No edit permissions for मराठी

TEXT 11

ayaneṣu ca sarveṣu
yathā-bhāgam avasthitāḥ
bhīṣmam evābhirakṣantu
bhavantaḥ sarva eva hi

अयनेषु- व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी; -सुद्धा; सर्वेषु-सर्व ठिकाणी; यथा-भागम्-निरनिराळ्या नेमलेल्या जागी; अवस्थिता: - स्थित असलेले; भीष्मम्-पितामह भीष्मांना; एव-निश्चित; अभिरक्षन्तु- सर्व प्रकारे साहाय्य करा; भवन्त:-तुम्ही; सर्वे-सर्वांनी; एव हि-निश्चितच.

आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण साह्य केले पाहिजे.

तात्पर्य: भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की, इतर योद्धांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरुन वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की, भीष्मदेव हे नि:संशय  सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने  विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणून इतर योद्धांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. कुरुंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे, हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती. कारण ज्या वेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्या वेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्यूतक्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील, अशी त्याला आशा होती.

« Previous Next »