No edit permissions for मराठी

TEXT 30

yo māṁ paśyati sarvatra
sarvaṁ ca mayi paśyati
tasyāhaṁ na praṇaśyāmi
sa ca me na praṇaśyati

यः—जो; माम्—मला; पश्यति-पाहतो; सर्वत्र-सर्वत्र; सर्वम्-सर्व; -आणि; मयि-माझ्या ठिकाणी; पश्यति-पाहतो; तस्य-त्याच्यासाठी; अहम्-मी; -नाही; प्रणश्यामि-मी दुरावतो किंवा अंतरतो; सः-तो, -सुद्धा; मे-मला; न-नाही; प्रणश्यति-मुकतो.

जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहते. अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहात असल्याचे दिसते; परंतु सर्व काही श्रीकृष्णांच्याच शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव असते. श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत, हेच कृष्णभावनेचे आधारभूत तत्व आहे. कृष्णभावना म्हणजे कृष्णप्रेमाची परिपक्वता होय आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे. आत्मसाक्षात्काराच्या अतीत, या कृष्णभावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो, अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व होतात आणि भक्त कृष्णप्रेममय होतो. त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. श्रीकृष्णांमध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे. भक्त असा धोका पत्करीत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की, (५.३८)

प्रेमाञ्जनच्छुरित भक्तिविलोचनेन
सन्त: सदैव हृदयेषु विलोकयन्ति ।
यं श्यामसुन्दरमचिन्त्यगुणस्वरुपं ।
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि।

          ‘‘मी आदिपुरुष श्रीगोविंदांना प्रणाम करतो ज्यांना भक्त प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या रूपामध्ये पाहिले जाते.’’

          या अवस्थेत, भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाहीत, तसेच भक्तही भगवंतांच्या दृष्टीआड होत नाही. हृदयास्थित परमात्म्याला पाहणार्या योगीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. असा योगी विशुद्ध भक्त बनतो आणि स्वतःच्या ठायी भगवंतांना पाहिल्याविना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही.

« Previous Next »