TEXT 40
adharmābhibhavāt kṛṣṇa
praduṣyanti kula-striyaḥ
strīṣu duṣṭāsu vārṣṇeya
jāyate varṇa-saṅkaraḥ
अधर्म-अधर्म; अभिभवात्-प्रबळ झाला असता; कृष्ण-हे कृष्ण; प्रदुष्यन्ति-दूषित होतात, बिघडतात; कुल-स्त्रिय:- कुळातील स्त्रिया; स्त्रीषु-स्त्री जातीपासून; दृष्टासु-अशा रीतीने बिघडल्या म्हणजे; वार्ष्णेय- हे वृष्णीच्या वंशजा, हे श्रीकृष्ण; जायते-उत्पन्न होतात; वर्ण-सङ्कर:- अवांछित प्रजा, नको असलेली संतती.
हे कृष्ण! कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे, हे वृष्णीवंशजा! अवांछित संतती उत्पन्न होते.
तात्पर्य: जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रमधर्मातील मूळ तत्त्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्रीजातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाममार्गाला लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अध:पतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यत: स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसततात. म्हणून वंशपरंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रमधर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम -धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचारला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्यजातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध, महामारीचे संकट बळावते.