No edit permissions for मराठी

TEXT 3

evam etad yathāttha tvam
ātmānaṁ parameśvara
draṣṭum icchāmi te rūpam
aiśvaraṁ puruṣottama

एवम्-याप्रमाणे; एतत्-हे; यथा-जसे आहे तसे; आत्थ-सांगितला आहात; त्वम्-तुम्ही; आत्मानम्-स्वतः; परम-ईश्वर-हे परमेश्वर; द्रष्टुम्-पाहण्याची; इच्छामि-माझी इच्छा आहे; ते-तुमचे; रूपम्-रूप; ऐश्वरम्-दैवी; पुरुष-उत्तम-हे पुरुषोत्तम.

हे पुरुषोत्तम! हे परमेश्वर! तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहात असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की, ते आपल्या विभूतींद्वारे या भौतिक जगतात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले आहे. आता अर्जुनाबद्दल सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावर त्याचा दृढ विश्वास आहे; परंतु भावी काळातील ज्या लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असे वाटेल त्या लोकांची खात्री पटविण्याकरिता अर्जुन, श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू इच्छितो. हे विराट रूप पाहून तो जाणू इच्छितो की, भौतिक सृष्टीपासून श्रीकृष्ण जरी अलिप्त असले तरी या सृष्टीमध्ये ते कसे कार्य करीत आहेत. या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधणेही महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत, यास्तव ते अर्जुनाची इच्छा जाणतात. भगवंत जाणू शकतात की, अर्जुनाला माझे विश्वरुप पाहण्याची विशेष इच्छा नाही, कारण तो मला कृष्णरूपामध्ये पाहण्यातच पूर्णपणे समाधानी आहे. परंतु इतरांचा विश्वास पटविण्याकरिता अर्जुन आपले विश्वरूप पाहू इच्छितो हेही भगवंत जाणू शकत होते. अर्जुनाला स्वतःची खात्री पटविण्याकरिता, श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहण्याची वैयक्तिक अशी इच्छा नव्हती. श्रीकृष्ण हे सुद्धा जाणतात की, एक आदर्श स्थापित करण्यासाठी अर्जुन विश्वरूप पाहू इच्छितो, कारण भावी काळात स्वत:ला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक भोंदू लोक निर्माण होतील. म्हणून लोकांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे. जो मनुष्य स्वतः श्रीकृष्ण असल्याचा दावा करतो त्याने आपला दावा सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखविण्याची तयारी ठेवली पाहिजे.

« Previous Next »