No edit permissions for मराठी

TEXT 1

śrī-bhagavān uvāca
paraṁ bhūyaḥ pravakṣyāmi
jñānānāṁ jñānam uttamam
yaj jñātvā munayaḥ sarve
parāṁ siddhim ito gatāḥ

 
श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; परम्-दिव्य; भूयः-पुन्हा; प्रवक्ष्यामि-मी सांगेन; ज्ञानानाम्-सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये; ज्ञानम्-ज्ञान; उत्तमम्-उत्तम, श्रेष्ठ; यत्—जे; ज्ञात्वा-जाणून; मुनयः--मुनिजन; सर्वे-सर्वः पराम्-दिव्य; सिद्धिम्-सिद्धी; इतः-या जगतातून; गता:-प्राप्त केले आहे.

श्रीभगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्वमुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे.

तात्पर्य: श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायापासून ते बाराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य, पुरुषोत्तम भगवंतांचे, विशद वर्णन केले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत. मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल. तेराव्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की, विनम्रभावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात? याचे भगवंत वर्णन करतात. या अध्यायांमध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात. हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषिमुनीनीं सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठलोकात प्रविष्ट झाले. आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत. आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञानमार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे. यावरून हे अपेक्षित आहे की, जो हा चौदावा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते.

« Previous Next »