TEXT 31
kṣipraṁ bhavati dharmātmā
śaśvac-chāntiṁ nigacchati
kaunteya pratijānīhi
na me bhaktaḥ praṇaśyati
क्षिप्रम्-अत्यंत लौकरच; भवति-होतो; धर्म-आत्मा-धर्मात्मा किंवा सदाचारी; शाश्वत्शान्तिम्-शाश्वत शांती; निगच्छति-प्राप्त करतो; कौन्तेय-हे कौंतेय; प्रतिजानीहि-घोषित कर; न-कधीच नाही; मे-माझा; भक्त:-भक्त; प्रणाशयति-नष्ट होतो.
तो लौकरच धर्मात्मा (सदाचारी) होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते, हे कोंतेय! निर्भय हो आणि घोषणा कर की, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.
तात्पर्य: या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. सातव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की, दुष्कर्मी लोक भगवद्भक्त बनू शकत नाहीत. जो भगवद्भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण मुळीच असू शकत नाहीत. मग प्रश्न राहतो की, आकस्मिकपणे किंवा हेतूपूर्वक निंद्य कृत्ये करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो? असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे. सातव्या अध्यायात सांगितले आहे की, दुष्कर्मी लोक कधी भगवद्भक्तीचा स्वीकार करीत नाहीत आणि श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणताही सद्गुण नसतो. सामान्यत: नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मषांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो. तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पापपूर्ण दोष साहजिकच धुतले जातात. निरंतर भगवत् चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो. वेंदानुसार, असा एक निमय आहे की, जर कोणी उच्च स्थानापासून च्युत झाला तर त्याला स्वतःच्या शुद्धीकरिता काही विशिष्ट धार्मिक विधी करावे लागतात, परंतु येथे तर अशी काही अट घातलेली नाही, कारण भक्तांच्या हृदयात निरंतर भगव्स्मरणामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते. म्हणून हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/ हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राचे अखंडपणे कीर्तन चालू ठेवले पाहिजे. यामुळे सर्व आकस्मिक अध:पतनांपासून भक्ताचे रक्षण होईल. अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील.