No edit permissions for मराठी

TEXT 30

api cet su-durācāro
bhajate mām ananya-bhāk
sādhur eva sa mantavyaḥ
samyag vyavasito hi saḥ

अपि-सुद्धा; चेत्-जरी; सु-दुराचार:-अत्यंत निंद्य कर्म करणारा; भजते-भक्तीमध्ये युक्त झाला असेल तर; माम्-माझी; अनन्य-भाक्-अनन्य भावाने; साधुः-साधूः एव-निश्चितच; सः--तो; मन्तव्यः—समञ्जला पाहिजे; सम्यक्-पूर्णपणे; व्यवसितः-निश्चयी; हि-निश्चितच; सः-- तो.

जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो.

तात्पर्य: या श्लोकामधील सु-दुराचार: हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कमें असतात, एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमांनुसार राहणे, या संदर्भात निश्चितच निरनिराळी कमें असतात आणि भक्तांनासुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात व याच कर्माना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्णभावनेमध्ये अथवा भगवद्भक्तीमध्ये युक्त झाला आहे, त्याच्या कर्माना दिव्य कर्म म्हटले जाते. अशी कमें स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते. कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कमें एकमेकांशी समांतर चाललेली असतात; परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही. तो जाणतो की, आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्णभावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. तथापि, कधी कधी असे दिसते की, कृष्णभावनाभावित मनुष्य असे काही कर्म करतो, जे सामाजिक अथवा राजकीयदृष्ट्या अत्यंत धृणास्पद मानले जाते, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. श्रीमद्भागवतात सांगितले आहे की, मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पांपापासून त्याला मुक्त करतात. भौतिक विकास इतके प्रबळ आहेत की, भगव्‌तसेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात. परंतु कृष्णभावना ही त्याहूनही प्रबळ असल्याकारणाने अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्णभावना ही सदैव यशदायीच असते. एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरीत्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये. कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये स्थित होतो तेव्हा अशी प्रासंगिक अध:पतने यथासमय थांबविली जातात.

          म्हणून जो कृष्णभावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे। या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल; जरी त्याचे आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे. साधुरेव-हा शब्द महत्वपूर्ण आहे. हा शब्द अभक्तांना बजावतो की, आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये. जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरीही त्याला साधच समजले पाहिजे. मन्तव्यः- हा शब्द तर अधिकच महत्वपूर्ण आहे. जर एखाद्याने या र्नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर, त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे. अढळ दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे हीच एखाद्या भक्ताची योग्यता आहे.

नृसिंह पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे.

भगवति च हरावनन्यचेता
भृशमलिनोऽपि विराजते मनुष्य:।।
न हि शशकलुषच्छबि: कदाचित्‌
तिमिरपराभवतामुपैति चन्द्र:।।

          अर्थात, भगवद्भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्य कृत्ये करताना आढळला तरी त्याची कृत्ये म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही.

          त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की, दिव्य भगवद्भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारची निंद्य कृत्ये करू शकतो. या श्लोकामध्ये, भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणा-या अध:पतनांचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे. भक्ती करणे म्हणजे मायाशक्तीविरुद्ध युद्ध पुकारणे होय. जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्याइतपत मनुष्यामध्ये बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते; परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही. कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्ये करीत, अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये. जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे.

« Previous Next »