No edit permissions for मराठी

TEXT 20

prakṛtiṁ puruṣaṁ caiva
viddhy anādī ubhāv api
vikārāṁś ca guṇāṁś caiva
viddhi prakṛti-sambhavān

प्रकृतिम्-भौतिक प्रकृती; पुरुषम्-जीव; -सुद्धा; एव-निश्चितपणे; विद्धि-तू जाणले पाहिजेस, अनादी-अनादी किंवा प्रारंभरहित, उभौ-दोन्ही, अपि-सुद्धा; विकारान्-स्थित्यंतरे; च-सुद्धा; गुणान्-त्रिगुण; -सुद्धा; एव-निश्चितपणे; विद्धि-जाण; प्रकृति-भौतिक प्रकृती, सम्भवान्-च्यापासून उत्पन्न.

भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात.

तात्पर्य: या अध्यायातील ज्ञानाने मनुष्य शरीर (क्षेत्र) आणि शरीराचे ज्ञाता (आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही क्षेत्रज्ञ) यांना जाणू शकतो. शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि ते भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे. देह धारण केलेला आणि देहाच्या कार्यांचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय. तो आणि परमात्मा असे दोन क्षेत्रज्ञ असतात. अर्थात, जीव आणि परमात्मा या भगवंतांच्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत. जीव म्हणजे भगवंतांचे शक्तितत्त्व आहे तर परमात्मा हा त्यांचा स्वांश आहे. 

          जीव आणि भौतिक प्रकृती दोघेही नित्य आहेत अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात होते. जीव आणि भौतिक सृष्टी दोघेही भगवंतांचीच शक्ती आहेत; परंतु जीव हे पराप्रकृतीमधील आहेत. हे जगत व्यक्त होण्यापूर्वीही जीव आणि भौतिक प्रकृती दोन्ही अस्तित्वात होते. भौतिक प्रकृतीचा पुरुषोत्तम भगवान महाविष्णूंमध्ये विलय होतो आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा महत्-तत्त्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते. त्याचप्रमाणे जीवही महाविष्णूंमध्येच असतात आणि ते बद्ध असल्याकारणाने भगवत्सेवेपासून विन्मुख असतात. यामुळे त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश दिला जात नाही. परंतु सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यावर त्यांना भौतिक जगतात कर्म करून वैकुंठलोकात प्रवेश करण्यास योग्य बनण्याची संधी दिली जाते. हेच भौतिक सृष्टीचे रहस्य आहे. वस्तुतः जीव हे भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहेत; परंतु विद्रोही स्वभावामुळे ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतात. भगवंतांचे अंश असणारे हे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात या गोष्टीला खरोखरी महत्त्व नाही. तथापि, जीव कसे आणि का भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात हे भगवंत जाणतात. शास्त्रांमध्ये भगवंत सांगतात की, जे भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होतात ते अस्तित्व राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत असतात. तथापि, या काही श्लोकांतील वर्णनावरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की, त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सारे विकार हे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात. जीवाचे सारे विकार आणि सारी वैविध्यताही शरीरामुळे प्रकट होते. आत्मतत्त्वाच्या दृष्टीने तर सारे जीव एकसारखेच आहेत.

« Previous Next »