TEXT 30
na ca śaknomy avasthātuṁ
bhramatīva ca me manaḥ
nimittāni ca paśyāmi
viparītāni keśava
न-नाही; च-सुद्धा; शक्नोमि-समर्थ आहे किंवा शक्य आहे; अवस्थातुम्-उभा रहाण्यास; भ्रमति-विसरत आहे; इव-प्रमाणे; च-आणि; मे-माझे; मन:- मन; निमित्तानि-कारणे; च-सुद्धा; पश्यमि-मी दिसते; विपरीतानि-विपरीत; केशव-हे केशी दैत्याचा संहार करणारे श्रीकृष्ण.
मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वत:चाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा! मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत.
तात्पर्य: अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वत:चाच विसर पडत होता. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भयं द्वितीयाभिनिवेशत: स्यात्। (श्रीमद्भागवत 11.2.37). ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दु:खमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानि विपरीतानि हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की ‘मी येथे असण्याचे कारण काय?’ प्रत्येकाला स्वत:मध्ये आणि आपल्या स्वत:च्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वत:च्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दु:खे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की, युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल.