TEXT 21
kārya-kāraṇa-kartṛtve
hetuḥ prakṛtir ucyate
puruṣaḥ sukha-duḥkhānāṁ
bhoktṛtve hetur ucyate
कार्य-कार्यांचे; कारण-आणि कारण; कर्तृत्वे-उत्पत्तीच्या बाबतीत; हेतुः-साधन किंवा कारण; प्रकृतिः-भौतिक प्रकृती; उच्यते-म्हटली जाते; पुरुषः-पुरुष; सुख-सुखाच्या; दुःखानाम् आणि दुःख; भोक्तृत्वे-भोगाला; हेतुः-कारण; उच्यते-म्हटली जाते.
प्रकृती ही सर्व भौतिक कार्य-कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.
तात्पर्य: जीवांची निरनिराळ्या प्रकारची शरीरे आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. जीवांच्या चौ-यांशी लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. त्या जीवाच्या निरनिराळ्या इंद्रियसुखाच्या कामनांमुळे निर्माण होतात आणि या प्रकारे तो कोणत्या ना कोणत्या तरी देहामध्ये वास करावयाची इच्छा करतो. जेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखदुःखे भोगतो. त्याच्या या भौतिक सुखदुःखांना तो स्वतः मुळीच कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत असते. त्याच्या मूळ स्थितीमध्ये नि:संशय आनंदच असतो, म्हणूनच ती त्याची स्वरूपस्थिती असते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या इच्छेमुळेच तो या भौतिक जगतामध्ये असतो. आध्यात्मिक जगतामध्ये अशा गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही. आध्यात्मिक जगत हे विशुद्ध आहे; परंतु या भौतिक जगतात निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुखे प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करीत आहेत. अधिक स्पष्टपणे म्हणता येईल की, हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे. इंद्रिये ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत. आता, शरीर आणि साधनरूप इंद्रिये ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात आणि पुढील श्लोकांवरून स्पष्ट होईल की, जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक अथवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते. मनुष्याच्या इच्छा आणि कर्मानुसार भौतिक प्रकृती त्याला विविध प्रकारची निवासस्थाने पुरविते. जीव स्वतःच अशा निवासस्थानाला आणि त्यापासून प्राप्त होणा-या सुख-दुःखास कारणीभूत असतो. एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो, कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते. त्या वेळी जीव प्राकृतिक नियम बदलण्याइतपत सामथ्र्यशाली नसतो. उदाहरणार्थ जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणे वागलेच पाहिजे. तो इतर काही करू शकत नाही आणि जर जीवाला डुकराचे शरीर प्राप्त झाले तर त्याला डुकराप्रमाणेच विष्ठा खाण्यास आणि वागण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे जर देवतांचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त शरीराला अनुसरूनच कार्य केले पाहिजे. हा प्रकृतीचा नियमच आहे. परंतु सर्व परिस्थितीत परमात्मा हा आत्म्याबरोबर असतोच. वेदामध्ये (मुण्डक उपनिषद् ३.१.१) याचे पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया: भगवंत जीवाच्या प्रति इतके कृपाळू असतात की, सर्व परिस्थितीत ते परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात.