No edit permissions for मराठी

उपोद्घात

ॐ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नम:॥

श्रीचैतन्यमनोऽभीष्टं स्थापितं येन भूतले ।
स्वयं रूप: कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् ॥

     माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे. मी त्यांना सादर प्रणाम करतो.

श्रील रूप गोस्वामी, ज्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरणकमलांचा आश्रय प्रदान करतील?

वन्देऽहं श्रीगुरो: श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च।
श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम् ॥
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं ।
श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च ॥

     माझे आध्यात्मिक गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरणकमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्ट, गोपाल भट्ट आणि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकमलांशी सादर प्रणाम करतो. मी भगवान कृष्णचैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना तसेच अद्वैत आचार्य, गदाधर, श्रीवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. मी श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सखीना सादर प्रणाम करतो.

हे कृष्ण करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते।
गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते॥

     हे श्रीकृष्णा! तुम्ही दु:खीजनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो.

     तप्तकाञ्चनगौरांगि राधे वृन्दावनेश्वरी।
     वृषभानुसुते देवि प्रणमामि हरिप्रिये ॥

     मी राधाराणीला प्रणाम करतो, जिची अंगकांती तप्त, द्रवरूप सुवर्णाप्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू वृषभानू राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्रीकृष्णांस तू अत्यंत प्रिय आहेस.

वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च।
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम:॥

     मी भगवंतांच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत.

     श्रीकृष्ण-चैतन्य   प्रभुनित्यानन्द।
     श्रीअद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द ॥

     श्रीकृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत, गदाधर, श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो.

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥

     भगवद्गीतेला गीतोपनिषदही म्हटले जाते. गीता ही वैदिक ज्ञानाचे सार, तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपनिषद आहे. अर्थात, भगवद्गीतेवर इंग्रजीमध्ये अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढीलप्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. नुकतेच एका अमेरिकन महिलेने मला इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादाची शिफारस करण्यास आग्रह केला. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्त्या अमेरिकत उपलब्ध आहेत. पण माझ्या पाहण्यात तरी, केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतातसुद्धा, जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृत्तीत भाष्यकाराने ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत न करता आपली स्वत:ची मते प्रदर्शित केली आहेत.

     भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे. आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशांनुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वत:च्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणूनच केला आहे. शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेलासुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात आले आहे. पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपण जाणले पाहिजे आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी (आध्यात्मिक गुरू) उदा. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्क, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वत:ला भगवद्गीतेमध्ये ‘पुरुषोत्तम श्रीभगवान’ म्हणून घोषित केले आहे. ब्रह्म-संहिता आणि इतर सर्व पुराणांनी, विशेषकरून श्रीमद्भागवत, जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते. कृष्णस्तु भगवान स्वयं - त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात, जशी सांगितली आहे, त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे.      भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात (4.1-3) भवगंत सांगतात की,

इमं विवस्वते योगं प्रोक्तावानहमव्ययम्।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत ॥

एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदु:।
स कालेनेह महता योगो नष्ट: परन्तप ॥

स एवायं मया तेऽद्य योग: प्रोक्त: पुरातन:।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥

     या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की, ही योगपद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वांत आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनूला, मनूने इक्ष्वाकूला आणि याप्रमाणे शिष्यपरंपेरनुसार, एक प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. या वेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभुमीवर सांगितली.

     अर्जुनाला ते सांगतात की, हे परम रहस्य त्याला सांगाण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे. याचा अर्थ असा आहे की, भगवद्गीता हा ग्रंथ विशेषकरून भगवद्भक्तांसाठी आहे. अध्यात्मवादी साधकांचे तीन प्रकार असतात-ज्ञानी, योगी आणि भक्त किंवा निर्विशेषवादी, ध्यानयोगी आणि भक्त. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की, ते त्याला नवीन गुरुशिष्यपरंपरेतील सर्वप्रथम श्रोता बनवीत आहेत कारण, जुनी परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून इतरांकडे चालत येणाऱ्या परंपरेमध्येच नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी, तसेच त्यांच्या शिकवणीचा नव्याने पुन:प्रचार अर्जुनानेच करावा अशी भगवंतांची इच्छा होती. यासाठीच आपण पाहू शकतो की, भगवद्गीतेचा उपदेश खासकरून अर्जुनालाच सांगण्यात आला. कारण अर्जुन हा भगवंतांचा भक्त, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच त्याने भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्या वेळी एखादा भगवंतांचा भक्त होतो त्या वेळी त्याचा भगवंतांबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्यात सांगायचे तर भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर पाच निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराने संबंध प्रस्थापित होऊ शकतो. ते पाच प्रकार असे आहेत:

1. एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो.

2. एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो.

3. एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो.

4. एखादा माता किंवा पिता या नात्याने असू शकतो.

5. एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो.

     अर्जुनाचा भगवंताबरोबर सखा या नात्याने संबंध होता. मात्र या सख्यभावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणाऱ्या मैत्रीमध्ये आत्यंतिक फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. वस्तुत: प्रत्येकाचा भगवंतांबरोबर विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधाची पुनर्जागुती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंतांचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यवधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंतांबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो आणि यालाच ‘स्वरुप’ असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वारे एखादा स्वरूपस्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो व यालाच ‘स्वरूपसिद्धी’ म्हणजे एखाद्याच्या मूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून, अर्जुन हा भक्त होता आणि त्याचा भगवंतांबरोबर सख्यभावामध्ये नित्य संबंध होता.

     अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला हे जाणणे आवश्यक आहे. त्याने केलेल्या स्वीकृतीची पद्धत दहाव्या अध्यायामध्ये (10.12-14) सांगितली आहे.

अर्जुन उवाच

परं ब्रह्म पंर धा म पवित्रं परमं भवान्।
पुरुष शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥

आहुस्त्वामृषय: सर्वे देवर्षि नारदस्तथा।
असितो देवलो व्यास: स्वयं चैव ब्रवीषि मे ॥

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्यक्तिंविदुर्देवा न दानवा:॥

     ‘‘अर्जुन म्हणाला: तुम्ही परम धाम, परम पवित्र आणि परम सत्य असे  पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्ही शाश्वत, अलौकिक, आदिपुरुष, अजन्मा आणि सर्वश्रेष्ठ आहात. नारद, असीत, देवल आणि व्यास इत्यादी महान ऋषीनीदेखील तुमच्या विषयीच्या या सत्याला मान्यता दिली आहे; आणि आता तुम्ही स्वत:ही मला हेच सांगत आहात. हे कृष्ण, तुम्ही मला जे सांगितले आहे, त्याचा मी पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकार करतो. हे भगवन, तुमचे स्वरूप दानव किंवा देवही जाणू शकत नाहीत.’’

     पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परम ब्रह्म म्हणून स्वीकारले. प्रत्येक जीव ब्रह्म आहे. पण परम-जीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परम-ब्रह्म आहेत. परम-धाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रयस्थान आहेत; पवित्रम् म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकारांपासून मुक्त आहेत; पुरुषम् म्हणजे ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत; शाश्वतम् म्हणजे मूळ; दिव्यम् म्हणजे अलौकिक; आदि-देवम् म्हणजे पुरुषोत्तम भगवान अजम् म्हणजे अजन्मा; आणि विभुम् म्हणजे सर्वश्रेष्ठ;

आता काहीजण विचार करतील की, कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे.पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखविण्यासाठी अर्जुन पुढील श्‍लोकात सांगतो की, श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर,नारद,असित, देवल आणि व्यासदेव इत्यादी थोर अधिकारी, महर्षीसुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्वीकारलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्वश्रेष्ठ महर्षी आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की, तुम्ही जे सांगत आहात त्याचा मी पूर्णसत्य म्हणून स्वीकार करतो. सर्वमतदृतं मन्ये - ‘‘तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो.’’ अर्जुन असेही सांगतो की, भगवंतांचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे आणि मोठमोठ्या देवतासुद्धा त्यांना जाणू शकत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की, मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांना कसे जाणू शकेल?

     यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वत:ला आपण श्रीकृष्णांच्या बरोबरीचे आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याने तात्त्विकदृष्ट्या तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो. जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही, तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे.

वास्तविक भगवद्गीता आहे तरी काय?     अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानवजातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो. अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकजण हा भौतिक जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. आपले अस्तित्वच मुळी ‘असत्’ वातावरणात आहे. खरे तर आपण असत् वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे. पण काही कारणासाठी आपल्याला असत् वातावरणात ठेवण्यात आले आहे.असत् म्हणजे ‘हे अस्तित्वात नाही ते.’

     दु:ख भोगणाऱ्या अनेक मनुष्यप्राण्यापैंकी जे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरुपाविषयी, म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परिस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे इत्यादी गोष्टींबद्दल जिज्ञासू असे फारच थोडे जण आहेत. आपण दु:ख का भोगतो, यासंबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, त्याचप्रमाणे आपल्याला ही दु:खे नको असून सर्व दु:खातून सुटका करून घेण्याची आपली इच्छा आहे, हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही, तर अशा मनुष्याला खरा मनुष्य समजता येणार नाही. या प्रकारची  जिज्ञासा एखाद्याने मनामध्ये उत्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसूत्रांमध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे; अथातो ब्रह्मजिज्ञासा - जोपर्यंत मनुष्याला परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा नसते तोपर्यंत त्याची सर्व कार्ये निष्फळ समजली पाहिजेत. म्हणून आपण दु:ख का भोगतो, आपण कुठून आलो आणि मृत्यूनंतर आपण कुठे जाणार या प्रश्‍नांबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहेत. प्रामाणिक शिष्याला भगवंतांविषयी पराकाष्ठेचा आदरभाव असणे हे सुद्धा आवश्यक आहे. अर्जुन हा असा एक प्रामाणिक शिष्य होता.

     जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूळ ध्येय विसरतो तेव्हा त्या ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात. आणि असे असूनही वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेकानेक व्यक्तींपैकी एखादाच खऱ्या अर्थाने स्वत:चे स्वरूप जाणू शकतो व अशा मनुष्यांसाठीच भगवद्गीता सांगितली आहे. खरे म्हणजे आपण सर्वांना अज्ञानाच्या वाघिणीने गिळंकृत केले आहे. पण भगवंत सर्व जीवांबद्दल विशेषेकरून मनुष्यप्राण्याबद्दल अत्यंत दयाळू आहेत. याच कारणासाठी त्यांनी आपला मित्र अर्जुन याला स्वत:चा शिष्य करून भगवद्गीता सांगितली.

     अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता. परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्याला जाणूनबुजून अज्ञानात टाकले गेले. त्यामुळे तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्‍न विचारु शकेल आणि ते मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील. अशा तर्‍हेने मनुष्य योग्य कृती करुन मनुष्यदेहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकेल.

     भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्त्वांबद्दलचे ज्ञान होय. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे आणि नंतर जीवात्म्याच्या स्वरुपस्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय व जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होत. मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्याला मूर्खच समजावे. जीव किमान आपल्या बद्धावस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो.अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ‘ईश्वर’ किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे. त्याचबरोबर ‘प्रकृती’ (जड प्रकृती), ‘काळ’ (अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची कालमऱ्यादा) आणि ‘कर्म’ यांचेही विवेचन गीतेमध्ये करण्यात आले आहे. हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे.सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात. ईश्वराचे स्वरूप काय, जीवात्म्यांची स्वरूपस्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्यांची कर्मे कोणती इत्यादी गोष्टींबद्दलचे ज्ञान आपण भगवद्गीतेपासून मिळविले पाहिजे.

     भगवद्गीतेतील पाच मूलभूत तत्त्वांपैकी परमेश्वर, कृष्ण, ब्रह्म, परम नियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. हे तत्त्व सर्वश्रेष्ठ आहे. गुणात्मकदृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे. उदाहरणार्थ, भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की, भौतिक प्रकृतीच्या सर्व काऱ्यावर परमेश्वराचे नियंत्रण असते. भौतिक प्रकृती स्वतंत्र नसून ती भगवंतांच्या आज्ञेचे पालन करीत असते, भगवान श्रीकृष्ण सांगतात की, -मयाध्येक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् - ही भौतिक प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली कार्य करीत आहे. ब्रह्मांडामध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. या सृष्टीमागे एक नियंत्रक आहे हे आपण जाणले पाहिजे. कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही. नियंत्रकच नाही असे समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ, एखादे लहान बालक मोटारगाडी पाहून विचार करील की, ही तर घोडा किंवा इतर प्राण्याशिवाय आश्चर्यकारकपणे चालते! पण बुद्धिमान मनुष्याला मोटारगाडीमागील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते. त्याला सदैव माहीत असते की अशा यंत्रामागे, यंत्र चालविणारा एखादा मनुष्य किंवा चालक असतोच. याचप्रमाणे परमेश्वर हा सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते. पुढील अध्यांयावरून आपल्याला कळेल की, परमेश्वराने जीवात्म्यांना आपले अंश म्हणून स्वीकारले आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजे सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंबसुद्धा खारट असतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे, आपल्यामध्येही परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्मरूपात विद्यमान असतात. कारण आपण सूक्ष्म, नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत. आणि अंतराळ किंवा ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णांमध्ये असल्यामुळेच आपल्याला देखील आहे. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की, आपण परम नियंत्रक नाही. भगवद्गीतेमध्ये हे स्पष्ट करून सांगितले आहे.

     भौतिक प्रकृती म्हणजे काय? भगवद्गीतेत तिला कनिष्ठ किंवा अपरा प्रकृती असे म्हटले आहे. जीवात्म्याला श्रेष्ठ किंवा परा प्रकृती असे म्हटले आहे. परा असो अथवा अपरा, प्रकृती ही नित्य नियंत्रित असते. प्रकृती ही स्त्रीवाचक आहे आणि पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पतीप्रमाणे भगवंत प्रकृतीवर नियंत्रक आहेत. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही भगवंतांच्या अधीन किंवा भगवंतांद्वारे नियंत्रित असतात. भगवद्गीतेनुसार जीवात्मे जरी भगवंतांचे अंश असले तरी त्यांना ‘प्रकृतीच’ मानण्यात येते. याचा भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. अपरेयम् इतस्त्वन्याम् प्रकृर्ती विद्धि मे पराम्। जीव भूताम-ही भौतिक प्रकृती माझी अपरा (कनिष्ठ) शक्ती आहे, पण याहून श्रेष्ठ अशी दुसरी प्रकृती आहे जीव भूताम् किंवा जीवात्मे

     सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणांनी युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे. तीन गुणांच्या पलीकडे काळ हे शाश्वत तत्त्व आहे आणि प्रकृतीचे गुण व शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण व देखरेखीखाली जी कार्ये चालतात त्यांना कर्म असे म्हणतात. ही कर्मे अनादिकाळापासून चालत आली आहेत व आपण आपल्या कर्मांनुसार सुख अथवा दु:ख भोगीत असतो. उदाहरणार्थ, मी एक व्यापारी आहे आणि चातुऱ्याने व कष्टाने बँकेत मी पुष्कळ रक्कम ठेवली आहे, तर मी त्या धनाचा भोक्ता ठरतो. पण समजा मी जर व्यापारात माझे धन गमावून बसलो तर मी दु:ख भोगतो. याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफलामुळे सुखी अथवा दु:खी होतो. याला ‘कर्म’ असे म्हणतात.

     भगवद्गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या सर्वांचे विस्तृत वर्णन दिले आहे. या पाच तत्त्वांपैकी ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहेत. प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असू शकेल, पण ती मिथ्या किंवा खोटी नाही. काही तत्त्वज्ञानांच्या मते प्रकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे, पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्त्वज्ञानाप्रमाणे हे चूक आहे. भौतिक विश्‍वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य, परंतु तात्पुरते समजले जाते. याची तुलना आकाशात इतस्तत: फिरणाऱ्या मेघाबरोबर किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षाऋतूबरोबर करण्यात आली आहे. वर्षाऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात अणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात, त्याचप्रमाणे ही भौतिक प्रकृती काही ठरावीक कालावधीसाठी प्रकट होते, थोड्या काळाकरिता टिकून राहते व कालांतराने नाहीशी होते. याप्रमाणे भौतिक  प्रकृतीचे कार्य चालते. पण हे चक्र नित्य सुरूच असते म्हणून प्रकृती ही मिथ्या नसून शाश्वत आहे. या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख ‘माझी प्रकृती’ म्हणून करतात. भौतिक प्रकृती ही भगवंतांची विभाजित शक्ती आहे. जीव देखील विभाजित नसले तरी भगवंतांचीच शक्ती आहेत व भगवंतांबरोबर  नित्य संबंधित आहेत. म्हणून ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे सर्व एकमेकांशी संबंधित तसेच शाश्वत आहेत. परंतु पाचवे तत्त्व कर्म हे नित्य नाही. कर्माची फळे अतिशय पुरातन असू शकतात. आपण आपल्या कर्मफलानुसार अनादिकाळापासून सुख अथवा दु:ख भोगीत आहोत, पण आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेने कर्मफलांमध्ये बदल घडवून आणू शकतो. आपण विविध प्रकारच्या कर्मांमध्ये गुंतलो आहोत. त्यामुळे आपण कोणते कर्म केले पाहिजे की, ज्यामुळे आपण कर्माच्या क्रिया-प्रतिक्रियांपासून मुक्त होऊ शकतो, याचे ज्ञान आपल्याला नक्कीच नाही, परंतु याचे सुद्धा वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे.

     ईश्वराचे स्वरुप परमचैतन्यमय आहे. जीवात्मे हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चेतनामय आहेत. जीवात्मा आणि भौतिक प्रकृती या दोघांचेही वर्णन ‘प्रकृती’ असे करण्यात आले आहे आणि दोन्हीही तत्त्वे भगवंतांचीच आहेत. पण दोघांपैकी फक्त जीवातत्त्व चेतनायुक्त आहे. दुसरे प्रकृती तत्त्व चेतनारहित आहे आणि हाच या दोन्हींमधील फरक आहे. जीवप्रकृतीला यासाठीच श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण जीव हा ईश्वराप्रमाणेच चेतनामय आहे. ईश्वर परमचेतनामय आहे म्हणून एखादा असे म्हणू शकणार नाही की, जीवात्म्याकडे सुद्धा परमचेतना आहे. जीवात्मा पूर्णतेच्या कोणत्याही स्तरावर परमचैतन्यमय होऊ शकत नाही आणि तो परमचैतन्यमय होऊ शकतो असे सांगणारा सिद्धांत चुकीचा आहे. जीव चेतनामय असू शकतो, पण परमेचतनामय अथवा परिपूर्ण चेतनायुक्त असू शकत नाही.

     ईश्वर आणि जीव यामधील फरक भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल. ईश्वर आणि जीव हे ‘क्षेत्रज्ञ’, चेतनायुक्त आहेत. परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो तर ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीरांचा ज्ञाता असतो. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवाच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते, याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. असेही वर्णन करण्यात आले आहे की, परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ‘ईश्वर’ किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. जीवात्म्याला त्याच्या कर्माविषयी विस्मृती झालेली असते.सर्वप्रथम तो विशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट कर्मफलांमध्ये अडकून पडतो. ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो. जीव याप्रमाणे देहांतर करीत आपल्या पूर्वकर्मांची फळे भोगीत असतो. जीवात्मा जेव्हा सत्त्वगुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वत: कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो तेव्हा तो कर्मांमध्ये बदल घडवू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने तो आपले पूर्वकर्म बदलू शकतो. यावरून सिद्ध होते की, ‘कर्म’ हे शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की, ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या पाच तत्त्वांपैकी चार तत्त्वे शाश्वत आहेत. परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे.

     परमचेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की, ईश्वर आणि जीव दोघांचीही चेतना दिव्य आहे. जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे. चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परावर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो, त्याप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते;पण ईश्वराची चेतना भौतिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात की मायध्यक्षेण प्रकृति:- ज्या वेळी ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात त्या वेळी ते भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाहीत. त्यांच्यावर असा प्रभाव पडत असता तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयाबद्दल त्यांना बोलताच आले नसते. जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही, तोपर्यंत तो दिव्य जगताविषयी काहीही प्रतिपादन करू शकत नाही. म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित होत नाही. सद्यस्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणांमुळे दूषित झाली आहे. भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चेतनेचे शुद्धीकरण करण्यास शिकविते. शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे थांबवायची अजिबात गरज नसून, उलट त्या काऱ्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि अशा विशुद्ध कार्यांनाच भक्ती असे म्हणतात. भक्तियुक्त कर्मे सर्वसाधारण कर्माप्रमाणेच दिसतात. पण खऱ्या अर्थाने ती दोषपूर्ण नसतात. एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल की, भक्त सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करीत आहे, पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहीत नसते की, भक्त आणि भगवंतांची कार्ये ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थामुळे प्रदूषित झालेली नसतात. भक्त आणि भगवंत त्रिगुणातीत आहेत, परंतु आपण जाणले पाहिजे की, सद्यस्थितीत आपली चेतना दूषित झाली आहे.

     आपण भौतिक प्रकृतीमुळे अशुद्ध होतो तेव्हा आपल्याला बद्ध म्हटले जाते. स्वत:ला भौतिक प्रकृतीची निर्मिती समजून खोटी चेतना प्रदर्शित केली जाते. याला मिथ्या - अहंकार असे म्हणतात. देहात्मबुद्धीत रत असलेला स्वत:ची वास्तविक स्थिती जणू शकत नाही. मनुष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त करण्यासाठीच भगवद्गीता सांगितली गेली आणि भगवंतांकडून ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन या स्थितीत राहिला होता. आपण देहात्मबुद्धीतून मुक्त झालेच पाहिजे. कारण अध्यात्मवादी होण्याची ही पहिली पायरी आहे. ज्या मनुष्याला स्वतंत्र किंवा मुक्त होण्याची इच्छा आहे  त्याने हे जाणणे आवश्यक आहे की, तो म्हणजे हे भौतिक शरीर नव्हे. मुक्ती म्हणजे भौतिक चेतनेपासून स्वतंत्र होणे होय. श्रीमद्भागवतात देखील मुक्तीची व्याख्या देण्यात आली आहे. मुक्तिर्हित्वान्थारूपं स्वरूपेण व्यवस्थिति:- भौतिक जगातील अशुद्ध भावनेतून स्वतंत्र होणे व शुद्ध भावनेमध्ये स्थित होणे यालाच मुक्ती म्हटले जाते. भगवद्गीतेतील सर्व शिकवणुकीचा उद्देश य चेतनेचे जागृतीकरण करणे हाच होय. म्हणूनच गीतेच्या उपदेशाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला असे विचारतात की, तू शुद्ध भावनेत स्थित झालास की नाही? शुद्ध भावनेत स्थित होणे म्हणजे भगवंतांच्या आज्ञांचे पालन करणे होय. हे शुद्ध भावनेचे सारसर्वस्व आहे. आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपल्यात चेतना आधीपासून असतेच. तथापि, भौतिक प्रकृतीच्या निकृष्ट गुणांद्वारे प्रभावित होण्याचे आपल्यामध्ये आकर्षण असते. परंतु भगवंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे हे आकर्षण त्यांना प्रभावित करू शकत नाही. परमेश्वर आणि सूक्ष्म जीवात्म्यांमध्ये हाच फरक आहे.

ही चेतना किंवा भावना म्हणजे आहे तरी काय? ही भावना म्हणजे ‘‘मी आहे.’’ तेव्हा मी कोण आहे? अशुद्ध चेतनेच्या अमलाखाली ‘‘मी आहे’’ म्हणजे ‘‘जे काही मला  दिसते ते सर्व माझे आहे. मी भोगी आहे.’’ प्रत्येक जीवात्मा स्वत:ला भौतिक सृष्टीचा मालक व निर्माता समजत असतो व या भावनेवरच हे जग चालत असते. भौतिक भावनेचे दोन मानसिक भाग आहेत. एक म्हणजे मी निर्माता आहे व दुसरा म्हणजे मी भोगी आहे. परंतु वास्तविकपणे परमेश्वर हाच निर्माता व भोक्ता आहे आणि जीवात्मा हा परमेश्वरचा अंश असल्यामुळे तो निर्माता नाही व भोक्ताही नाही, तर एक सहयोगी आहे. जीवात्मा निर्माण केला जातो व भोगला जातो. उदहरणार्थ, यंत्राचा एक भाग पूर्ण यंत्राबरोबर सहयोग करतो; शरीराचा एखादा अवयव पूर्ण शरीराबरोबर सहयोग करतो. हात, पाय, डोळे इत्यादी सर्व शरीराचे विविध अवयव आहेत, परंतु ते वास्तविक भोक्ता नाहीत. उदर किंवा पोट भोक्ता आहे. पाय चालतात, हात भोजन करण्यास मदत करतात, दात चर्वण करतात आणि शरीराचे इतर सर्व अवयव उदरच्या संतुष्टीसाठी कार्य करीत असतात, कारण संपूर्ण शरीराच्या रचनेचे पोषण करणारे उदर हे प्रमुख अवयव आहे. म्हणून सर्व काही उदराला अर्पण केले जाते. मुळाला पाणी घालून झाडाचे पोषण केले जाते आणि उदरभरण करून शरीराचे पोषण केले जाते. कारण शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्व अवयवांनी सहयोग करून उदरास अन्नपुरवठा केलाच पाहिजे. याप्रमाणे परमेश्वर हा निर्माता आणि भोक्ता आहे आणि आपण गौण जीवात्मे असल्यामुळे सहकार्य करून त्याला संतुष्ट करणे हे आपले कर्तव्य ठरते. ज्याप्रमाणे पोटाने ग्रहण केलेले अन्न शरीराच्या इतर सर्व अवयवांना मदत करते त्याप्रमाणे असे सहकार्य आपल्याला खरोखर मदत करील. जर हाताच्या बोटांनी विचार केला की, पोटाला  अन्न देण्याऐवजी ते स्वत:च ग्रहण करावे, तर ती निराश होतील. सृष्टी आणि भोग करणारी सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे परमेश्वर, इतर जीव हे केवळ सहकारी असतात. जीवात्मे सहकाऱ्यानेच सुखी होऊ शकतात. त्यांच्यातील संबंध हा मालक आणि सेवक यांच्यातील संबंधाप्रमाणेच असतो. जर मालक पूर्णपणे संतुष्ट झाला तर सेवकही संतुष्ट होतो. म्हणून जीवात्म्यांमध्ये जरी निर्मिती करण्याची व भौतिक जगाचा भोग करण्याची प्रवृत्ती असली तरी वरील उदाहरणात स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी परमेश्वराला संतुष्ट केलेच पाहिजे. निर्मिती आणि भोग करण्याची प्रवृत्ती जीवांमध्ये असते कारण ती प्रवृत्ती भौतिक सृष्टीची निर्मिती करणाऱ्या परमेश्वरामध्येही आहे.

म्हणून, परमनियंत्रक ईश्वर, नियंत्रित जीव, विराट जगत, शाश्वत काळ आणि कर्म हे परम सत्याचे भाग आहेत असे भगवद्गीतेत सांगितले आहे. हे सर्व पूर्णपणे एकत्र आले की, त्या पूर्णत्वाला परम सत्य असे म्हणतात. हेच पूर्ण व परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण होत. त्यांच्या भिन्न शक्तींमुळेच सर्व काही प्रकट होत असते. ते स्वत: परिपूर्ण आहेत.

भगवद्गीतेमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, निर्विशेष ब्रह्मसुद्धा भगवंतांहून कनिष्ठ आहे. (ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्‌). ब्रह्मसूत्रात ब्रह्माची तुलना सूऱ्याच्या किरणांबरोबर करण्यात आली आहे. निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवंतांच्या शरीराचे देदीप्यमान किरण आहेत. निर्विशेष ब्रह्म तसेच परमात्मा यांचा आंशिक साक्षात्कार म्हणजे परम सत्याचा अपूर्ण साक्षात्कार होय. पंधराव्या अध्यायात दाखवून दिले आहे की, श्रीभगवान किंवा पुरुषोत्तम हे निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या आंशिक साक्षात्कार या दोघांच्याही पलीकडे आहेत. श्री भगवान यांना ‘सच्चिदानंद विग्रह’ असे म्हटले जाते. ब्रह्मसंहितेचा आरंभ पुढीलप्रमाणे होतो: ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानंद विग्रह:। अनादिरादिर्गोविन्द: सर्व कारण कारणम् ॥‘‘गोविंद, श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. ते सच्चिदानंद रूप असून आदिकारण आहेत.’’ निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सत् (नित्यत्व) स्वरुपाचा साक्षात्कार होय. परमात्मा साक्षात्कार म्हणजे सत्-चित् (शाश्वत ज्ञान) या स्वरुपाचा साक्षात्कार होय. परंतु भगवान श्रीकृष्ण यांचा साक्षात्कार म्हणजे सत्, चित् आणि आनंद (नित्य अस्तित्व, ज्ञान आणि आनंद) या तिन्ही स्वरुपाचा, पूर्ण विग्रह किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये साक्षात्कार होय.

     अल्पज्ञानी लोक परम सत्याला निर्विशेष मानतात, परंतु वैदिक शास्त्रांप्रमाणे परम सत्य म्हणजे एक दिव्य व्यक्ती आहे. नित्यो नित्यांना चेतनश्चेतनानाम् - (कठोपनिषद 2.2.13). ज्याप्रमाणे, आपण सर्व जीवात्म्यांना स्वत:चे स्वरुप आहे, त्याप्रमाणे परम सत्य सुद्धा अखेर एक व्यक्तीच आहे आणि या पुरुषोत्तम भगवंतांचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या इतर सर्व दिव्य स्वरुपाचा पूर्ण साक्षात्कार होय. परम सत्य निराकार नाही. जर ते निराकार किंवा दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूहून न्यून असते तर ते पूर्ण होऊ शकले नसते. पूर्णत्वात आपल्या अनुभवातील व अनुभवांपलीकडचे सर्व काही समाविष्ट असले पाहिजे. नाही तर त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही.

     परमेश्वर किंवा पुरुषोत्तम यांच्या शक्ती अमऱ्याद आहेत. (परास्य शक्तिर्विविधैव श्रुयते). आपल्या विविध शक्तींद्वारे भगवान श्रीकृष्ण कसे कार्य करतात याचे वर्णन देखील भगवद्गीतेमध्ये केले आहे. आपण राहात असलेले हे भौतिक किंवा दृश्य जगतही स्वत:मध्ये पूर्ण आहे, कारण सांख्य तत्त्वज्ञानानुसार ज्या चोवीस तत्त्वांचे हे भौतिक विश्व एक तात्पुरती अभिव्यक्तीआहे त्या चोवीस तत्त्वांची पूर्णपणे जुळवाजुळव करून या विश्‍वाच्या निर्वाहाकरिता पूर्ण साधने निर्माण करण्यात आली आहेत. या जगात कोणतीही वस्तू अनावश्यक नाही किंवा येथे आणखी एखाद्या वस्तूची गरजदेखील नाही. परम सत्याच्या शक्तींनी या सृष्टीचा कालावधी निश्‍चित केला आहे आणि तो कालावधी संपताच या अशाश्वत सृष्टीचा पूर्णत्वाच्या योग्य व्यवस्थेमुळे विनाश केला जातो. आंशिक जीवांना पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी उपयुक्त अशी साधने पूर्णरूपात उपलब्ध आहेत. तरी सुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचे कारण म्हणजे परमपूर्णाबद्दलचे अपूर्ण ज्ञान होय. म्हणून भगवद्गीतेत वेदविद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे.

वेदांत सांगितलेले सर्व ज्ञान अचूक आहे व हिंदू लोक वैदिक ज्ञानाला पूर्ण व अचूक मानतात. उदाहरणार्थ गाईचे शेण म्हणजे जनावराची विष्ठा आहे आणि स्मृती किंवा वैदिक शास्त्रानुसार, एखाद्याने जनावराच्या विष्ठेस स्पर्श केल्यास स्वत:ला शुद्ध करण्यासाठी त्याने स्नान करणे आवश्यक आहे. परंतु वैदिक शास्त्रांनुसार गाईचे शेण मात्र शुद्धीकारक मानले जाते. एखाद्याला या गोष्टीत विरोधाभास वाटेल. परंतु तसा वेदांचा आदेश असल्यामुळे त्याचे पालन करण्यात काहीच चूक नाही. अलीकडे आधुनिक विज्ञानानेसुद्धा सिद्ध केले आहे की, गाईच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण असतात. यासाठी वैदिक ज्ञान हे अचूक व संशयातीत असल्यामुळे पूर्ण आहे आणि भगवद्गीता हे वैदिक ज्ञानाचे सार आहे.

वैदिक ज्ञानामध्ये संशोधनाचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले संशोधन कार्य अपूर्ण असण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांद्वारे संशोधन करीत आहोत. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुशिष्य परंपरेमधून चालत आलेल्या पूर्ण ज्ञानाचाच आपण स्वीकार केला पाहिजे. ज्या परंपरेचा आरंभ सर्वश्रेष्ठ गुरु स्वत: भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून झाला आहे व अनेक आचार्यांद्वारे जी खाली चालत आली आहे अशा परंपरेमधील योग्य व्यक्तीकडूनच आपण ज्ञान मिळविले पाहिजे. अर्जुनाने शिष्य या नात्याने भगवान श्रीकृष्णांकडून गीतोपदेश ग्रहण केला आणि भगवंतांच्या कोणत्याही वचनाला विरोध न करता त्याने प्रत्येक गोष्ट स्वीकारली. भगवद्गीतेचा एक भाग स्वीकारायचा आणि दुसरा नाकारायचा असे आपण करू शकत नाही. वैयक्तिक मताप्रमाणे काहीही अर्थ न लावता, कोणताही भाग न गाळता व ग्रंथाच्या विषयवस्तूमध्ये स्वत:च्या लहरीप्रमाणे ढवळाढवळ न करता भगवद्गीता स्वीकारली पाहिजे. वैदिक ज्ञानाची सर्वाधिक परिपूर्ण कृती म्हणून गीता स्वीकारली पाहिजे. वैदिक ज्ञानाचा उगम दिव्य आहे आणि या ज्ञानाचे पहिले वचन साक्षात परमेश्वराच्या श्रीमुखातून बाहेर आले आहे. परमेश्वराच्या वचनांना अपौरूषेय असे म्हणतात कारण चार प्रकारच्या दोषांनी दूषित असलेल्या या भौतिक जगातील व्यक्तीच्या शब्दांपेक्षा भगवंतांची वचने अतिशय वेगळी आहेत. एक बद्ध जीव -
1. निश्चितपणे चुका करतो,
2. सतत भ्रमात असतो,
3. दुसऱ्यांना फसविण्याची इच्छा बाळगून असतो आणि
4. अपूर्ण इंद्रियांमुळे मऱ्यादित असतो.
     या दोषांमुळे साधारण मनुष्याला सर्वव्यापी ज्ञानाचे संपूर्ण निवेदन करणे शक्य नाही.

     दोषपूर्ण जीव वैदिक ज्ञान प्रदान करू शकत नाहीत. सर्वप्रथम हे ज्ञान ब्रह्मदेवाला हृदयामध्ये सांगण्यात आले. ब्रह्मदेव हा सृष्टीमधील पहिला जीव आहे आणि त्याने त्या मूळ रूपात या ज्ञानाची प्राप्ती भगवंतांकडून केली होती त्याच रूपात आपल्या पुत्रांना व शिष्यांना हे ज्ञान प्रदान केले. भगवंत हे परिपूर्ण असल्यामुळे भौतिक प्रकृतीच्या नियमांमध्ये बद्ध होण्यची शक्यताच नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने हे जाणणे आवश्यक आहे की, या सृष्टीतील सर्व गोष्टींचे भगवान हे एकमेव स्वामी आहेत आणि तेच मूळ निर्माते आहेत. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाचेही जनक आहेत. अकराव्या अध्यायामध्ये भगवंतांना प्रपितामह म्हणून संबोधण्यात आले आहे. कारण ब्रह्मदेवला पितामह असे सामान्यत: संबोधले जाते. भगवंत हे पितामह यांचे सुद्धा जनक आहेत. यासाठीच कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही गोष्टीवर स्वत:चा हक्क गाजवू नये आणि भगवंतांनी आपल्यासाठी जो हिस्सा काढून ठेवला आहे त्याच गोष्टींचा त्याने स्वीकार करावा.

     भगवंतांनी आपल्याकरिता जो वाटा बाजूला काढून ठेवला आहे त्याचा उपयोग आपण कसा करावा यची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. याचे वर्णन भगवद्गीतेमध्ये सुद्धा केले आहे. कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये सर्वप्रथम आपण लढू नये असे अर्जुनाने ठरविले होते. हा त्याचा स्वत:चा निर्णय होता. अर्जुनाने भगवंतांना सांगितले की, स्वत:च्या नातलगांना ठार मारून राज्य उपभोगण्याची आपली इच्छा नाही. हा निर्णय शारीरिक स्तरावर आधारित होता. कारण तो स्वत:ला शरीरच समजत होता आणि त्याचे भाऊ, भाचे, पुतणे, मेहुणे, आजोबा हे देह-संबंधी होते. म्हणून त्याला आपल्या शरीरिक गरजांची पूर्ती करणे आवश्यक आहे असे वाटत होते. अर्जुनाचा हा दृष्टिकोण बदलण्यासाठीच भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. सरतेशेवटी अर्जुन जेव्हा सांगतो की, ‘करीष्ये वचनं तव’ तुमच्या शब्दाप्रमाणे वागेन,’ तेव्हा तो भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करतो.

     या जगात मनुष्यांनी कुत्र्या-मांजंरांप्रमाणे भांडणे योग्य नाही. मनुष्यजीवनाचे महत्त्व जाणण्याइतपत आणि सामान्य पशूप्राणे भांडण्याचे नाकारण्याइतपत, मनुष्याने बुद्धिमान असणे आवश्यक आहे. मनुष्याने जीवनाचे ध्येय जाणले पाहिजे व हे जाणण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन वैदिक शास्त्रांमध्ये  केले आहे आणि त्याचे सार भगवद्गीतेमध्ये देण्यात आले आहे. वैदिक साहित्य हे जनावरांसाठी नसून मनुष्यांसाठी आहे. पशू इतर पशूंची हत्या करू शकतात, कारण त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्‍नच उद्भवत नाही, पण जर एखाद्या मनुष्याने स्वत:च्या अनियंत्रित जिह्वातृप्तीकरिता प्राण्याची हत्या केली तर तो निसर्गनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेस जबाबदार ठरतो. भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे असे विश्‍लेषण करण्यात आले आहे की, भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांनुसार तीन प्रकारची कर्मे असतात. उदाहरणार्थ, सत्त्वगुणातील कर्म, राजस, आणि तामस गुणातील कर्मे. त्याचप्रमाणे तीन प्रकारचा आहार उदाहरणार्थ, सत्त्वगुणयुक्त आहार, राजसिक आणि तामसिक गुणयुक्त आहार. या सर्वांचे स्पष्टपणे आणि विस्तृत रुपात विश्‍लेषण केले आहे आणि भगवद्गीतेतील आदेशाचा जर योग्य उपयोग आपण केला तर आपले संपूर्ण जीवन शुद्ध बनते. सरतेशेवटी आपण भौतिक विश्‍वाच्या पलीकडे असलेले आपले ऐच्छिक अथवा ईप्सित ध्येय गाठू शकतो.

(यद्गत्वा न निर्वतन्ते तद्धामं परमं मम्‌) या ईप्सित ध्येयालाच सनातन, शाश्वत किंवा दिव्य जगत म्हटले जाते. या भौतिक जगामध्ये सर्व काही क्षणभंगुर आहे हे आपण पाहू शकतो. याची निर्मिती होते, हे काही काळ स्थित राहते, काही अंशांची निर्मिती करते, क्षीण होते आणि शेवटी नाश पावते. हाच या भौतिक जगाचा नियम आहे. मग ते शरीर असो, फळ असो वा इतर काहीही असो. पण या क्षणिक जगतापलीकडेही दुसरे असे एक जग आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. ते जगत स्वरुपत: सनातन किंवा शाश्वत आहे. अकराव्या अध्यायामध्ये जीव तसेच भगवान दोघांनाही सनातन म्हणण्यात आले आहे. आपला भगंवंताशी निकटचा संबंध आहे आणि आपण सर्व म्हणजे, सनातन धाम, सनातन, श्रीभगवान आणि सनातन जीव गुणात्मकदृष्ट्या एकच असल्यामुळे भगवद्गीतेचा उद्देश हा आपले सनातन कार्य किंवा सनातन धर्म, जे सर्व जीवांचे शाश्वत कार्य आहे त्याची जागृती करून देणे हा आहे. आपण निरनिराळ्या प्रकारच्या तात्पुरत्या कार्यांमध्ये गुंतलो आहोत. आपण भगवंतांनी सांगितलेल्या कार्यांचा स्वीकार करतो, तेव्हा या सर्व कार्यांचे शुद्धीकरण होते. वास्तविक त्यालाच शुद्ध जीवन म्हटले जाते.

     ज्याप्रमाणे जीव हे सनातन आहेत त्याप्रमाणे भगवंत आणि त्यांचे दिवय धाम दोन्हीही सनातन आहेत व भगवंत आणि जीव त्यांचे सनातन धामामध्ये संयुक्तपणे मीलन होणे हे मानवी जीवनाचे पूर्णत्व आहे. जीव हे भगवंतांचे पुत्र असल्याकारणाने भगवंत जीवांबद्दल अत्यंत दयाळू आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत घोषित करतात की सर्व योनिषु... अहं बीजप्रद: पिता- मी सर्वांचा पिता आहे, अर्थात, ज्यांच्या त्यांच्या विविध कर्मानुसार सर्व प्रकारच्या योनींमध्ये जीव आहेत. पण भगवंत या ठिकाणी दावा करतात की, ते या  सर्वांचेच पिता आहेत. यासाठीच पतित आणि बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी तसेच त्यांना सनातन शाश्वत धामामध्ये पुन्हा बोलविण्यासाठी भगवंत अवतार घेतात. सनातन धामामध्ये प्रवेश केल्यामुळे जीव पुन्हा भगवंतांच्या सहवासात आपले शरीर प्राप्त करतात. स्वत: भगवान विविध अवतार धारण करतात किंवा आपल्या विश्‍वासू सेवकांना, पुत्र, पार्षद अथवा आचार्य म्हणून बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी पाठवितात.

     यावरून सिद्ध होते की, सनातन धर्म हा कोणत्याही भौगोलिक धर्माच्या पद्धतीपुरताच मऱ्यादित नसून, ते शाश्वत भगवंतांशी संबंध असणाऱ्या शाश्वत जीवांचे शाश्वत कार्य आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्म म्हणजेच जीवांचे शाश्वत कार्य होय. श्रीपाद रामानुजाचार्य सनातन शब्दाचा अर्थ असा सांगतात की,‘ज्याला आरंभही नाही आणि अंतही नाही.’ म्हणून ज्या वेळी आपण सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या प्रमाणाच्या आधारावर आपण समजले पाहिजे की, त्याला आरंभही नाही आणि अंतही नाही.

     इंग्रजी भाषेतील ‘रिलीजन’ (Relligion) शब्दा हा सनातन धर्म या शब्दापासून थोडा भिन्न आहे. ‘रिलीजन’ शब्दावरून ‘विश्‍वास’ या कल्पनेची जाणिव होते आणि विश्‍वास हा बदलू शकतो. एका विशिष्ट पद्धतीवर एखाद्याचा विश्‍वास असू शकतो आणि ती व्यक्ती विश्‍वास बदलून दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करू शकते. परंतु कधीच बदलू शकत नाही अशा काऱ्याला उद्देशून सनातन धर्म असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, पाण्यापासून द्रवरुपता जशी वेगळी करता येत नाही किंवा अग्नीपासून उष्णता जशी वेगळी करता येत नाही, त्याचप्रमाणे शाश्वत जीवाचे शाश्वत कार्य त्याच्यापासून (जीवापासून) अलग करता येत नाही. सनातन धर्म शाश्वत काळासाठी जीवाशी संलग्न आहे. म्हणून ज्या वेळी आपण ‘सनातन धर्माबद्दल’ बोलतो तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या प्रमाणावरून आपण निश्‍चितपणे जाणले पाहिजे की, त्याला आरंभ आणि अंत दोन्हीही नाही. ज्याला आदि-अंत काहीच नाही ते सांप्रदायिक असूच शकत नाही, कारण त्याला कोणत्याही प्रकारच्या बंधनाने सीमित करताच येत नाही. जे सांप्रदायिक पंथाचे आहेत ते सनातन धर्मालासुद्धा चुकीने सांप्रदायिक समजतील. परंतु आपण या विषयात सखोल ज्ञान प्राप्त केले व आधुनिक विज्ञानाच्या प्रभावामध्ये याचा विचार केल्यास आपल्याला आढळून येईल की, सनातन धर्म हा या जगातील नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील जीवांचा आहे.

     सनातन धर्माहून इतर ज्या धार्मिक श्रद्धा (संप्रदाय) आहेत त्यांना मानवीय इतिहासाच्या वृत्तांतामध्ये आरंभ असू शकतो, पण सनातन धर्माच्या इतिहासाला प्रारंभच नाही. कारण हा शाश्वतरीत्या जीवबरोबरच संलग्न असतो. जीवांना आदी आणि अंत नाही. अशी मते प्रमाणित शास्त्रे जीवांच्या संदर्भात सांगतात. गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की, जीवाचा कधी जन्मही होत नाही किंवा मृत्यूही होत नाही. तो शाश्वत आणि अविनाशी आहे. क्षणभंगुर भौतिक शरीराच्या विनाशानंतरसुद्धा तो अस्तित्वातच राहतो. सनातन धर्माच्या संकल्पनेबाबत विचार करताना, आपण धर्माचे स्वरुप मूळ संस्कृत शब्दाच्या अर्थावरून जाणणे आवश्यक आहे. ‘धर्म’ म्हणजे एखाद्या गोष्टीशी नित्य संबंधित असणारा गुण होय. आपण गृहित धरून चालतो की अग्नीबरोबर उष्णता आणि प्रकाश आहे आणि उष्णता व प्रकाश यांच्या शिवाय अग्नी हा शब्दच अर्थहीन आहे. याचप्रमाणे जीवाच्या अशा अनिवार्य भागाचा आपण विचार केला पाहिजे की, जो जीवाचा नित्य संबंधी भाग आणि गुण, म्हणजेच जीवाचा शाश्वत धर्म होय.

     ज्यावेळी सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रत्येक जीवाच्या स्वरुपाबद्दल विचारले त्या वेळी चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले की, जीवाचे स्वरुप अथवा वैधानिक स्थिती म्हणजे श्रीभगवान यांची सेवा करणे होय. आपण चैतन्य महाप्रभूंच्या विधानाचे जर विश्‍लेषण केले तर आपल्याला सहजपणे दिसून येईल की, प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाची सतत सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो आणि असे करताना जीवन उपभोगीत असतो. ज्याप्रमाणे सेवक मालकाची सेवा करीत असतो त्याचप्रमाणे खालच्या स्तरातील पशू मानवाची सेवा करीत असातत. ‘अ’ हा ‘ब’ मालकाची सेवा करतो, ‘ब’ हा ‘क’ मालकाची आणि ‘क’ हा ‘ड’ मालकाची सेवा करतो इत्यादी. याप्रमाणेच आपण पाहू शकतो की, एक मित्र दुसऱ्या मित्राची सेवा करतो, माता आपल्या पुत्रांची, पत्नी पतीची आणि पती आपल्या पत्नीची सेवा करतो इत्यादी. जर आपण या पद्धतीने जाणण्याचा प्रयत्न केला तर दिसून येईल की, समाजामध्ये सेवेच्या बाबतीत कोणताच अपवाद आढळून येणार नाही. एखादा राजकारणी, जनकल्याणार्थ सेवेची क्षमता वाढविण्याचा जाहीरनामा जनतेमध्ये प्रस्तुत करतो, म्हणून मतदार आपले मौल्यवान मत त्या व्यक्तीला समाजाची मौल्यवान सेवा करावी म्हणून देतात. दुकानदार ग्राहकांची आणि कारागीर भांडवलदाराची सेवा करतो. भांडलदार आपल्या कुटुंबाची सेवा करतो आणि कुटुंब, शाश्वत जीवाच्या शाश्वत सेवा क्षमतेप्रमाणे, राष्ट्राची सेवा करते. अशा रीतीने आपण पाहू शकतो की, कोणताही जीव एक दुसऱ्याची सेवा करण्यापासून अपवाद नाही आणि म्हणून आपण निर्धास्तपणे असा निष्कर्ष काढू शकतो की, सेवाभाव हा जीवाचा नित्य सहयोगी आहे आणि सेवा करणे हा जीवाचा सनातन धर्म आहे.

     तरीही मनुष्य विशिष्ट काळ आणि परिस्थितीप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या धर्माचा स्वीकार करतो आणि याप्रमाणे स्वत:ला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध किंवा इतर प्रकारच्या सांप्रदायिक पंथाचा मानतो, अशा ह्या उपाधी म्हणजे सनातन धर्म नव्हे. एखादा हिंदू, आपली श्रद्धा बदलून मुस्लीम किंवा एखादा मुस्लीम हिंदू अथवा ख्रिश्‍चन स्वत:ची श्रद्धा बदलून काहीही बनू शकतो इत्यादी. परंतु कोणत्याही परिस्थितीत धार्मिक श्रद्धा बदलल्याने जीवाचा, इतरांची सेवा करण्याचा हा शाश्वत गुणधर्म बदलूच शकत नाही. हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्‍चन हे कोणत्याही  परिस्थितीत कोणाचे ना कोणाचे तरी सेवक आहेतच. याप्रमाणे एखाद्या विशिष्ट धर्मावर श्रद्धा असणे म्हणजे त्या जीवाचा तो सनातन धर्म आहे असे नाही, तर सेवा करणे हाच जीवाचा सनातन धर्म आहे.

     खरे तर आपण सेवाभावामध्येच भगवंतांशी संबंधित आहोत. भगवंत सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत आणि आपण जीव त्यांचे सेवक आहोत. आपली निर्मिती ही त्यांच्या भोगासाठी झाली आहे आणि जर आपण भगवंतांच्या शाश्वत आनंदामध्ये सहभागी झालो तरच आपण आनंदी होऊ शकतो, याखेरीज आपण आनंदी होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शरीराचा कोणताही अवयव उदराशी सहकार्य केल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे कोणीच आनंदप्राप्ती करू शकत नाही. जीवाला भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा केल्यावाचून आनंदी होणे शक्यच नाही.

भगवद्गीतेमध्ये (7.20) देवदेवतांची सेवा किंवा पूजा करण्यास मान्यता नाही.

     कामैस्तैर्हृतज्ञाना:  प्रपद्यन्तेऽन्यदेवता:।
     तं तं नियममास्थाय  प्रकृत्या  नियता: स्वया ॥

     ‘‘ज्यांची बुद्धिमत्ता भौतिक विषयवासनायुक्त इच्छांनी हिरावून घेतली आहे, ते देवतांना शरण जातात आणि स्वत:च्या मताप्रमाणे विशिष्ट विधि-विधानांचे पालन करतात.’’ याठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भौतिक इच्छांनी प्रेरित झालेले लोक भगवान श्रीकृष्णांची पूजा न करता देवतांची पूजा करतात. जेव्हा आम्ही ‘कृष्ण’ नावाचा उल्लेख करतो तेव्हा ते नाव कोणत्याही  संप्रदायाला उद्देशून म्हणत नाही. कृष्ण म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भांडार किंवा आनंद सरोवरहोय आणि याची पुष्टी शास्त्राने केली आहे. आपण सर्वजण आनंदप्राप्तीसाठी धडपडत असतो, आनंदमयोभ्यासात् (वेदान्त सूत्र 1.1.12) भगवंतांप्रमाणेच जीव हे चेतनायुक्त आहेत, पण ते आनंदाच्या शोधात आहेत. भगवंत हे नित्य आनंदीच आहेत आणि जर जीवांनी त्यांचा संग केला तर जीवसुद्धा आनंदी होतात.

     अशा मर्त्य जगामध्ये, वृंदावनातील आनंदमयी लीला दाखविण्यासाठीच भगवंत अवतार घेतात. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळी  त्यांनी आपल्या गोपमित्र, गोपिका, वृंदावनातील निवासी आणि गायी यांच्याबरोबर ज्या लीला केल्या त्या पूर्ण आनंदमयी होत्या. वृंदावनातील सर्व निवासी श्रीकृष्णांशिवाय इतर काही जाणतच नव्हते. इतकेच नव्हे, तर भगवान श्रीकृष्णांनी आपले पिता नंद महाराज यांना इंद्रदेवाची पूजा करण्यापासून देखील परावृत्त केले कारण, त्यंाना ही वस्तुस्थिती दाखवून द्यायची होती की, लोकांनी कोणत्याही देवतांची पूजा करण्याची गरज नाही. त्यांनी भगवंतांचीच पूजा करणे आवश्यक आहे कारण त्यांचे अंतिम ध्येय भगवद्धामास जाणे हे आहे.

     भगवान श्रीकृष्णांच्या धामाबद्दल भगवद्गीतेमधील पंधराव्या अध्यायाच्या सहाव्या श्‍लोकामध्ये वर्णन आले आहे की (15.6)

न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक:।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम॥

     ‘‘माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्ती हे प्रकाशित करीत नाहीत. जे या परम धामात प्रवेश करतात, ते पुन्हा कधीच या भौतिक जगामध्ये परत येत नाहीत.’’

     या श्लोकामध्ये शाश्वत आकाशाबद्दल वर्णन करण्यात आले आहे. अर्थात आकाशाबद्दलची आपली संकल्पना भौतिक आहे आणि आकाशाचा विचार आपण सूर्य, चंद्र, तारे इत्यादींच्या संबंधता करतो. पण या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की, शाश्वत आकाशामध्ये चंद्र, सूर्य किंवा अग्नीची गरजच नाही. कारण आध्यात्मिक जग भगवंतांपासून निघणाऱ्या दिव्य किरणांमुळे म्हणजे ब्रह्मज्योतीमुळे प्रकाशित झालेले आहे. आपण महत्प्रयासाने इतर ग्रहांवर जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु या इतके भगवंतांच्या परम धामाला जाणणे अवघड नाही. या परम धामाला गोलोक असे म्हटले जाते. ब्रह्मसंहितेमध्ये (5.37) याचे अत्यंत सुंदर वर्णन करण्यात आले आहे. -गोलोक एव निवसत्यखिलात्मभूत: भगवंत नित्य गोलोकामध्ये निवास करतात, तरीसुद्धा या जगातूनही आपण त्यांना गाठू शकतो आणि यासाठीच भगवंत आपल्या मूळ ‘सच्चिदानंद विग्रह’ रुपामध्ये अवतीर्ण होतात. जेव्हा ते आपले स्वरुप प्रकट करतात तेव्हा ते कसे दिसतात याबद्दल तर्क करणे व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या काल्पनिक तर्क-वितर्कांना टाळण्यासाठीच भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा ते स्वत:च्या मूळ श्यामसुंदर रूपामध्ये अवतरित होतात. दुर्दैवाने ज्या वेळी भगवंत आपल्यापैकीच एक म्हणून अवतीर्ण होतात आणि एका मानवाप्रमाणेच लीला करतात, तेव्हा अल्पबुद्धी लोक त्यांचा उपहास करतात. परंतु असे असले तरी भगवंतांना आपण आपल्यापैकीच एक आहेत असे समजू नये. भगवंत स्वत: सर्व शक्तिमान असल्याने ते आपल्यासमक्ष स्वत:च्या मूळ रूपात प्रकट होऊन लीला करतात. त्यांच्या या लीला गोलोकामधील लीलांप्रमाणेच असतात.

     दिव्य आध्यात्मिक आकाशातील देदीप्यमान किरणांमध्ये अनंत ग्रहलोक आहेत. परमधाम कृष्णलोकामधून ब्रह्मज्योतीचे किरण उत्सर्जित होतात व या किरणांमध्ये आनंदमय, चिन्मय असे दिव्य ग्रहलोक तरंगत असतात. भगवंत सांगतात की, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक:। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम - जो या आध्यात्मिक दिव्य विश्वामध्ये जातो त्याला पुन्हा या भौतिक विश्वामध्ये येण्याची गरज नाही. भौतिक विश्वामधील चंद्रच काय, तर अत्युच्च अशा ब्रह्मलोकामध्ये जरी आपण पोहोचलो तरी आपल्याला जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि व्याधी या अवस्था आढळतात. भौतिक जगतातील कोणताही ग्रह या चार अवस्थांतून मुक्त नाही.

     जीव हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भ्रमण करीत असतात. पण ते आपल्या इच्छेनुसार कोणत्याही यंत्राच्या साहाय्याने प्रवास करू शकत नाहीत. आपल्याला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचे असल्यास त्यासाठी विशिष्ट पद्धती आहे. याचाही उल्लेख गीतेमध्ये करण्यात आला आहे. यान्ति देवव्रता देवान् पितृन् यान्ति पितृव्रता:- आंतरग्रहीय प्रवासासाठी यंत्राची आवश्यकता नाही. गीता सांगते की, यान्ति देवव्रत देवान् चंद्र, सूर्य आणि इतर उच्चस्तरीय ग्रहांना स्वर्गलोक म्हटले जाते. ग्रहमालिकांच्या उच्च, मध्य आणि निम्न अशा तीन निरनिराळ्या पातळ्या आहेत. पृथ्वी हा ग्रह मध्य पातळीवर येतो. भगवद्गीता आपल्याला कोणत्याही उच्चतर ग्रहावर (देवलोक) अत्यंत सहजपणे कसे जावे याबद्दल सांगते की, यान्ति देवव्रता देवान् एखाद्याने विशिष्ट ग्रहावरील विशिष्ट अशा देवतेची उपासना करावी आणि याप्रमाणे चंद्र, सूर्य किंवा इतर कोणत्याही उच्चतर ग्रहाची प्राप्ती करावी.

     तरीपण भगवद्गीता आपल्याला भौतिक जगातील कोणत्याही ग्रहावर जाण्याचा सल्ला देत नाही, कारण जरी भौतिक जगातील अत्युच्च अशा ब्राह्मलोकामध्ये आपण कोणत्याही यांत्रिक साधनाच्या साहाय्याने चाळीस हजार वर्षाचा प्रवास (आणि इतका दीर्घकाळ जगतो तरी कोण?) करून गेलो तरी आपल्याला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे भौतिक ताप आढळतीलच. परंतु जो सर्वोच्च अशा कृष्णलोकाची किंवा आध्यात्मिक विश्‍वातील इतर कोणत्याही ग्रहलोकाची प्राप्ती करतो त्याला हे भौतिक ताप त्या ठिकाणी आढळणारच नाहीत. आध्यात्मिक विश्‍वातील इतर ग्रहलोकांमध्ये जो सर्वोच्च लोक आहे त्याला गोलोक वृंदावन म्हटले जाते व हे आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण यांचे मूळ निवासस्थान आहे. हे सर्व ज्ञान भगवद्गीतमध्ये देण्यात आले आहे आणि यातील उपदेशाद्वारे आपण या भौतिक जगातून सुटून खऱ्या आनंदमयी अशा आध्यात्मिक विश्‍वातील जीवनाला सुरुवात कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे.

     भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायामध्ये भौतिक जगाचे वास्तविक वर्णन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी भगवंत सांगतात की,

ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥

     या ठिकाणी भौतिक जगाची तुलना एका वृक्षाशी केली आहे. त्याची मुळे वर आणि शाखा खाली आहेत. आपल्याला मुळे वर असणाऱ्या वृक्षाचा अनुभव आहे; जर मनुष्य नदीतीरावर किंवा तलावाच्या तीरावर उभा राहिला तर पाण्यामध्ये प्रतिबिंबीत झालेला वृक्ष त्याला उलटा दिसेल. अशा वृक्षाच्या फांद्या खाली तर मुळे वर दिसतील. याचप्रमाणे भौतिक जगत् सत्याची छाया आहे. छायेमध्ये सत्यता अथवा वास्तविकता नसते, पण छायेवरून आपल्याला सत्याच्या आणि वास्तविकतेच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते. वाळवंटामध्ये पाणी नसते, पण मृगजळावरून आपल्याला पाणी नावाची गोष्ट अस्तित्वात आहे याची जाण होते. भौतिक जगामध्ये पाण्याचा अभाव आहे, आनंदाचा अभाव आहे, पण पाणीरूपी वास्तविक आनंद हा आध्यात्मिक जगतामध्येच आहे.

     भगवंत आपल्याला वैकुण्ठजगताची प्राप्ती पुढील पद्धतीने करून घेण्याचे सुचवितात. (भगवद्गीता 15.5)

निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा:।
द्वन्द्वैर्विमुक्ता: सुखदु:खसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा: पदमव्ययं तत् ॥

     पदम् अव्ययं किंवा शाश्वत जगताची प्राप्ती फक्त जो निर्मानमोह आहे तोच करू शकतो. याचा अर्थ काय आहे? आपण सर्वजण विविध उपाधींच्या मागे लागलो आहोत. कुणाला साहेब बनायचे आहे, कुणाला मालक बनायचे आहे, कुणाला अध्यक्ष, तर कुणाला श्रीमंत, तर कुणाला राजा आणि कुणाला काय बनण्याची इच्छा असते. जोपर्यंत आपण या उपाधींवर आसक्त असतो तोपर्यंत आपण या शरीरावर आसक्त असतोच. कारण या उपाधी फक्त शारीरिक स्तरावर लागू पडतात. पण आपण म्हणजे हे शरीर नाही हे जाणून घेणे ही आध्यात्मिक साक्षात्काराची पहिली पायरी आहे. आपण भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या संसर्गात आहोत, पण भगवद्भक्तीद्वारे आपण यातून अनासक्त झाले पाहिजे. जर आपण भगवद्भक्तीमध्ये आसक्त झालो नाही तर आपण भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांपासून अनासक्त राहूच शकत नाही. उपाधी आणि आसक्ती ही आपल्यातील कामवासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळेच असते. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेचा त्याग करीत नाही, तोपर्यंत सनातन धाम किंवा भगवद्धामामध्ये आपण प्रवेश करू शकण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. भ्रामक भौतिक उपभोगाच्या आकर्षणामुळे जो गोंधळून जात नाही आणि जो भगवत्सेवेमध्ये रत झाला आहे तोच अशा अविनाशी शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थित झालेला सहजपणे परम धामाची प्राप्ती करू शकतो.

भगवद्गीतेमध्ये अन्यत्र सांगण्यात आले आहे की :

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥

     अव्यक्त म्हणजे प्रकट न झालेले. आपल्याला संपूर्ण भौतिक जगताचेही ज्ञान झालेले नाही. आपली इंद्रिये इतकी अपूर्ण आहेत की, आपण या ब्रह्मांडातील सर्व तारे सुद्धा पाहू शकत नाही. वैदिक साहित्यामधून आपल्याला सर्व ग्रह-तार्‍यांबद्दल संपूर्ण  माहिती प्राप्त होऊ शकते आणि यावर कुणाचा विश्‍वास असो अथवा नसो, सर्व महत्त्वपूर्ण ग्रहांचे वर्णन वेदांमध्ये, विशेषत: श्रीमद्भागवतात करण्यात आले आहे. त्या ठिकाणी या भौतिक विश्‍वापालीकडील आध्यात्मिक जगताचे वर्णन ‘अव्यक्त’ किंवा ‘अप्रकट’ म्हणून करण्यात आले आहे. एखाद्याने अशा परम धामाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण जो कोणी त्या धामाची प्राप्ती करतो, त्याला पुन्हा या भौतिक जगात परतावे लागत नाही.

     यानंतर एखाद्याला अशा भगवद्धामाची प्राप्ती कशी करावी असा प्रश्‍न पडेल तर याबद्दलची माहिती आठव्या अध्यायात देण्यात आली आहे.

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय:॥

आयुष्याच्या शेवटी जो कोणी माझे स्मरण करीत देहत्याग करतो, तो तात्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो, यात काहीच संशय नाही. (भगवद्गीता 8.5) मृत्यूसमयी जो श्रीकृष्णांचे स्मरण करतो, तो श्रीकृष्णांना प्राप्त होतो. मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचे स्मरण करणे आवश्यक आहे; ज्याने दिव्य स्वरुपाचे चिंतन करीत देहत्याग केला आहे त्याला नक्कीच आध्यात्मिक धामाची प्राप्ती होते. मद्भावम् शब्द परम पुरुषाच्या परम प्रकृतीला उद्देशून योजण्यात आला आहे. परम पुरुष हा सच्चिदानंदविग्रह आहे. म्हणजेच त्यांचे स्वरुप शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आपले वर्तमान शरीर सच्चिदानंरूपी नाही. हे शरीर सत् नसून असत् आहे, शाश्वत नसून नश्वर आहे आणि चित् किंवा ज्ञानमय नसून पूर्णपणे अज्ञानमय आहे. आपल्याला आध्यात्मिक जगताचे ज्ञान तर नाहीच आणि या भौतिक जगाबद्दलही पूर्ण ज्ञान नाही कारण या ठिकाणी आपल्याला अज्ञात अशा अद्याप किती तरी गोष्टी आहेत. शरीर सुद्धा निरानंद म्हणजेच पूर्ण आनंदमयी असण्याऐवजी पूर्णपणे कष्टमय आहे. या शरीरामुळेच आपल्याला भौतिक जगामधील सर्व गोष्टी अनुभवावयस लागतात, पण जो भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तात्काळ सच्चिदानंद शरीराची प्राप्ती होते.

या देहाचा त्याग आणि दुसऱ्या देहाची प्राप्ती करण्याचा या भौतिक जगातील मार्गसुद्धा व्यवस्थितपणे ठरविण्यात आला आहे. पुढील जन्मी मनुष्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होईल हे ठरल्यानंतरच मनुष्याचा मृत्यू होतो आणि त्याचा निर्णय स्वत: जीव घेत नसून उच्चतर अधिकारी घेतात. या जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती अथवा अधोगती होते. हा जन्म म्हणजे पुढील जन्माची पूर्वतयारीच आहे. म्हणून या जन्मी जर आपण भगवद्धामाची प्राप्ती करण्याची तयारी केली, तर वर्तमान देहाच्या त्यागानंतर आपल्याला नक्कीच भगवंतांच्या दिव्य शरीराप्रमाणेच दिव्य शरीराची प्राप्ती होईल.

     पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अध्यात्मवादी असतात, उदहरणार्थ, ब्रह्मवादी, परमात्मावादी व भक्त - आणि आधी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये (आध्यात्मिक जगतामध्ये) अनंत असे ग्रहलोक असतात. या ग्रहलोकांची संख्या ही भौतिक जगातील ग्रहांपेक्षा खूप खूप पटीने मोठी आहे. हे भौतिक जग एकूण सृष्टीच्या एक चतुर्थांश इतकेच आहे. -एकांशेन स्थितो जगत्. या आंशिक भौतिक जगतामध्ये पण अब्जावधी असे सूर्य, तारे आणि चंद्र असलेली लाखो कोट्यवधी ब्रह्मांडे आहेत. पण तरीसुद्धा एकूण निर्मितीच्या तुलनेत हे संपूर्ण भौतिक जगत् म्हणजे एक लहानसा भाग आहे. अधिकांश निर्मिती ही आध्यात्मिक किंवा दिव्य धामाने व्यापण्यात आली आहे. ज्याला ‘परम ब्रह्मामध्ये’ विलीन होण्याची इच्छा आहे तो भगवंतांच्या ब्रह्मज्योतीला प्राप्त होतो आणि याप्रकारे आध्यात्मिक जगताची प्राप्ती करतो. जो भक्त भगवंतांच्या सान्निध्याची इच्छा करतो तो असंख्य अशा वैकुण्ठलोकांत प्रवेश करतो. श्रीभगवान स्वत:च्या नारायण या चतुर्भुज विस्तारित रूपामध्ये आणि प्रद्युम्न, अनिरुद्ध, गोविंद इत्यादी नावांनी वैकुण्ठात प्रवेश करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहतात, म्हणून मृत्यूच्या शेवटच्या क्षणी अध्यात्मवादी ब्रह्मज्योती, परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण यांचे चिंतन करतात. सर्वच बाबतीत ते आध्यात्मिक जगतामध्येच प्रवेश करतात, परंतु जो भक्त आहे किंवा जो साक्षात् भगवंतांशी संबंधित आहे तोच वैकुण्ठलोकामध्ये अथवा गोलोक वृन्दावन धामात प्रवेश करतो.भगवंत पुढे सांगातात की, या बाबतीत कोणीही संशय घेऊ नये आणि यावर आपला दृढ विश्‍वास असला पाहिजे. आपल्या कल्पनांशी सुसंगत अशी गोष्ट नाही, म्हणून आपण ती नाकारु नये. आपली मनोवृत्ती अर्जुनाप्रमाणे असली पाहिजे, ‘‘तुम्ही जे सांगत आहात त्या सर्व गोष्टींवर माझा पूर्ण विश्‍वास आहे.’’ म्हणून ज्या वेळी भगवंत सांगतात की, जो कोणी मृत्यूसमयी ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून माझे चिंतन करतो तो नक्कीच आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतो, याबद्दल कोणीही संशय ठेवू नये. याबद्दल अविश्‍वास व्यक्त करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

भगवंतांचे मृत्यूसमयी केवळ स्मरण केल्याने आध्यात्मिक जगामध्ये सहजपणे प्रवेश होऊ शकेल असा सर्वसामान्य सिद्धांत भगवद्गीतेतही (8.6) सांगितला आहे.

यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित:॥

‘‘ज्या भावाचे स्मरण करीत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो, त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्‍चितपणे करतो.’’ ही भौतिक प्रकृती म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अभिव्यक्ती आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे. विष्णुपुराणामध्ये (6.7.61) भगवंतांच्या संपूर्ण शक्तीचे विवेचन करण्यात आले आहे.

विष्णुशक्ति: परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा।
अविद्याकर्मसंज्ञान्या तृतीया शक्तिरिष्यते॥

परमेश्वराच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. तरीसुद्धा श्रेष्ठ अशा ज्ञानी ऋषिमतुनींनी आणि मुक्त जीवांनी या सर्व शक्तींचा अभ्यास करून त्यांचे तीन विभाग केले आहेत. या सर्व शक्ती,‘विष्णुशक्ती’ म्हणजेच भगवान श्रीविष्णूंच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत. प्रथम शक्ती म्हणजे परा किंवा द्रव्य आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीव हे पराशक्तीमध्ये येतात. इतर शक्ती किंवा भौतिक शक्ती या तमोगुणांमध्ये येतात. मृत्यूसमयी आपण या भौतिक जगातील कनिष्ठ शक्तीमध्ये राहू शकतो अथवा आध्यात्मिक जगातील दिव्य शक्तीची प्राप्ती करू शकतो. म्हणून भगवद्गीता (8.6) सांगते की,

यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित:॥

‘‘ज़्या भावाचे स्मरण करत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्तिपणे करतो.’’

   आपल्याला जीवनामध्ये एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करण्याची सवय असते. आपल्याला जर भौतिक जगताबद्दल चिंतन न करता आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करायचे असेल तर ते कसे करावे? आपल्याकडील विपुल साहित्य आहे जे आपल्या विचारांना मायाशक्तीने- वृत्तपत्र.... इत्यादी व्यापून टाकते. आपण या साहित्यातील लक्ष काढून वैदिक साहित्यामध्ये आपली विचारशक्ती गुंतवली पाहिजे. आणि यासाठीच थोर ऋषी, महर्षींनी पुराणे इत्यादी पुष्कळ वैदिक साहित्याची रचना केली आहे. पुराणे ही काल्पनिक नसून ती ऐतिहासिक आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये (मध्य 20.122) पुढील श्‍लोक आढळतो:

मायामुग्ध जीवेर नाहि स्वत: कृष्णज्ञान।
जीवेरे कृपाय कैला कृष्ण वेद-पुराण ॥

   स्मृतिभ्रष्ट किंवा मायामुग्ध जीवांना किंवा बद्ध जीवांना त्यांच्या परमेश्वराशी असणाऱ्या संबंधाचे विस्मरण झाले आहे आणि जीव हे भौतिक कार्य करण्यातच मग्न झाले आहेत. जीवांची विचारशक्ती अथवा भावना आध्यात्मिक दिव्य जगताकडे वळविण्यासाठी कृष्ण द्वैपायन व्यासांनी विपुल वैदिक साहित्य दिले आहेत. सर्वप्रथम त्यांनी वेदांचे चार विभाग केले, नंतर त्यांचे विश्‍लेषण पुराणांमध्ये केले आणि अल्पबुद्धी लोकांसाठी त्यांनी महाभारत लिहिले. महाभारतामध्येच भगवद्गीता सांगण्यात आली. यानंतर संपूर्ण वैदिक साहित्य सारांश रूपात वेदान्त सूत्रामध्ये सांगितले आणि भावी मार्गदर्शनासाठी वेदान्त सूत्रावर सहज आणि सुंदर अशी श्रीमद्भागवत नामक व्याख्या लिहिली. या वैदिक शास्त्रांचे चिंतन, मनन आणि अध्ययन करण्यामध्येच आपण आपले मन गुंतविले पाहिजे. ज्याप्रमाणे भौतिकवादी लोक मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी वर्तमानपत्रे, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारच्या जडवादी साहित्याचे वाचन करतात, त्याचप्रमाणे आपण आपले मन, व्यासदेवांनी दिलेले ग्रंथसाहित्य वाचण्याकडे वळविले पाहिजे, आणि असे केल्यानेच आपण मृत्यूच्या, अंतिम क्षणी भगवंतांचे स्मरण करू शकू. भगवंतांनी सुचविलेला हा एकच मार्ग आहे आणि त्याच्या यशाच्या खात्रीबद्दल भगवंत सांगतात की, ‘‘याबद्दल मुळीच संदेह नाही.’’

तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशय:॥

‘‘म्हणून अर्जुना! तू नित्य माझे कृष्ण रूपामध्ये चिंतन करून युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस. तुझे कार्य मला अर्पण केल्यामुळे आणि मन व बुद्धी माझ्यावर केंद्रित केल्यामुळे तू नि:संदेह माझी प्राप्ती करशील.‘‘ (भगवद्गीता 8.7)

अर्जुनाने त्याच्या कर्तव्याचा त्याग करूनफक्त भगवंतांचेच स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाहीत. भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट कधीच सांगत नाहीत. या भौतिक जगामध्ये शरीराचे पालनपोषण करण्यासाठी प्रत्येकाला कर्म हे केलेच पाहिजे. कर्मानुसार मानवी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्णामध्ये विभाजन करण्यात आले आहे. ब्राह्मण किंवा बुद्धिमान वर्ग एका विशिष्ट प्रकारचे कर्म करतात, क्षत्रिय किंवा प्रशासकीय वर्ग एका प्रकारचे विशिष्ट कर्म करतात आणि व्यापारी व कामगार (शूद्र) वर्ग त्यांचे विशिष्ट प्रकारचे कर्म करतात. मानवी समाजामध्ये जरी कोणी कामगार, व्यापारी, प्रशासक किंवा शेतकरी असेल अथवा उच्चवर्णीय साहित्यिक, वैज्ञानिक किंवा धर्मशास्त्र निपुण असला तरी त्याला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी कर्म करावेच लागते. यासाठीच भगवंत अर्जुनाला सांगतात की, त्याने त्याच्या कर्तव्याचा  त्याग करण्याची गरज नाही तर त्याचे पालन करतानाच भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करणे आवश्यक आहे. (मामनुस्मर). जर एखाद्याने स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करतेवेळी श्रीकृष्णांचे स्मरण करण्याचा सराव केला नाही, तर त्याला मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य होणार नाही. श्री चैतन्य महाप्रभूही हेच सुचवितात. ते सांगतात की कीर्तनीय सदा हरि:- प्रत्येकाने भगवंतांच्या नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश ‘‘माझे स्मरण कर’’ आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला उपदेश ‘‘नित्य भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करा’’ हे दोन्ही सारखेच आहेत. यामध्ये भेद मिळणार नाही कारण कृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम हे एकच आहेत. परम सत्याच्या स्तरावर नाम आणि नामी यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून नित्य, दिवसातील चोवीस तास भगवंतांचे नामस्मरण करून त्यांचे चिंतन करण्याचा अभ्यास केला पाहिजे तसेच आपल्या जीवनातील सर्व कर्मे अशा रीतीने केली पाहिजेत की आपण त्यांचे नित्य स्मरण करू शकू.

हे कसे शक्य आहे? तर आचार्यजन या बाबतीत पुढीलप्रमाणे उदाहरण देतात. जर एखादी विवाहित स्त्री परपुरुषावर आसक्त असेल किंवा एखादा पुरुष स्वत:च्या पत्नीव्यतिरिक्त परस्त्रीवर आसक्त असेल तर या प्रकारची आसक्ती अत्यंत प्रबळ असते. अशा व्यक्ती आपल्या प्रियतमाबद्दल सतत चिंतन करीत असतात. अशी पत्नी ज्या वेळी आपली नित्य गृहकृत्ये करीत असते, तेव्हा सुद्धा ती आपल्या प्रियकराला कसे भेटावे याबद्दल चिंतन करीत असते. वस्तुत: ती स्वत:ची गृहकृत्ये इतक्या काळजीपूर्वक करीत असते की, तिच्या पतीला सुद्धा तिच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये. याचप्रमाणे आपण आपले परमप्रिय श्रीकृष्ण यांचे सतत चिंतन केले पाहिजे आणि त्याचबरोबर आपले भौतिक कर्मसुद्धा योग्य आणि व्यवस्थित रीतीने पार पाडले पाहिजे. पण यासाठी उत्कट प्रेमभाव असणे आवश्यक आहे. आपल्याला भगवंतांबद्दल उत्कट प्रेम असेल तरच आपण आपले कर्मही योग्य रीतीने करू शकतो व तसेच त्यांचे नित्य चिंतनही करू शकतो. परंतु अशा उत्कट प्रेमाचा विकास आपण केला पाहिजे. उदा.अर्जुन सतत श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता, श्रीकृष्णांचा नित्य  सहचर होता त्याचप्रमाणे तो योद्धाही होता. श्रीकृष्णांनी त्याला युद्धत्याग करून ध्यानधारणेसाठी अरण्यात जाण्याचा सल्ला दिला नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी योगपद्धतीचे अर्जुनाला वर्णन केले तेव्हा अर्जुन म्हणतो की, या योगपद्धतीचे  पालन करणे हे आपल्या आवाक्यापलीकडे आहे.

अर्जुन उवाच

योऽयं योगस्त्वया प्रोक्त: साम्येन मधुसूदन।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम्॥

‘‘अर्जुन म्हणाला, हे मुधसूदना! ज्या योगपद्धतीचे वर्णन तुम्ही केले आहे, ते अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण, मन हे चंचल आणि अस्थिर आहे.’’ (भगवद्गीता 6.33)

पण भगवान सांगतात:

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मन।
श्रद्धावान् भजते यो मां स ये युक्ततमो मत:॥

‘‘सर्व योगीजनांमध्ये जो दृढ श्रद्धापूर्वक सदैव माझ्यामध्ये निवास करतो. अंत:करणात माझेच चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो योगाद्वारे माझा अत्यंत निकटसंबंधी होतो आणि असा हा योगी सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ आहे, असे माझे मत आहे. (भगवद्गीता 6.47) म्हणून जो भगवंतांचे निरंतर स्मरण करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी, ज्ञानी तसेच सर्वश्रेष्ठ भक्तही आहे. पुढे जाऊन भगवंत अर्जुनाला सांगतात की, अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध टाळूच शकत नाही. पण जर त्याने श्रीकृष्णांचे चिंतन करीत युद्ध केले तर तो मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे चिंतन करू शकेल. मात्र यासाठी मनुष्याने परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे.

वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन आणि बुद्धीद्वारे करीत असतो. म्हणून बुद्धी आणि मन जर निरंतर भगवंतांच्या चिंतनामध्ये संलग्न केले तर स्वाभाविकपणे सर्व इंद्रियेसुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतात. वरकरणी पाहिल्यास इंद्रियांची कार्ये सारखीच दिसतात, पण त्यामागील भावना निराळी असते. मन आणि बुद्धीला भगवंतांच्या चिंतनात कसे संलग्न करावे याबद्दल भगवद्गीता शिकविते. अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भगवद्धामात प्रवेश करू शकतो. जर मनाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिये आपोआपच त्यांच्या सेवेमध्ये मग्न होतात. श्रीकृष्णांच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि हेच भगवद्गीतेचे रहस्यही आहे.

आधुनिक मानवाने चंद्रावर जाण्यासाठी खडतर परिश्रम केले आहेत, पण त्याने स्वत:चा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी काहीच खडतर प्रयत्न केले नाहीत. जर एखाद्यापुढे पन्नास वर्षाइतके आयुष्य असेल तर त्याने असा अल्पसमय पुरुषोत्तम श्रीभगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्याच विकास करण्यामध्ये स्वत:स संलग्न केलेले पाहिजे. हाच भक्तिमार्ग आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

(श्रीमद्भागवत 7.5.23)

   या नऊ विधींपैकी सर्वांत सोपी म्हणजे ‘श्रवणम्’ किंवा साक्षात्कारी व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे हे आहे. यामुळेच मनुष्य परमेश्वराचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल. अशा स्मरणामुळे भगवद्चिंतन सुलभ होते आणि देहत्यागानंतर मनुष्याला असे दिव्य शरीर प्राप्त होऊ शकेल की जे भगवंतांच्या सान्निध्यात राहण्यास उपयुक्त असेल.

भगवंत पुढे सांगतात की:

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।
परंम पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥

हे अर्जुना, जो पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन दृढनिश्‍चयाने विचलित न होता माझे चिंतन करण्यात संलग्न झाले आहे तो निश्‍चितपणे माझी प्राप्ती करतो. (श्रीमद्भगवद्गीता 8.8)

हा मार्ग अधिक खडतर नाही. तरीसुद्धा मनुष्याने अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे. तद्विज्ञानार्थ स गुरूमेवाभिगच्छेत -जी व्यक्ती या पद्धतीचा अवलंब करीत आहे अशा व्यक्तीचा एखाद्याने आश्रय घेणे आवश्यक आहे. मन हे सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असते. परंतु मनुष्याने स्वत:चे मन नित्य भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या नामावर एकाग्र करण्यासाठी अध्ययन केले पाहिजे. स्वभावत:च मन हे चंचल असल्याने इकडेतिकडे धावत असते. पण ते श्रीकृष्णांच्या दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकते. याप्रमाणे मनुष्याने परमं पुरुषम् किंवा आध्यात्मिक जगतातील पुरुषोत्तम श्रीभगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी. अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येयप्राप्तीसाठीचा मार्ग आणि साधने याबद्दलचे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे आणि या ज्ञानाची द्वारे सर्वांसाठी उघडी आहेत. येथे कोणालाही आडकाठी नाही. सर्व श्रेणींमधील लोक भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात. कारण त्यांचे चिंतन करणे आणि त्यांच्याबद्दल श्रवण करणे हे सर्वानाच शक्य आहे.

भगवंत पुढे सांगतात (भगवद्गीता 9.32-33)

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय:।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥

किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमुसखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥

याप्रमाणे भगवंत सांगतात की, एक पतित स्त्री, शूद्र कामगार किंवा कनिष्ठ स्तरावरील मनुष्यसुद्धा परम सत्याची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी मनुष्याकडे प्रगत बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असे नाही. मुख्य मुद्दा आहे की, जो कोणी भक्तियोगाचे सिद्धांत स्वीकारतो आणि भगवंतांना जीवनाचे सर्वस्व, सर्वोच्च लक्ष्य किंवा अंतिम  ध्येय मानतो तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांची प्राप्ती करू शकतो. जर एखाद्याने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केलेल्या सिद्धांताचे पालन केले तर तो आपले जीवन कृतार्थ करू शकतो आणि जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर त्याला मिळते. हेच भगवद्गीतेचे सार-सर्वस्व आहे.

सारांशरुपात ज्याचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता हे एक दिव्य साहित्य आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यं य: पठेत् प्रयत: पुमान् - जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दु:खे आणि चिंता यामधून मुक्त होते. भय-शोकादि-वर्जित: - सर्व प्रकारच्या भयांपासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते व तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. (गीता माहात्म्य 1)

यापुढील लाभसुद्धा यामध्ये आहे:

गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च।
नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च॥

‘‘जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीऱ्याने अध्ययन केले तर भगवंतांच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही.’’ भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे उद्घोषणा करतात की (भगवद्गीता  18.66)

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:॥

‘‘सर्व विविध प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुझी सर्व पापकर्मांतून मुक्तता करीन. याबद्दल तू भय बाळगू नकोस.’’ याप्रमाणे जो भगवंतांच्या शरण जातो त्याची जबाबदारी स्वत: भगवंत घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व प्रकारच्या पापकर्मातून मुक्तता करतात.

मलिनेमोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने ।
सकृद्गीतामृतस्नानं संसारमलनाशनम् ॥

‘‘प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदासुद्धा पवित्र जलरुपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले, तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते (गीता माहात्म्य 3).

   गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रविस्तरै:।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मादिनिसृता ॥

‘‘भगवद्गीता ही स्वत: पुरुषोत्तम श्रीभगवान यांनी सांगितल्यामुळे एखादयाने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक काऱ्यात इतके मग्न आहेत की, त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे  वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही.  भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे. कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे, तसेच ती स्वत: पुरुषोत्तम श्रीभगवंतांनी सांगितली आहे.’’ (गीता माहात्मय 4).

जसे म्हटले आहे:

भारतामृतसर्वस्व विष्णुवक्त्राद्विनि:सृतम् ।
गीता -गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ॥

‘‘जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते, तर जो भगवद्गीतेचे अमृत प्राशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावे? भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे कारण ती स्वत: आदिविष्णू भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे’’ (गीता माहात्म्य 5). भगवद्गीता ही पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या मुखातून प्रकट होते तर गंगा ही त्यांच्या चरणकमलातून उत्पन्न होते. अर्थात, भगवंतांचे मुख आणि चरणकमल यामध्ये काहीच फरक नाही. पण नि:पक्षपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की, भगवद्गीता ही गंगाजलापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे.

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन:।
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥

‘‘सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद् किंवा भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे. तर विद्धानजन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणारे आहेत.’’ (गीता महात्म्य 6).

एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम्
            एको देवो देवकीपुत्र एव।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि
                   कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा॥

(गीता महात्म्य 7)

‘‘वर्तमान काळात लोक एकच शास्त्र, एकच परमेश्वर, एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. म्हणून एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् - अखिल विश्‍वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे. एको देवो देवकीपुत्र एव- अखिल विश्‍वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावेत. एको मन्त्रस्तस्य नामानि - एकच मन्त्र,एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे  । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा - सर्वांसाठी एकच कर्म असावे व ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा.’’ 

गुरुशिष्य परंपरा

     एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदु:। (भगवद्‌गीता ४.२)प्रस्तुत ‘भगवद्‌गीता -जशी आहे तशी’ या गुरुशिष्य- परंपरेद्वारे प्राप्त झाली आहे.

.श्रीकृष्ण
२. ब्रह्मा
३. नारद
४. व्यास
५. मध्व
६. पद्मनाभ
७. नृहरी
८.माधव
९.अक्षोभ्य
१०. जयतीर्थ
११.ज्ञानसिंधू
१२.दयानिधी
१३.विद्यानिधी
१४.राजेंद्र
१५.जयधर्म
१६.पुरुषोत्तम
१७.ब्रह्मण्यतीर्थ  
१८.व्यासतीर्थ
१९.लक्ष्मीपती
२०. माधवेंद्रपुरी
२१.ईश्वरपुरी (नित्यानंद, अद्वैत)
२२. श्री.चैतन्य महाप्रभू
२३.रूप (स्वरुप, सनातन)
२४. रघुनाथ, जीव
२५. कृष्णदास
२७. नरोत्तम
२८. (बलदेव) जगन्नाथ
२९.भक्तिविनोद
३०. गौरकिशोर
३१. भक्तिसिद्धांत सरस्वती
३२. .सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

« Previous Next »