TEXT 1
arjuna uvāca
evaṁ satata-yuktā ye
bhaktās tvāṁ paryupāsate
ye cāpy akṣaram avyaktaṁ
teṣāṁ ke yoga-vittamāḥ
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; एवम्-याप्रमाणे; सतत-सदैव; युक्ता:-संलग्न झालेले; ये-जे; भक्ता:-भक्तगण; त्वाम्-तुमची; पर्युपासते-योग्य रीतीने उपासना करतात; ये-जे; च-सुद्धा; अपि-पुन्हा; अक्षरम्-इंद्रियातीत; अव्यक्तम्-अव्यक्त; तेषाम्-त्यांपैकी; के-कोण; योग-वित्–तमाः-योगविद्या पारंगत.
अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्यरीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते?
तात्पर्य: श्रीकृष्णांनी आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगिजनांचे विवरण केले आहे. सामान्यत: योग्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते, एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी (साकारवादी). साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत्सेवेमध्ये संलग्न करतो. निर्विशेषवादी सुद्धा स्वत:ला प्रत्यक्ष कृष्णसेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो.
या अध्यायामध्ये आपल्याला आढळते की, परम सत्याच्या साक्षात्कारासाठी असणा-या निरनिराळ्या योगपद्धतींमध्ये, भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. जर मनुष्याला भगवंतांच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
भक्तीद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करणा-यांना सविशेषवादी असे म्हटले जाते. जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हटले जाते. या दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारीत आहे. परम सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत; परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की, भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा सहजसुलभ मार्ग आहे.
भगवद्गीतेच्या दुसर्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की, जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्फुलिंग आहे. परम सत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे. सातव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की, जीव हा परम सत्याचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परम सत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. नंतर पुन्हा आठव्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की, देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्ण-चिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची, कृष्णलोकाची प्राप्ती होते आणि सहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व योग्यांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्णस्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय. म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की, मनुष्याने श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरत झाले पाहिजे, कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे.
तरीही असे लोक आहेत, जे श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरत नाहीत. कृष्णरूपापासून ते इतक्या दृढपणे अनासक्त झालेले असतात की, भगवद्गीतेवर भाष्य करतानाही ते, लोकांना श्रीकृष्णांपासून दूर नेण्याचा आणि त्या लोकांचा भक्तिभाव निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करविण्याचा प्रयत्न करतात. अव्यक्त आणि इंद्रियातीत परम सत्याच्या निर्विशेष रूपावरील ध्यानास ते प्राधान्य देतात.
अशा प्रकारे योगिजनांचे दोन प्रकार आहेत. आता या दोहोंपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण तो श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरत झालेला आहे. तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही. आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे. प्राकृत जगतात असो अथवा भगवंतांच्या आध्यात्मिक जगतात असो निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते. वस्तुतः मनुष्याला परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाला म्हणावयाचे आहे की, अशा कालापव्ययाचा काय उपयोग आहे? अकराव्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की, श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण त्यामुळे तो इतर सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याच वेळी त्याच्या श्रीकृष्णांवरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता. अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नांमुळे परम सत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद स्पष्ट होईल.