No edit permissions for मराठी

TEXT 1

arjuna uvāca
kiṁ tad brahma kim adhyātmaṁ
kiṁ karma puruṣottama
adhibhūtaṁ ca kiṁ proktam
adhidaivaṁ kim ucyate

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; किम्-काय; तत्-ते; ब्रह्म—ब्रह्म; किम्-काय; अध्यात्मम्-आत्मा; किम्-काय; कर्म-सकाम कर्म; पुरुष-उत्तम-हे पुरुषोत्तम; अधिभूत-प्राकृत सृष्टी; -आणि; किम्-काय; प्रोक्तम्—म्हटले जाते; अधिदैवम्-देवता; किम्—काय; उच्यते-म्हटले जाते.

अर्जुनाने विचारले: हे पुरुषोत्तम, हे भगवन्!ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? आणि देवता कोण आहेत? हे कृपया मला सांगा.

तात्पर्य: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या, ब्रह्म काय आहे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच भगवंत, कर्म (सकाम कर्म), भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचे स्पष्ट विश्लेषण करतात. श्रीमद्भागवत् सांगते की, परम सत्य हे ब्रह्म, परमात्मा, भगवान म्हणून जाणले जाते. याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे. अर्जुनाने आत्म्याबद्दलही विचारणा केली आहे. वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द, मन, शरीर आणि इंद्रियांनाही उद्देशून योजिला जातो.

          अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे, अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारीत नव्हता तर परमपुरुष, पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारत होता, कारण त्याला माहीत होते की, श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत.

« Previous Next »