No edit permissions for मराठी

TEXT 19

iti kṣetraṁ tathā jñānaṁ
jñeyaṁ coktaṁ samāsataḥ
mad-bhakta etad vijñāya
mad-bhāvāyopapadyate

इति-याप्रमाणे; क्षेत्रम्-क्षेत्र (शरीर); तथा-सुद्धा; ज्ञानम्-ज्ञान; ज्ञेयम्-ज्ञेयः -सुद्धाः उत्तम्-वर्णन करण्यात आले आहे; समासतः-संक्षेपाने; मत्-भक्तः-माझा भक्त; एतत्-हे सर्व; विज्ञाय-जाणून घेतल्यावर; मत्-भावाय-माझ्या स्वभावाला; उपपद्यते-प्राप्त होतो.

याप्रमाणे क्षेत्र (देह), ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले, केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो.

तात्पर्य: भगवंतांनी संक्षेपाने शरीर, ज्ञान आणि ज्ञेय यांचे वर्णन केले आहे. हे ज्ञान तीन तत्त्वांचे असते.-ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानमार्ग. या तिघांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असे म्हणतात. अनन्य भगवद्भक्त प्रत्यक्षपणे परिपूर्ण ज्ञान जाणू शकतात. इतर हे जाणण्यात असमर्थ आहेत. अद्वैतवादी म्हणतात की, अंतिम अवस्थेत ही तिन्ही तत्वे एक होतात; परंतु भक्त याचा स्वीकार करीत नाही. आपले मूळ कृष्णभावनाभावित स्वरूप जाणणे म्हणजेच ज्ञानाचा विकास होय. आपण भौतिक भावनेने बद्ध झालो आहोत आणि जेव्हा आपण आपली सारी भावना अथवा चेतना कृष्णभावनमय कार्यामध्ये संलग्न करतो तेव्हा आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, भक्तियोगाला पूर्णत्वाने जाणण्याची पायरी म्हणजे ज्ञान आहे. पंधराव्या अध्यायात याचे स्पष्ट वर्णन करण्यात येईल.

          सारांश; मनुष्य जाणू शकतो की, महाभूतानि पासून प्रारंभ होणा-या आणि चेतनश्रुतिः। मध्ये शेवट होणा-या सहाव्या आणि सातव्या श्लोकामध्ये महाभूतांचे आणि जीवनाच्या व्यक्त होणा-या विशिष्ट लक्षणांचे वर्णन करण्यात आले आहे. यांच्या संयोगीकरणामुळे क्षेत्र बनते आणि अमानित्वम् पासून प्रारंभ होणा-या आणि तत्वज्ञानार्थ-दर्शनम् मध्ये अंत होणा-या ८ ते १२ श्लोकामध्ये, आत्मा आणि परमात्मा या दोन्ही क्षेत्रज्ञांना जाणण्याच्या ज्ञानमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर अनादि मत्परम् पासून प्रारंभ होणा-या आणि हृदि सर्वस्य विष्ठतम्‌  मध्ये अंत होणा-या १३ ते १८ व्या श्लोकामध्ये आत्मा आणि परमात्मा किंवा भगवंताचे वर्णन करण्यात आले आहे.

          याप्रमाणे तीन तत्त्वांचे वर्णन करण्यात आले आहे-क्षेत्र (शरीर), ज्ञानमार्ग आणि आत्मा व परमात्मा. या ठिकाणी विशेषकरून सांगण्यात आले आहे की, केवळ अनन्य भगवद्‌भक्तच या तीन तत्त्वांना यथार्थरूपाने जाणू शकतात. म्हणून भक्तांसाठी भगवद्गीता ही पूर्णपणे उपयुक्त असते; आणि त्यांनाच परमलक्ष्याची, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या स्वभावाची प्राप्ती होते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, केवळ भक्तच भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून इच्छित फल प्राप्त करू शकतात. इतरांना हे शक्य नाही.

« Previous Next »