No edit permissions for मराठी

TEXT 47

śrī-bhagavān uvāca
mayā prasannena tavārjunedaṁ
rūpaṁ paraṁ darśitam ātma-yogāt
tejo-mayaṁ viśvam anantam ādyaṁ
yan me tvad anyena na dṛṣṭa-pūrvam

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले: मया—मी; प्रसन्नेन-प्रसन्न होऊन; तव—तुला; अर्जुन—हे अर्जुन; इदम्—हे; रूपम्—रूप; परम्—परम; दर्शितम्—दाखविले, आत्मयोगात्— माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे; तेजः-मयम्-तेजोमय; विश्वम्-संपूर्ण विश्वाला; अनन्तम्-अनंत; आद्यम्-आद्य; यत्—जे; मे—माझे; त्वत् अन्येन—तुझ्या व्यतिरिक्त; दृष्ट- पूर्वम्—पूर्वी कोणीच पाहिलेले नाही.

श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुन! मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्यावाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही.

तात्पर्य: अर्जुनाला भगवंतांचे विश्वरूप पाहण्याची इच्छा होती म्हणून आपल्या भक्तावर, कृपा असल्यामुळे भगवंतांनी आपले ऐश्वर्यमय आणि तेजोमय रूप अर्जुनाला दाखविले. हे रूप सूर्याप्रमाणे तळपत होते आणि याची अनेक रूपे वेगाने बदलत होती. केवळ आपल्या मित्राची, अर्जुनाची इच्छापूर्ती करण्यासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले. मानवीय कल्पनेच्या अतीत असणारे हे रूप श्रीकृष्णांनी आपल्या आत्म-योगाने (अंतरंगा शक्तीने) प्रकट केले. अर्जुनाव्यतिरिक्त पूर्वी कोणीच हे विराट रूप पाहिले नव्हते, परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखविल्यामुळे, स्वर्गलोकातील आणि अंतरिक्षामध्ये असणा-या इतर लोकांतील भक्तगणांनाही हे रूप पाहता आले. त्यांनीही हे रूप पूर्वी पाहिले नव्हते; परंतु अर्जुनामुळे त्यांना सुद्धा हे रूप पाहता आले. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, कृष्णकृपेमुळे अर्जुनाला जे विश्वरूप पाहण्यास मिळाले ते भगवत्परंपरेतील सर्व भक्तांना पाहण्यास मिळाले. काहीजणांनी म्हटले आहे की, श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी गेले होते तेव्हा हे रूप दुर्योधनाला सुद्धा दाखविण्यात आले. दुर्दैवाने दुर्योधनाने शांततेचा प्रस्ताव स्वीकारला नाही, परंतु त्या वेळी श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपातील काही रूपे प्रकट केली. परंतु अर्जुनाला दाखविलेल्या विश्वरूपाहून ती रूपे निराळी होती, कारण या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की, यापूर्वी कोणीच हे रूप पाहिले नव्हते.

« Previous Next »