No edit permissions for मराठी

TEXT 10

teṣāṁ satata-yuktānāṁ
bhajatāṁ prīti-pūrvakam
dadāmi buddhi-yogaṁ taṁ
yena mām upayānti te

तेषाम्-त्यांना; सतत-युक्तानाम्-सतत युक्त असणा-या; भजताम्-भक्तिपूर्ण सेवा करणा-या; प्रीति-पूर्वकम्—प्रेमाने तलीन होऊन; ददामि-मी देतो; बुद्धि-योगम्—खरी बुद्धी; तम्—त्या; येन-ज्यायोगे; माम्-मला; उपयान्ति-प्राप्त होतात किंवा येऊन पोहोचतात; ते-ते.

जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील.

तात्पर्य: या श्लोकामध्ये बुद्धि-योगम् हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या ध्यानात असेलच की, दुस-या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की, मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आहे आणि आता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन. या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे. कृष्णभावनाभावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय. जेव्हा मनुष्य भगवद्धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्णभावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर ज्यायोगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय. श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परम लक्ष्य आहेत. लोकांना हे माहीत नसते, म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरू हे महत्वपूर्ण आहेत. मनुष्याने जाणले पाहिजे की, श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येयप्राप्तीचा मार्ग हळूहळूपण उत्तरोत्तर आक्रमिला जातो आणि अखेरीस अंतिम ध्येयाची प्राप्ती होते.

          जेव्हा मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते, परंतु तो कर्मफलात आसक्त असतो, तेव्हा त्याला कर्मयोगी असल्याचे म्हटले जाते. जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच लक्ष्य आहेत, परंतु श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात आनंद मानतो, त्याला ज्ञानयोगी म्हटले जाते आणि जेव्हा तो जाणतो की, श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि कृष्णभावना व भक्तियोगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते. भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग होय. हा परिपूर्ण योग म्हणजेच जीवनाची परमोच्च सिद्धावस्था होय.

          एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरू असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल, पण तरीही प्रगती करण्याइतपत तो जर बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात, जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. याकरिता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्णभावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे. त्याने श्रीकृष्णांप्रीत्यर्थ प्रेमभावाने काही तरी कर्म केले पाहिजे. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्याइतपत जर भक्त बुद्धिमान नसेल, परंतु तो भक्तिभावित कर्म करण्यात प्रामाणिक आणि समर्पित असेल तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात.

« Previous Next »