No edit permissions for मराठी

TEXT 2

rāja-vidyā rāja-guhyaṁ
pavitram idam uttamam
pratyakṣāvagamaṁ dharmyaṁ
su-sukhaṁ kartum avyayam

राज-विद्या-सर्व विद्यांचा राजा, सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ; राज-गुह्यम्-सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा, सर्व गुह्य ज्ञानामध्ये श्रेष्ठ; पवित्रम्-अत्यंत पवित्र; इदम्-हे; उत्तमम्-दिव्य; प्रत्यक्ष-प्रत्यक्ष अनुभवाने, अवगमम्—जाणता येणारे; धम्र्यम्—धर्म, सु-सुखम्—अत्यंत सुखकारक; र्तुम्— आचरण्यास; अव्ययम्-अविनाशी.

सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे.

तात्पर्य: भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या (सर्व विद्यांचा राजा) असे म्हणण्यात आले आहे, कारण हा अध्याय म्हणजे, यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांताचे आणि तत्वज्ञानाचे सार आहे. गौतम, कणाद, कपिल, याज्ञवल्क्य, शाण्डिल्य, वैश्वानर आणि वेदान्त सूत्रांचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्ववेत्ते आहेत. म्हणून तत्वज्ञानाच्या किंवा दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही. आता भगवंत सांगतात की, हा नववा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानाचा राजा आणि निरनिराळ्या तत्त्वज्ञानाच्या व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणा-या ज्ञानाचे सार आहे. हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे, कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होते.

          सामान्यत: लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते. त्यांचे शिक्षण बाह्यात्कारी ज्ञानापुरते मर्यादित असते. सामान्य शिक्षणासंबंधी सांगावयाचे झाल्यास, त्यामध्ये राजकारण, समाजशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो. पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालयेही आहेत; परंतु दुर्दैवाने आत्मतत्त्वाचे विज्ञान शिकविण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही. तरीही आत्मा हा शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे. आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही. असे असूनही आत्म्याला महत्त्व न देता शारीरिक गरजा भागविण्याला लोक अधिक महत्त्व देतात.

          भगवद्गीतेमध्ये विशेषकरून दुस-या अध्यायापासून आत्म्याच्या महत्त्वावर जोर दिलेला आहे. सर्वप्रथम भगवंत म्हणतात की, हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा अव्यय आहे. (अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण:) जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचे स्वरूप हे अव्यय, अविनाशी आणि शाश्वत आहे, केवळ हे जाणणे म्हणजे गुह्य ज्ञान होय. तथापि, इतक्यावरून आत्म्याचे निश्चयात्मक ज्ञान होत नाही. कधी कधी लोकांची अशी समजूत असते की, आत्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा शून्यावस्थेत राहतो आणि मग निराकार होतो; परंतु ही वस्तुस्थिती नाही. या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा, देहामधून मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा होऊ शकेल? तो सदैव क्रियाशील असतो. जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. म्हणून जीवात्म्यांच्या या क्रियांना राजविद्या अर्थात, परमगोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे.

          वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या सर्व क्रिया होत. पद्मपुराणात मनुष्याच्या पापकर्माचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि ही पापकर्मे म्हणजे, पापामागून पाप केल्याची फळेच असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पापकर्माच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात. उदाहरणार्थ, जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही, त्यासाठी काही काळ जावा लागतो. सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते, त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो. मग त्याला फुले आणि फळे लागतात. जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फुलाफळांचा उपभोग घेतात. त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्मेही फलद्रूप होतात. त्याकरिता काही काळ जावा लागतो. कर्मफलांच्या निरनिराळ्या अवस्था असतात. मनुष्याने पापकर्मे थांबविली असतील आणि त्या पापकर्माची फळे भोगणे शिल्लक असू शकते. काही पापे बीजरूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रप झालेली असतात व दु:ख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो.

          सातव्या अध्यायाच्या अठ्ठाविसाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्या मनुष्याने आपल्या पापकर्माचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म-परायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, जे वास्तविकपणे भगवद्भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत, ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात. या विधानाला पद्मपुराणात पुष्टी देण्यात आली आहे.

अप्रारब्धफल पाप कूट बीज फलोन्मुखम्
क्रमेणैव प्रलीयेत विष्णुभक्तिरतात्मनाम्‌।।

          जे भगवद्भक्तीमध्ये युक्त झाले आहेत, त्यांची सर्व कर्मफले, मग ती फलोन्मुख असोत किंवा बीजरूपामध्ये असोत, हळूहळूनष्ट होतात. भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे, म्हणून तिला पवित्रमू उत्तमम्-असे म्हणतात. उत्तम म्हणजे दिव्य होय, तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय. कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्माना प्राकृत कधीच समजू नये. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की, भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते.

          असे सांगितले जाते की, भक्तियोगाचे आचरण इतके परिणूर्ण आहे की, मनुष्याला परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की, जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे (हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।) अपराधरहित कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन करतेवेळी दिव्यानंद अनुभवास येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मषांपासून शुद्ध होतो. ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते. याशिवाय, जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्णभावनामृताच्या प्रसारकार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्वशिक्षणावर किंवा पूर्वपात्रतेवर अवलंबून असत नाही. हा मार्ग स्वतःमध्येच इतका पवित्र आहे की, केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते.

          वेदान्त सूत्रातही (३.२.२६) याचे वर्णन पुढील शब्दांत करण्यात आले आहे, प्रकाशश्च कर्मण्यभ्यासातू-भक्तियोग इतका प्रभावी आहे की, केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनींच्या पूर्वजीवनावरून पाहण्यास मिळते. नारद मुनी आपल्या पूर्वजन्मात दासीपुत्र होते, ते अशिक्षित होते तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता; परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत. कधी कधी ते स्वत: भक्तांची सेवा करीत असत. नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की:

उच्छिष्टलेपाननुमोदितो द्विजै:
सकृत्स्म भुञ्जे तदपास्तकिल्बिष:।
एवं प्रवृत्त्स्य विशुद्धचेतस-
स्तद्‌धर्म एवात्मरुचि: प्रजायते ।।

          श्रीमद्भागवताच्या या श्लोकामध्ये (१.५.२५) नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगतात. ते म्हणतात की, बाल्यावस्थेत महाभागवतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना, ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत. काही वेळा ऋषिमुनी आपले शेष अन्न पानावरच सोडत असत आणि ती पात्रे धुणा-या बालकाला शेष अत्राची चव घेण्याची इच्छा होई. म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत. यामुळे तो बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला. जसजसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसतसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले. महान भक्त अखंड भगवद्भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात. नारदांमध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला. नारद मुनी पुढे सांगतात की,

तत्रान्वहं कृष्णकथा: प्रगायताम्‌ ।
अनुग्रहेणाश्रृणवं मनोहरा:।
ता:श्रद्ध्या मेऽनुपदं विश्रृण्वत:
प्रियश्रवस्यंग ममाभवद्‌ रूचि:।।

साधूंशी सत्संग केल्याने नारदांनाही भगवंतांच्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली. व भक्ती करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून वेदान्त सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशश्च कमण्यभ्यासातू - मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो. यालाच 'प्रत्यक्षअसे म्हटले जाते.

          धर्म्यम्‌ शब्दाचा अर्थ धर्ममार्ग असा आहे. वास्तविकपणे नारद हे दासीपुत्र होते. त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हती. ते केवळ आपल्या मातेला साहाय्य करीत असत आणि सुदैवाने त्यांची माताही भक्तांची सेवा करीत असे. भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्माचे परमलक्ष्य त्यांना प्राप्त झाले, श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे (स वें पुसों परो धर्मे यतो भकिरधोक्षजे) सर्व धर्माचे परमलक्ष्य म्हणजे भक्ती होय. सामान्यत: धार्मिक लोकांना माहीत नसते की, सर्व धर्माची परमसंसिद्धी म्हणजे भक्तियोगाची प्राप्ती होय. आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये, आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे (वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव) सामान्यत: आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते; परंतु नारद कधीच आध्यात्मिक गुरूच्या आश्रमी गेले नाही आणि त्यांना वैदिक सिद्धांताचे शिक्षणही प्राप्त झाले नाही, तरीही त्यांना वेदाध्ययनाचे परमफल प्राप्त झाले. हा मार्ग इतका प्रभावी आहे की, धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परम सिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो. हे कसे शक्य आहे? वेदामध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे. आचार्यवान् पुरुषी वेद-जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते.

          भक्तिमार्ग हा अत्यंत सुखकारक आहे (सुखम्). का बरे? भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णो: हे विधी समाविष्ट असतात. म्हणून मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो. केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो. नंतर तो स्वादिष्ट भगवत्प्रसाद ग्रहण करू शकतो. कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे. मनुष्य अत्यंत दारिद्रयावस्थेतही भक्तियोगाचे आचरण करू शकतो. भगवंत सांगतात की, पत्रं पुष्पं फलं तोयं - भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात, मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो. जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे, एखादे फळ, फूल, पान किंवा थोडेसे पाणीही, मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात. याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात. भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या केवळ तुलसीपत्र चाखण्याने सनतकुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवद्भक्त झाले. म्हणून भक्तिमार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि त्याचे आचरण सुखाने करता येते. भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात.

          या ठिकाणी असे सांगितले आहे की, भक्ती ही शाश्वत आहे. मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्तिमार्ग नाही. कधी कधी जरी त्यांनी तथाकथित भक्तिमार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की, जोपर्यंत ते मुक्त होत नाहीत तोपर्यंत ते भक्तिमार्गाचे आचरण करतील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते 'परमेश्वराशी एकरूपच'होतील. अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही. वास्तविक भक्ती, मुक्तीनंतरही सुरुच राहाते. जेव्हा भक्त, आध्यात्मिक जगतामध्ये भगवद्धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो. तो भगवंतांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत नाही.

          भगवद्गीतेवरून कळून येईल की, मोक्षानंतरच वास्तविक भक्तीचा प्रारंभ होतो. मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्म-भूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो. (समः सर्वेषु भूतेषु मद्‌भक्तिं  लभते पराम्‌) कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टागयोग किंवा इतरकोणत्याही योगांचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. या योग पद्धतींद्वारे मनुष्य भक्तियोगाप्रत थोडीफार प्रगती करू शकतो; परंतु भक्तियोगाच्या अवस्थेप्रत आल्याविना भगवंत काय आहेत हे मनुष्याला जाणता येत नाही. श्रीमद्भागवतातही सांगण्यात आले आहे की, भक्तियोगाचे आचरण करून, विशेषतः साक्षात्कारी महात्म्यांकडून श्रीमद्भागवताचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्ण-तत्व किंवा भगवत्-तत्व जाणणे शक्य आहे. एवम् प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगत:-जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टींपासून चित्तशुद्धी होते, तेव्हा भगवंत म्हणजे काय आहेत हे जाणू शकतो. याप्रमाणे कृष्णभावनाभावित भक्तिमार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे. हा भक्तियोग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि याचे आचरण विना-अडचण आनंदाने करता येते. म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे.

« Previous Next »