No edit permissions for मराठी

TEXT 8

ahaṁ sarvasya prabhavo
mattaḥ sarvaṁ pravartate
iti matvā bhajante māṁ
budhā bhāva-samanvitāḥ

अहम्-मी; सर्वस्य-सर्वांचा; प्रभवः-उत्पत्तीचे कारण; मत्तः-माझ्यापासून; सर्वम्-सर्व; प्रवर्तते-उद्भवते; इति-याप्रमाणे; मत्वा-जाणून; भजन्ते-भजतो किंवा भक्ती करतो; माम्- माझी किंवा मला; बुधाः-बुद्धिमान; भाव-समन्विता:-अंतःकरणपूर्वक किंवा ध्यानपूर्वक.

मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तिकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात.

तात्पर्य: ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूसारख्या प्रमाणित अधिका-यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्याने जाणले आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्तिकर्ता कसे असू शकतात हे जाणू शकतो. हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवद्भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो. मूर्खाद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही. सर्व वेद स्वीकार करतात की, श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव, शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहेत. अथर्व वेदांमध्ये (गोपाल तापनी उपनिषद् १.२४) म्हटले आहे की, यो ब्रह्माण विदधाति पूर्वी यो वै वेदां गापयति स्म कृष्ण:- 'श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला.'नंतर पुन्हा नारायण उपनिषदात (१)सांगितले आहे की, अथ पुरुषो ह वै नारायणोऽकामयत प्रजा: सृजेयेति- ‘‘ त्यांनतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली.' त्यामध्ये पुढे म्हटले आहे की, नारायणाद् ब्रह्मा जायते नारायणाद्‌ प्रजापति: प्रजायते, नारयणाद् इन्द्रो जायते। नारायणदष्टौ वसवो जायन्ते, नारायणादेकादश रुद्रा जायन्ते नारायणद्द्वादशादित्य:- 'नारायणांपासून ब्रह्मादेवाचा जन्म झाला आणि नारायणपासूनच प्रजापतींचीही उत्पत्ती झाली. नारायणांपासूनच इंद्र, आठ वसू, अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचा जन्म झाला आहे.'नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे.

          त्याच वेदामध्ये म्हटले आहे की, ब्रह्मण्यी देवकीपुत्रः देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत (नारायण उपनिषद् ४) नंतर म्हटले आहे की, एक वें नारायण आसीत्र ब्रह्मा न ईशानो नापो नाग्निसमौ नेमे द्यावापृथिवी न नक्षत्राणि न सूर्य:- सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव, शिव, अग्नी, चंद्र, नक्षत्रे, सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ एकमात्र भगवान नारायण होते. (महोपनिषद् १) महोपनिषदातच असेही म्हटले आहे की, भगवंतांच्या कपाळातून शंकराचा जन्म झाला. याप्रमाणे वेद सांगतात की, शिव, ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे.

मोक्ष-धर्मामध्ये श्रीकृष्णसुद्धा म्हणतात की,

प्रजापति च रुद्र चाप्यहमेव सृजामि वें
तौ हि मां न विजानीतो मम मायाविमोहितौ।।

          'शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे, परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहीत नसते की, मीच त्यांचा उत्पत्तिकर्ता आहे.' वराहपुराणातही म्हटले आहे की

नारायण: परो देवस्तस्माज्जातश्र्चतुर्मुख ।
तस्माद्‌रुद्रोऽभवद्देव: स च सर्वज्ञतां गत:।।

 ‘‘नारायण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्याच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवापासून रुद्राचा जन्म झाला.'

          भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परमकारण असे म्हटले जाते. श्रीकृष्ण म्हणतात की, 'सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. सर्व काही माझ्या अधीन आहे. माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही.' श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परम नियंत्रक नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूकडून वैदिक प्रमाणांनुसार जो श्रीकृष्णांना या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्णभावनेमध्ये निमग्न होतो आणि ख-या अर्थाने विद्वान बनतो. त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होत. केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो. अशा मूर्खाद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्याने गोंधळून जाऊ नये. त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्ये आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने व दृढतेने कृष्णभावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे.

« Previous Next »