No edit permissions for मराठी

TEXT 21

avyakto ’kṣara ity uktas
tam āhuḥ paramāṁ gatim
yaṁ prāpya na nivartante
tad dhāma paramaṁ mama

अव्यक्त:-अव्यक्त; अक्षरः-अच्युत किंवा अविनाशी; इति-याप्रमाणे; उत्त:-म्हटले जाते; तम्—त्याला; आहु-जाणतात; परमाम्—परम; गतिम्—गती किंवा लक्ष्य; यम्—जे; प्राप्य— प्राप्त केल्यावर; -कधीच नाही; निवर्तन्ते-परत येत नाही; तत्-ते; धाम-धाम; परमम्‌-परम; मम-माझे.

वेदान्ती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमलक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय.

तात्पर्य: ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणि-धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचिलेल्या प्रासादांनी पूर्ण युक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवितात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्रीगोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुवादन करीत असतात. (वेणु क्वणन्तमू) त्यांचे दिव्य रूप हे सा-या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे, त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की, त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात, त्यांच्या कंठी वैजयंती माला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वत:च्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदांमध्येही (कठोपनिषद् १.३.११) सांगण्यात आले आहे की, भगवद्धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परमलक्ष्य आहे. (पुरूषान्न  परं किञ्चित्सा काष्ठा परमा गति.) जेव्हा मनुष्याला भगवद्धामाची प्राप्ती होते, तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मकदृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिणपूर्व दिशेला ९० मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले त्या वेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या; वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्याचे क्षेत्रफळ चौ-यांशी मैल आहे.

« Previous Next »