TEXT 7
sarva-bhūtāni kaunteya
prakṛtiṁ yānti māmikām
kalpa-kṣaye punas tāni
kalpādau visṛjāmy aham
सर्व–भूतानि—सर्व सृष्ट अभिव्यक्ती; कौन्तेय-हे कौंतेया; प्रकृतिम्—प्रकृती; यान्ति-प्रवेश करतात; मामिकाम्-माझ्या; कल्प-क्षये-कल्पाच्या अंती; पुन:-पुन्हा; तानि-ते सर्व; कल्पआदौ-कल्पाच्या आरंभी, विसृजामि-निर्माण करती; अहम्-मी.
हे कौतेया! कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी, माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो.
तात्पर्य: या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. कल्पक्षये म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर. ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे इतके असते आणि त्याचा एकदिवस हा पृथ्वीवरील ४,३००,०००,००० इतक्या वर्षांबरोबर असतो. त्याची रात्रही तितक्याच वर्षांची असते. त्यांच्या एका महिन्यात असे तीस दिवस आणि तीस रात्री असतात आणि एका वर्षात बारा महिने असतात. अशा शंभर वर्षांनंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो, म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते. नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते. वैदिक सूत सांगते की, बहु स्यामू-'भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात" (छांदोग्य उपनिषद् ६.२.३) भगवंत स्वत:ला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते.