TEXT 4
adhibhūtaṁ kṣaro bhāvaḥ
puruṣaś cādhidaivatam
adhiyajño ’ham evātra
dehe deha-bhṛtāṁ vara
अधिभूतम्-भौतिक सृष्टीः क्षरः-सतत परिवर्तन होणारी; भावः-प्रकृतीः पुरुषः-सूर्य आणि चंद्रासारख्या देवदेवतांचा समावेश असलेले विराटरूप; च-आणि; अधिदैवतम्-अधिदैव नामक; अधियज्ञः-परमात्मा; अहम्-मी (कृष्ण); एव-खचितच; अत्र-या; देहे-देहामध्ये; देह - भृताम् - देहधार्यांमध्ये; वर- श्रेष्ठ
हे देहाभृतांवर! निरंतर परिवर्तनशील असणा-या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे चंद्र-सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणा-या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी, पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाञ्च अधियज्ञ ( यज्ञांचा अधिष्ठाता ) असे म्हटले जाते.
तात्पर्य: भौतिक प्रकृती सतत बदलत असते. भौतिक देहामध्ये सामान्यतः सहा स्थित्यंतरे होतात-उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. या भौतिक प्रकृतीला आधिभूत असे म्हणण्यात येते. विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय होतो. देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणा-या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच आधिदैवत असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचे आंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. परमात्म्याला, अधियज्ञ असे म्हणतात आणि तो हृदयामध्ये स्थित असतो. या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेषकरून महत्वपूर्ण आहे, कारण या शब्दाद्वारे भगवंत निक्षून सांगतात की, परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही, परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारीच स्थित असतो आणि तो जीवाच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्यांच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचे कार्य हे, भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणा-या विशुद्ध भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजते. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे, अधिदैवताचे, ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते, कारण भगवंतांच्या परमात्मा रूपाचे ध्यान करण्याइतपत नवसाधक उन्नत झालेले नसतात. यास्तव नवसाधकांना भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत. त्याचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे आणि याचे शीर्ष म्हणजे उच्चतर लोक आहेत.