TEXT 9
mac-cittā mad-gata-prāṇā
bodhayantaḥ parasparam
kathayantaś ca māṁ nityaṁ
tuṣyanti ca ramanti ca
मत्-चित्ता:-माझ्यामध्ये चित्त परायण झालेले; मत्-गत-प्राणा:-आपले जीवन मला समर्पित केलेले; बोधयन्तः-बोधन करणारे; परस्परम्-एकमेकांत; कथयन्तः-चर्चा किंवा कथन करीत असतात; च-सुद्धा; माम्-माझ्याबद्दल; नित्यम्-नेहमी; तुष्यन्ति-संतुष्ट होतात; च-सुद्धा; रमन्ति-दिव्यानंदात रममाण असतात; च-सुद्धा.
माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि
तात्पर्य: या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत्सेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलांवरून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांचीच चर्चा करतात. या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत. भगवद्भक्त हे भगवंतांच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममाण झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठायी लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्णकथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो.
भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्यानंदांचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत्प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर, भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू, भक्तीची तुलना हृदयामध्ये होणा-या बीजरोपणाशी करतात. ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे व भगवद्भक्ती म्हणजे काय, हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. भक्ती ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे । या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले, तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित होते त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वातही ती वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये जाऊन पोहोचते. अखेरीस ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन तेथे विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण, कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालूच राहते. या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृतात (मध्यलीला अध्याय १९) करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की, जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत्प्रेमामध्ये पूर्णपणे तलीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंतांच्या सान्निध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेत, भक्ताला भगवंतांच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते.
श्रीमदभागवतातही भगवंत आणि भक्त यांच्या संबंधांविषयीची वर्णने आहेत. म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे (१२.१३.१८) श्रीमद्भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद्भागवतं पुराणम् अमलं यद्वैष्णवनां प्रियम्-भागवतात भौतिक कर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष इत्यादींचे मुळीच वर्णन नाही. श्रीमद्भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की, ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणून ज्याप्रमाणे युवक-युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याचप्रमाणे कृष्णभावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात.