TEXT 20
ye tu dharmāmṛtam idaṁ
yathoktaṁ paryupāsate
śraddadhānā mat-paramā
bhaktās te ’tīva me priyāḥ
ये-जे; तु-परंतुः धर्म-धर्माचा; अमृतम्-अमृत; इदम्-हे; यथा-ज्याप्रमाणे; उक्तम-सांगितले आहे; पर्युपासते-पूर्णपणे संलग्न होतातः श्रद्दधानाः- श्रद्धेने; मत्-परमाः-मलाच सर्वस्व मानून; भक्ताः-भक्त; ते-ते; अतीव-अत्यधिक; मे-मला, प्रियाः-प्रिय,
जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्यधिक प्रिय आहेत.
तात्पर्य: या अध्यायामध्ये दुस-या श्लोकापासून मय्यावेश्य मनो ये मामू (माझ्यावर मन स्थिर करून) ते शेवटच्या श्लोकापर्यंत येतु धर्ममृतम् इदम् (शाश्वत कार्यांचा धर्म) भगवंतांनी, त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवापद्धतींचे वर्णन केले आहे. असे विधी भगवंतांना प्रिय आहेत आणि जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की, यापैकी श्रेष्ठ कोण, निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की, भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला? आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात की, आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवद्भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे यात मुळीच संदेह नाही.
दुस-याच शब्दांत सांगावयाचे तर, या अध्यायात निश्चित केले आहे की, सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठायी शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते, त्यायोगे मनुष्य आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करतो आणि त्यांच्याकडून श्रद्धा, आसक्ती, आणि भक्तीभावाने श्रवण, कीर्तन आणि भक्तीच्या विधिनियमांचे पालन करण्यास प्रारंभ करतो. याप्रमाणे मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. म्हणून भगवत्प्राप्तीकरिता केवळ भक्ती हाच ऐकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक साक्षात्काराकरिता, परम सत्याच्या निर्विशेष स्वरुपाची शिफारस करण्यात आली आहे. दुसर्या शब्दात सांगावयाचे तर, मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत लाभत नाही तोपर्यंतच निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरिता मनुष्य फलाशाविरहित कर्म करतो आणि चेतनतत्व आणि पदार्थाचे आकलन होण्याकरिता ज्ञानाचे अनुशीलन व ध्यान करतो. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्ताचा संग लाभत नाही तोपर्यंतच हे आवश्यक आहे. सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्णभावनेत संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारातील क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेतील मधल्या सहा अध्यायांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती ही अधिक अनुकूल आहे. मनुष्याने प्राणधारणाकरिता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत्कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात.
या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘भक्तियोग’ या बाराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.