No edit permissions for मराठी

TEXT 26

māṁ ca yo ’vyabhicāreṇa
bhakti-yogena sevate
sa guṇān samatītyaitān
brahma-bhūyāya kalpate

माम्-माझी; च-सुद्धा; यः-जो मनुष्य, अव्यभिचारेण-एकनिष्ठ किंवा न चुकता; भक्तियोगेन-भक्तियोगाद्वारे; सेवते-सेवा करतो; सः-तो, गुणान्-प्राकृतिक गुण, समतीत्यपलीकडे जाऊन; एतान्-हे सर्व; ब्रह्म-भूयाय-ब्रह्मस्तराप्रत उन्नत झालेला; कल्पते-होतो.

जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो.

तात्पर्य: दिव्यावस्था प्राप्त करण्याचे साधन कोणते? या अर्जुनाच्या तिस-या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा श्लोक आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे, भौतिक जगत हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करीत आहे. मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या क्रियांमुळे विचलित होऊ नये. अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतविण्यापेक्षा तो आपली भावना कृष्ण-कर्म करण्यामध्ये संलग्न करू शकतो. कृष्ण-कर्म म्हणजेच भक्तियोग किंवा सदैव श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करणे होय. यामध्ये केवळ श्रीकृष्णांचाच समावेश होत नाही तर राम, नारायण इत्यादी विस्तारित रूपांचाही समावेश होतो. श्रीकृष्णांची असंख्य विस्तारित रूपे आहेत. श्रीकृष्णांच्या कोणत्याही रूपाच्या अथवा विस्तारित रूपाच्या सेवेमध्ये जो संलग्न होतो तो दिव्यावस्थेत स्थित असल्याचे मानले जाते. मनुष्याने जाणले पाहिजे की, श्रीकृष्णांची ही सर्व रूपे पूर्ण सच्चिदानंदमयी आणि दिव्य आहेत. भगवंतांची अशी ही रूपे सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असतात आणि त्यांच्याकडे सर्व दिव्य गुण असतात. म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले तरी मनुष्य जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून पार पडतो. कृष्णभावनाभावित असणे किंवा भक्तिपरायण असणे म्हणजे श्रीकृष्णांशी समानता प्राप्त करणे होय. भगवंत सांगतात की, माझे स्वरूप सच्चिदानंद आहे आणि सोने हे सोन्याच्या खाणीचे अंश असते त्याचप्रमाणे जीवही भगवंतांचे अंश आहेत. अशा रीतीने जीव आपल्या आध्यात्मिक स्वरुपस्थितीत गुणात्मकदृष्ट्या सोन्याप्रमाणेच, अर्थात श्रीकृष्णांप्रमाणेच असतात.व्यक्तिगत स्वरूपाचे भिन्नत्व हे नित्यच असते अन्यथा भक्तियोगाचा प्रश्नच उद्भवला नसता. भक्तियोग म्हणजे भगवंत, भक्त आणि त्यांचे परस्परांतील प्रेमाचे आदानप्रदान होय. म्हणून भगवंत आणि जीव या दोघांचीही आपापली स्वरूपे आहेत. तसे जर नसते तर भक्तियोगाला काहीच अर्थ राहिला नसता. जर मनुष्य भगवंतांप्रमाणेच समान दिव्य स्तरामध्ये स्थित झाला नाही तर तो भगवंतांची सेवा करू शकत नाही. राजाचा वैयक्तिक साहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता मिळणे आवश्यक आहे आणि ही पात्रता म्हणजेच ब्रह्म होणे किंवा सर्व भौतिक विकारांतून मुक्त होणे होय. वेदांमध्ये म्हटले आहे की, ब्रह्मैव सन्ब्रह्माप्येति मनुष्य ब्रह्म होऊन परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ आहे की, मनुष्याने गुणात्मकदृष्ट्या ब्रह्माशी एकरूप झाले पाहिजे. ब्रह्मप्राप्ती झाल्यावर तो आपले जीवात्मा म्हणून ब्रह्मस्वरूप गमावत नाही.

« Previous Next »