No edit permissions for मराठी

TEXT 22

puruṣaḥ prakṛti-stho hi
bhuṅkte prakṛti-jān guṇān
kāraṇaṁ guṇa-saṅgo ’sya
sad-asad-yoni-janmasu

पुरुषः-जीव; प्रकृति-स्थः-भौतिक प्रकृतीमध्ये स्थित झाल्यामुळे; हि-निश्चितपणे; भुङ्‍क्ते - भोगतो, प्रकृति-जान्—प्रकृतीने उत्पन्न केलेले, गुणान्—प्राकृतिक गुण; कारणम्—कारण; गुणसङ्गः-गुणांचा संग; अस्य-जीवाच्या; सत्-असत्-चांगल्या आणि वाईट; योनि-योनी; जन्मसु-जन्मांमध्ये,

याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे-वाईट प्राप्त होते.

तात्पर्य: जीव एका देहातून दुस-या देहामध्ये कशा प्रकारे स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे. दुस-या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की, ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे बदलतो त्याचप्रमाणे जीव एका देहातून दुस-या देहामध्ये स्थित्यंतर करतो. भौतिक जीवनातील आसक्तीमुळे याप्रमाणे वस्त्रपरिवर्तन करावे लागते. जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एका देहामधून दुस-या देहामध्ये स्थित्यंतर करावेच लागते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागते. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधीकधी देवता, मनुष्य, पशू, पक्षी, कीटक, जलचर, संत व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो. हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की, आपण परिस्थितीवर मात केली आहे; परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो.

          जीवाला निरनिराळ्या प्रकारचे शरीर कसे प्राप्त होते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात  आले आहे. प्रकृतीच्या त्रिगुणांचा संग झाल्यामुळे त्याला असे देहांतर करणे भाग पडते. म्हणून मनुष्याने त्रिगुणातीत होऊन दिव्यावस्थेत स्थिर झाले पाहिजे. यालाच कृष्णभावना असे म्हणतात. जोपर्यंत मनुष्य, कृष्णभावनामय होत नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका देहातून दुस-या देहामध्ये स्थानांतर करण्यास बाध्य करते, कारण अनादी कालापासून त्याला भौतिक वासना असतात. तथापि, त्याने आपली ही संकल्पना बदलली पाहिजे. असे परिवर्तन प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केल्यानेच शक्य होते. याबाबतीत सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय. तो श्रीकृष्णांकडून भगवत् विज्ञान जाणून घेत आहे. जीवाने या प्रकारे जर श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची अनादी कालापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजविण्याची आपली इच्छा कमी कमी करतो त्या त्या प्रमाणात हळूहळू तो आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतो. वेदांमध्ये म्हटले आहे की, भगवंतांच्या सहवासात जसजसे त्याला ज्ञान प्राप्त होते तसतसा तो सच्चिदानंद जीवनाचा आस्वाद घेतो.

« Previous Next »