TEXT 5
ṛṣibhir bahudhā gītaṁ
chandobhir vividhaiḥ pṛthak
brahma-sūtra-padaiś caiva
hetumadbhir viniścitaiḥ
ऋषिभिः-ऋषींनी; बहुधा-बहुविध प्रकारे; गीतम्—वर्णन केले आहे; छन्दोभिः-छंदांनी, वैदिक मंत्रांनी; विविधे:-विविध; पृथक-विविध प्रकारे; ब्रह्म-सूत्र-वेदांताच्या; पदैः-सूत्रांद्वारे; च-सुद्धा; एव-निश्चितपणे; हेतु-मद्रि:-कारण आणि परिणामाद्वारे; विनिश्चितैः-निश्चित.
क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेषकरून हे ज्ञान, सर्व कारण-परिणामांसहित वेदांत-सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे.
तात्पर्य: या ज्ञानाचे वर्णन करण्यास भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहेत. तथापि विद्वान ज्ञानीजन आणि आदर्श अधिकारी व्यक्ती हे चालीरीतीप्रमाणे पूर्वाचार्यांचे प्रमाण देतात. वेदान्ताचे प्रमाण देऊन श्रीकृष्ण, आत्मा आणि परमात्मा यांच्या द्वैताद्वैताच्या विवादास्पद मुदयाचे वर्णन करीत आहेत. प्रथम ते म्हणतात की, 'विविध ऋषींच्या मते असे आहे.'ऋषींबद्दल सांगावयाचे तर, श्रीकृष्णांव्यतिरित व्यासदेव (वेदान्त सूत्रांचे संकलक) हे एक महान ऋषी आहेत आणि वेदान्त सूत्रांमध्ये द्वंद्वाचे परिपूर्ण स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी हे सुद्धा एक महान ऋषी आहेत. ते आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हणतात की, अहं त्वं च तथान्ये.-आपण, तुम्ही, मी आणि इतर सारे जीव जरी भौतिक देहामध्ये बद्ध असलो तरी दिव्यच आहोत. आपल्या कर्मानुसार आपण भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांनी प्रभावित झालो आहोत. म्हणून काहीजण उन्नतावस्थेत आहेत तर काहीजण खालच्या अवस्थेत आहेत. अज्ञानामुळे अशा उच्च-निम्न अवस्था अस्तित्वात असतात आणि असंख्य जीवांद्वारे त्या व्यक्त होतात. परंतु परमात्मा हा अच्युत, त्रिगुणातीत आणि दिव्य आहे. त्याचप्रमाणे मूळ वेदांमध्येही, विशेषकरून कठोपनिषदात आत्मा, परमात्मा आणि शरीरामधील भेद दर्शविण्यात आला आहे. अनेक महर्षीनी याचे विश्लेषण केलेले आहे आणि पराशर मुनींना त्यामध्ये प्रमुख मानण्यात येते.
छन्दोभिः हा शब्द विविध वैदिक ग्रंथ दर्शवितो. उदाहरणार्थ, यजुर्वेदाचाच भाग असणा-या तैत्तिरीय उपनिषदात प्रकृती, जीव आणि भगवान यांचे विवरण करण्यात आले आहे.
पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र हे जीवांचे कार्यक्षेत्र असते आणि क्षेत्रामध्ये, आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असतात. तैत्तिरीय उपनिषदात (२.९) म्हटले आहे की, ब्रह्मपुच्छ प्रतिष्ठा भगवंतांच्या शक्तीची एक प्रकटावस्था अन्नमय नावाने जाणली जाते. हे जाणणे म्हणजेच परम सत्याचा प्राकृतिक साक्षात्कार होय. नंतर परम सत्याची अन्नमयामध्ये अनुभूती झाल्यावर मनुष्य प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परम सत्याचा साक्षात्कार करू शकतो. ज्ञानमयस्तरामध्ये अनुभूतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो. त्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार होतो व त्याला विज्ञानमय असे म्हटले जाते आणि त्या साक्षात्कारामध्ये जीवाला कळून येते की, आपण आपल्या मन आणि प्राणापासून भिन्न आहोत. त्यानंतरची व परमोच्च अवस्था म्हणजे आनंदमय याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्काराच्या ब्रह्म पृच्छम्-या पाच अवस्था आहेत. या पाचपैकी प्रथम तीन अन्नमय, प्राणमय आणि ज्ञानमय या अवस्थांचा संबंध जीवाच्या क्षेत्राशी येतो. सर्व क्षेत्रांच्या पलीकडे परमेश्वर असतात आणि त्यांना आनंदमय असे म्हटले जाते. वेदांतसूत्रातही भगवंतांचे वर्णन आनन्दमयोऽभ्यासात्-असे करण्यात आले आहे. या दिव्य आनंदाचा अनुभव घेण्याकरिता ते स्वतःचा विज्ञानमय, प्राणमय, ज्ञानमय आणि अन्नमय यांमध्ये विस्तार करतात. क्षेत्रामध्ये जीवाला भोक्ता समजले जाते आणि आनंदमय हे त्याच्यापासून भिन्न असते. याचा अर्थ आहे की, जर जीवाने आनंदमयामध्ये संलग्न होऊन आनंद प्राप्त केला तरच जीव पूर्णत्व प्राप्त करतो. हेच भगवंतांचे परम क्षेत्रज्ञ म्हणून, जीवाचे गौण क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यांचे वास्तविक स्वरूप आहे. वेदान्त सूत्रे किंवा ब्रह्म सूत्रांमध्ये या सत्याचे अधिक विश्लेषण मनुष्याला प्राप्त होऊ शकते.
या ठिकाणी उल्लेख केला आहे की, कारण-परिणामांनुसार ब्रह्मसूत्रांची सुंदर रीतीने रचना करण्यात आली आहे. यापैकी काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. न वियदश्रुते. (२.३.२); नात्मा श्रुते. (२.३.१८) आणि परातु तच्छुते. (२.३.४०) प्रथम सूत्रामध्ये क्षेत्र, दुस-यामध्ये जीव आणि तिस-यामध्ये सर्व जीवांचे परम आश्रयस्थान भगवान यांचे वर्णन करण्यात आले आहे.