No edit permissions for मराठी

TEXT 44

pūrvābhyāsena tenaiva
hriyate hy avaśo ’pi saḥ
jijñāsur api yogasya
śabda-brahmātivartate

पूर्व-पूर्वीच्या; अभ्यासेन-अभ्यासाने; तेन-त्यामुळे; एव-खचितच; ह्रियते -आकर्षित होतो; हि-खात्रीने; अवश:-आपोआपच; अपि-सुद्धा; सः-तो; जिज्ञासुः-जिज्ञासू; अपि-जरी; योगस्य -योगाचे; शब्द-ब्रह्म-शास्त्रातील कर्मकांड; अतिवर्तते-अतीत होतो.

आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो.

तात्पर्य: उन्नत योगिजन, शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाहीत; परंतु ते योगाची पूर्णता असणा-या कृष्णभावनेप्रत उन्नत करणा-या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात. प्रगत योगी व्यक्तींना वैदिक कर्मकांडाबद्दल असणा-या उपेक्षेसंबंधी श्रीमद्भागवतात (३.३३.७) सांगण्यात आले आहे की:

अहो बत श्र्वपचोऽतो गरीयान्‌ यज्जिह्वाग्रो वर्तते नाम तुभ्यम्‌ ।
तेपुस्तपस्ते जुहुवु: सस्तुरार्या ब्रह्मानूचर्नाम गृणत्ति ये ते ।।

          ‘‘हे भगवन्! जे तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करतात, ते जरी चांडाळ कुळात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात. तुमचे कीर्तन करणा-या व्यक्तींनी निःसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहेत, सर्व तीर्थस्नाने केली आहेत, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे.’’

यासंबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचा प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला. हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लीम कुळामध्ये झाला तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य या पदावर आरूढ केले, कारण हरिदास ठाकूर हे दररोज तीन लाख भगवन्नामांचा जप करण्याचे व्रत कठोरपणे पालन करीत असत: हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ते निरंतरपणे हरिनामाचा जप करीत असल्याकारणाने जाणले पाहिजे की, आपल्या पूर्वजन्मात त्यांनी शब्द-ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणा-या सर्व वैदिक कर्मकांडांचे आचरण केले आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो कृष्णभावनेच्या तत्वांचा स्वीकार करूच शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही.

« Previous Next »