांना ‘परमधाम’ असे म्हटले जाते.

     स्वत: भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे (मच्चित, मत्पर: मत्स्थानम्) ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंतत: त्यांच्या परमधामाची, कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. ब्रह्मसंहितेमध्ये (5.37) सांगण्यात आले आहे की, गोलोक एव निवसत्यखिलात्मभूत:- भगवंत जरी आपल्या गोलोक धामामध्ये नित्य निवास करीत असले तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्वव्यापी ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात. श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णुरुपात योग्य ज्ञानावाचून कोणीही आध्यात्मिक विश्‍वात (वैकुंठ लोकात) किंवा भगवंतांच्या शाश्‍वत धामात (गोलोक वृंदावन) प्रवेश करू शकत नाही. म्हणून कृष्णभावनायुक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये तल्लीन झालेले असते. (स वै मन: कृष्णपदारविन्दयो:) वेदांमध्येही (श्‍वेताश्‍वतरोपनिषद् 3.8) आपण पाहतो की, तमेव विदित्वाति मुतयुमेति-केवळ भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म -मृत्यूच्या चक्रातून पार पाडू शकतो. दुसर्‍या शब्दांत सांगावयाचे तर, योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसविण्यासाठी केलेली जादूगिरी किंवा शरीरिक कसरत नव्हे, तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय.

« Previous Next »