No edit permissions for मराठी

TEXT 28

vedeṣu yajñeṣu tapaḥsu caiva
dāneṣu yat puṇya-phalaṁ pradiṣṭam
atyeti tat sarvam idaṁ viditvā
yogī paraṁ sthānam upaiti cādyam

वेदेषु-वेदाध्यनामध्ये; यज्ञेषु-यज्ञ करण्यामध्ये; तपःसु-विविध प्रकारच्या तपस्या करण्यामध्ये; -सुद्धा; एव-खचितच; दानेषु-दान देण्यामध्ये; यत्-जे; पुण्य-फलम्-पुण्यफल; प्रदिष्टम्-सांगितले आहे; अत्येति-मागे टाकते; तत् सर्वम्-ते सर्व; इदम्-हे; विदित्वाजाणल्यावर; योगी—भक्त; परम्—परम; स्थानम्—धाम; उपैति—प्राप्त करतो; —सुद्धा; आद्यम्-आद्य किंवा मूळ.

जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम, शाश्वत धामाची प्राप्ती होते.

तात्पर्य: हा श्लोक म्हणजे, विशेषकरून सातव्या आणि आठव्या अध्यायांत वर्णन करण्यात आलेल्या कृष्णभावनामृताच्या भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचा-याने आध्यात्मिक गुरूच्या गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरूला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरूच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद दिवशी गुरूने त्याला भोजनाकरिता बोलाविले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्यव्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत.

          शिष्याने गुरूच्या मार्गदर्शनाखाली पाच ते वीस वर्षांपर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययन हे आरामखुर्चीत बसून गप्पा मारणा-या तत्वज्ञान्यांसाठी नसून चारित्र्यनिर्मितीकरिता असते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचा-याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात, जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश-काल-परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला, अरण्यवास, वल्कले धारण करणे, अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य, जीवनाच्या सिद्धावस्थेप्रत उन्नत होतो. त्यापैकी काहीजण स्वर्गलोकाप्रत उत्रत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठलोकात किंवा कृष्णलोकात मुक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे.

          परंतु कृष्णभावनेचे सौंदर्य यातच आहे की, भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो.

          इदम् विदित्व हे शब्द दर्शवितात की, भगवद्गीतेच्या सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सात्रिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजेत. सातवा अध्याय ते बारावा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले सहा अध्याय आणि शेवटचे सहा अध्याय म्हणजे मधल्या सहा अध्यायांवर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील सहा अध्याय भगवंतांनी विशेषकरून सुरक्षित ठेवले आहेत. भक्तांच्या सत्संगामध्ये, भगवद्गीता, विशेषतः मधील सहा अध्याय, जाणून घेण्याइतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो, कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्णभावनेद्वारे प्राप्त होऊ शकते.

          ज्याला भगवद्गीतेवर अल्पशीदेखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे, कारण चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात, इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्णभक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते, तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्णभावनाभावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची, गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होती.

या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘अक्षरब्रह्मयोग’ या आठव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous