No edit permissions for मराठी

TEXT 17

avibhaktaṁ ca bhūteṣu
vibhaktam iva ca sthitam
bhūta-bhartṛ ca taj jñeyaṁ
grasiṣṇu prabhaviṣṇu ca

अविभक्तम्-अविभक्त;-सुद्धा; भूतेषु-सर्व जीवांमध्ये; विभक्तम्-विभागलेले; इव-जणू काय; -सुद्धा; स्थितम्-स्थित; भूतभर्तृ -सर्व जीवांचे पालनकर्ता; -सुद्धा; तत्-ते; ज्ञेयम्-ज्ञेय, जाणण्यायोग्यः; ग्रसिष्णु-ग्रासणारे; प्रभविष्णु-उत्पन्न करणारे; -सुद्धा,

परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी, तोच सर्वांचा संहारकर्ताही असल्याचे जाणले पाहिजे.

तात्पर्य: भगवंत हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. याचा अर्थ ते विभक्त झालेले आहेत असा होतो का? नाही. वस्तुतः ते एकमेवाद्वितीय आहेत. याबाबतीत सूर्याचे उदाहरण दिले जाते. मध्यान्हसमयी सूर्य आपल्या स्थानी स्थित असतो. परंतु जर कोणी चारी दिशेला पाच हजार मैलांपर्यंत जाऊन विचारले की, 'सूर्य कुठे आहे?'तर प्रत्येकजण त्याला सांगेल की सूर्य हा त्याच्या डोक्यावर तळपत आहे. भगवंत जरी अविभक्त असले तरी ते जणू काय विभाजित झाल्याप्रमाणेच प्रतीत होतात, हे दर्शविण्यासाठी वेदांमध्ये हे सूर्याचे उदाहरण देण्यात आले आहे. वेदांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, ज्याप्रमाणे तोच सूर्य अनेक लोकांना अनेक ठिकाणी दिसतो त्याप्रमाणे श्रीविष्णू हे आपल्या सर्वशक्तिमत्वामुळे सर्वत्र उपस्थित आहेत आणि भगवंत जरी सर्व जीवांचे पालनकर्ता असले तरी प्रलयकाळी ते सर्वांचा संहार करतात. अकराव्या अध्यायात याला पुष्टी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की, 'कुरुक्षेत्रावर जमलेल्या सर्व योद्धयांचा संहार करण्याकरिता मी आलो आहे.' त्यांनी असेही म्हटले आहे की, काळाच्या रूपातही मी सर्वांचा विनाश करतो. भगवंत हेच त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलयकाळी तेच सर्वांचा संहार करतात. भगवंत हेच सर्व जीवांचे मूळ उगमस्थान आणि आश्रयस्थान असल्याच्या वस्तुस्थितीचे वेद अनुमोदन करतात. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर सर्व काही त्यांच्याच शक्तीवर आश्रित असते आणि प्रलयानंतर पुन्हा सर्वांचा विलय त्यांच्यामध्ये आश्रित होण्यासाठीच होतो. ही सर्व वेदांची प्रमाणे आहेत. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति तद्‌ब्रह्म तद्विजिज्ञासस्व (तैतिरीय उपनिषद् ३.१).

« Previous Next »