TEXT 18
jyotiṣām api taj jyotis
tamasaḥ param ucyate
jñānaṁ jñeyaṁ jñāna-gamyaṁ
hṛdi sarvasya viṣṭhitam
ज्योतिषाम्—सर्व तेजस्वी वस्तूंमधील; अपि-सुद्धा; तत्-ते; ज्योतिः-प्रकाशाचा उगम; तमसः-अंधकार; परम्-पलीकडे; उच्यते-म्हटले जाते; ज्ञानम्-ज्ञान; ज्ञेयम्-ज्ञेय; ज्ञानगम्यम्-ज्ञानाने प्राप्त होणारे; हृदि-हृदयामध्ये; सर्वस्य-सर्वांच्या; विष्ठितम्-स्थित आहे.
सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे.
तात्पर्यः परमात्मा, पुरुषोत्तम भगवान हे सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे इत्यादी प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आहेत. वेदांमध्ये आपल्याला आढळून येते की, आध्यात्मिक जगतामध्ये चंद्र किंवा सूर्याची आवश्यकता नसते, कारण त्या ठिकाणी भगवंतांचे तेज असते. भौतिक जगतामध्ये ब्रह्मज्योती, अर्थात भगवंतांचे तेज हे महत् तत्त्वाने आवृत झालेले असते म्हणून प्रकाशाकरिता जगतात या गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते. वेदांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, भगवंतांच्या ज्योतीमुळेच सर्व काही प्रकाशित होते. म्हणून यावरून स्पष्ट आहे की, ते या प्राकृत जगतात स्थित नाहीत. ते आध्यात्मिक विश्वातील सर्वोच्च लोकामध्ये वास करतात आणि हे आध्यात्मिक विश्व अत्यंत दूर आहे. याची सुद्धा वेदांमध्ये पुष्टी करण्यात आली आहे, आदित्यवर्णं तमसः परस्तात् (श्वेताश्वतरोपनिषद् ३.८) ते सूर्याप्रमाणेच नित्य ज्योतिर्मय आहेत। आणि भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत.
त्यांचे ज्ञान दिव्य आहे. वेद सांगतात की, ब्रह्म म्हणजे केंद्रित दिव्य ज्ञान आहे. जो त्या आध्यात्मिक जगताची प्राप्ती करण्यास उत्सुक आहे त्याला हृदयस्थित भगवंत ज्ञान प्रदान करतात. एक वैदिक मंत्र सांगतो की, तहं देवम् आत्मबुद्धिप्रकाश मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये/ (श्वेताश्वतरोपनिषद् ६.१८) ज्याला मुक्तीची इच्छा आहे त्याने भगवंतांना शरण जाणे तमेव अत्यावश्यक आहे. ज्ञानाच्या अंतिम ध्येयाबद्दल सांगावयाचे तर, त्याबद्दल वेद सांगतात की, विदित्वति मृत्युमेति-(श्वेताश्वतरोपनिषद् ३.८) केवळ भगवंतांना जाणल्यानेच मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनापलीकडे जातो.
परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात परमनियंता म्हणून स्थित आहेत. परमेश्वराचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले आहेत; परंतु जीवासंबंधी असे म्हणता येत नाही. म्हणून क्षेत्राचे, आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असल्याचे मान्य केलेच पाहिजे. मनुष्याचे हात आणि पाय विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित असतात; परंतु श्रीकृष्णांचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले आहेत. याचे श्वेताश्वतरोपनिषद् (३.१७) मध्ये पुढीलप्रमाणे अनुमोदन करण्यात आले आहे, सर्वस्य प्रभुमीशानं सर्वस्य शरण बृहत् | ते परमात्मा भगवंत सर्व जीवांचे प्रभू आहेत. सर्व जीवांचे ते अंतिम आश्रयस्थान आहेत. म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे सदैव भिन्नच असतात हे सत्य नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.