TEXT 2
adhiyajñaḥ kathaṁ ko ’tra
dehe ’smin madhusūdana
prayāṇa-kāle ca kathaṁ
jñeyo ’si niyatātmabhiḥ
अधियज्ञ:-यज्ञांचा अधिपती; कथम्-कसे; कः-कोण; अत्र-येथे; देहे-देहामध्ये; अस्मिन - या, मधुसूदन-हे मधुसूदना; प्रयाण-काले-मृत्यूसमयी; च-आणि; कथम्-कसे; ज्ञेयः असि– तुम्हाला जाणता येते; नियत-आत्मभिः—आत्मसंयमीद्वारे.
हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात?
तात्पर्य: यज्ञाधिपती असे इन्द्राला किंवा श्रीविष्णूंनाही संबोधले जाऊशकते. श्रीविष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व आदिदेवतांचे प्रमुख आहेत. इंद्र आणि श्रीविष्णू दोघांचीही यज्ञाद्वारे उपासना केली जाते, पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहे की, वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करीत आहे.
श्रीकृष्णांनी मधू नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे. वास्तविक हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावयास नको होते, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता. म्हणून हे संशय असुरासारखे आहेत. श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना मधुसूदन म्हणून संबोधित आहे, जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करतील.
या श्लोकातील प्रयाण-काले हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते. कृष्णभावनेमध्ये अविरतपणे युक्त असणा-या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे. मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते? मृत्यूसमयी सर्व शारीरिक कार्ये विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकूळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की, 'हे भगवन्! आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलांमध्ये प्रवेश करू शकेल.' या ठिकाणी हे रूपक योजिले आहे, कारण राजहंसाला कमलपुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळांच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते. महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात की, 'आता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे; मला जर आता तुमच्या चरणकमलांचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर, निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल; परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर, माझे काय होईल हे मला कळत नाही. कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्ध होईल आणि मी तुमचा नाम-जप करू शकणार नाही. म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे.'मृत्यूसमयी श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारीत आहे.