TEXT 31
sarva-bhūta-sthitaṁ yo māṁ
bhajaty ekatvam āsthitaḥ
sarvathā vartamāno ’pi
sa yogī mayi vartate
सर्व-भूत-स्थितम्—प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित; यः—जो; माम्—माझी; भजति— भक्तिभावाने सेवा करती; एकत्वम्-एकरूपत्वामध्ये, आस्थित:-स्थित झालेला; सर्वथा-सर्व प्रकारे; वर्त-मानः-स्थित होऊन; अपि-जरी; सः-तो; योगी—योगी; मयि-माझ्यामध्ये; वर्तते-राहतो.
जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो.
तात्पर्यः परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्रीविष्णूंना पाहात असतो. योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की, श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. या परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणा-या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही. तसेच, श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्णभावनाभावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्येही मुळीच भेद नाही. कृष्णभावनाभावित योगी, भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मामध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो. याला श्रील रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृतसिंधू (१.२.१८७) मध्ये पुष्टी देण्यात आली आहे. निखिलास्वप्यवस्थासु जीवसुतः स उच्यते-कृष्णभावनाभावित कर्म करणारा भगवद्भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो. नारदपंचरात्र याला पुष्टी देते:
दिक्कालाद्यानच्छिन्ने कृष्णे चेतो विधाय च |
तन्मयो भवति क्षिप्रं जीवो ब्रह्मणि योजयेत् ।।
‘‘सर्वव्यापी आणि देश-कालातीत श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते.'
कृष्णभावना म्हणजे योगाभ्यासातील परमोच्च समाधिस्थ अवस्था होय. श्रीकृष्ण हेच परमात्मारूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत, केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो. भगवंतांच्या या अचिंत्य शक्तीबद्दल वेद (गोपालतापनि उपनिषद् १.२१) पुढीलप्रमाणे सांगतात, एकोऽपि सन्बहुधा योऽवभाति—भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयांमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगण्यात आले आहे की:
एक एव परो विष्णु: सर्वव्यापी न संशय:।
ऐश्वयेद् रूपमेकं च सूर्यावत् बहुधेयते ।।
‘‘श्रीविष्णू हे एकच आहेत, तरीही निश्चितच ते सर्वव्यापी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत.’