No edit permissions for मराठी

TEXT 27

brahmaṇo hi pratiṣṭhāham
amṛtasyāvyayasya ca
śāśvatasya ca dharmasya
sukhasyaikāntikasya ca

ब्रह्मणः-निर्विशेष ब्रह्मज्योतीचे; हि-निश्चितपणे; प्रतिष्ठा-आश्रयस्थान; अहम्-मी आहे; अमृतस्य- अमर्त्य किंवा अमृत; अव्ययस्य-अव्ययाचे; -सुद्धा; शाश्वतस्य-शाश्वत;- आणि; धर्मस्य-स्वरूप स्थितीचे किंवा वैधानिक स्थितीचे; सुखस्य-सुखाचे; ऐकान्तिकस्य -परम; -सुद्धा.

आणि, परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणार्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे.

तात्पर्य: ब्रह्माचे स्वरूप हे अमृत, अव्ययी, शाश्वत आणि सुखमय आहे. दिव्य साक्षात्काराचा प्रारंभ ब्रह्मापासूनच होतो. दिव्य साक्षात्काराचा मध्यभाग, अर्थात दुसरी पायरी म्हणजे परमात्मा आहे आणि पुरुषोत्तम भगवान म्हणजे अंतिम पायरी आहे. म्हणून परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्ही परमपुरुषावर आश्रित आहेत. सातव्या अध्यायात वर्णन करण्यात आले आहे की, भौतिक प्रकृती ही भगवंतांच्या अपरा शक्तीची अभिव्यकती आहे. भगवंत, कनिष्ठ अपरा प्रकृतीमध्ये परा प्रकृतीच्या अंशांना गर्भस्थ करतात आणि याप्रमाणे अपरा प्रकृतीशी परा प्रकृतीचा संपर्क येतो. भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ करतो तेव्हा तो भौतिक बद्धावस्थेपासून क्रमशः परमेश्वराच्या ब्रह्मरूप स्तराप्रत उन्नत होतो. जीवनातील या ब्रह्मस्तराची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी होय. या स्तरावरील ब्रह्म-साक्षात्कारी पुरुष हा भौतिक उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो; परंतु तो वास्तविकपणे ब्रह्मसाक्षात्कारात परिपूर्ण नसतो. त्याच्या इच्छेनुसार तो ब्रह्मस्तरावरच स्थिर राहू शकतो आणि त्यानंतर हळूहळू परमात्मा-साक्षात्काराप्रत उन्नत होऊ शकतो आणि त्यानंतर पुरुषोत्तम भगवान रूपाच्या साक्षात्काराची प्राप्ती करू शकतो. या संदर्भातील अनेक उदाहरणे वेदांमध्ये आढळतात. चतुष्कुमार हे ब्रह्मसाक्षात्कारी होते; परंतु क्रमाक्रमाने ते भक्तिस्तराप्रत उन्नत झाले, जो निर्विशेष ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचे पुन्हा पतन होण्याची संभावना असते. श्रीमद्भागवतात म्हटले आहे की, मनुष्य जरी ब्रह्मस्तरावर आरूढ झाला तरी जर त्याने अधिक उत्तरोत्तर प्रगती केली नाही आणि परमपुरुषाचे ज्ञान प्राप्त केले नाही तर त्याची बुद्धी पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मस्तरावर आरूढ होऊन सुद्धा जर मनुष्य भगवद्भक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे पतन होण्याचीच शक्यता असते. वेदांमध्येही म्हटले आहे की, रसो वै सः रस ह्यवायं लब्ध्वानन्दी भवति-जेव्हा मनुष्य रसराज भगवान श्रीकृष्णांना जाणतो तेव्हा तो वास्तविकपणे दिव्यानंदी होतो (तैत्तिरीय उपनिषद् २.७.१). भगवंत हे षड्रेश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि भक्त जेव्हा त्यांना शरण जातो तेव्हा या षड्रेश्वर्यांचे आदानप्रदान होते. राजाचा सेवक जवळजवळ राजाच्याच दर्जाचा उपभोग घेतो. म्हणून शाश्वत सुख, अविनाशी आणि शाश्वत-जीवन भक्तीबरोबरच प्राप्त होते. म्हणून ब्रह्माचा किंवा नित्यत्व किंवा अविनाशी यांच्या साक्षात्काराचा भक्तीमध्ये समावेश होतो. जो भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याला हा साक्षात्कार आधीच झालेला असतो.

          स्वभावतः जीव हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा असते आणि यास्तव त्याचे पतन होते. आपल्या स्वरूपस्थितीमध्ये जीव त्रिगुणातीत असतो; परंतु भौतिक प्रकृतीच्या संगाने तो त्रिगुणांमध्ये बद्ध होतो. या त्रिगुणांच्या संगामुळे, त्याच्यामध्ये प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा ही राहतेच. पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तात्काळ दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची त्याची अवैध इच्छा नष्ट होते. म्हणून श्रवण, कीर्तन, स्मरण आदीपासून प्रारंभ होणा-या भक्तियोगाचा भक्तांच्या संगामध्ये अभ्यास केला पाहिजे. हळूहळू अशा सत्संगामध्ये, आध्यात्मिक गुरूच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची इच्छा नाहीशी होते आणि तो दृढपणे दिव्य प्रेममयी भगवत्सेवेमध्ये स्थिर होतो. या विधींचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या बाविसाव्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे. भगवद्भक्ती अत्यंत सुलभ आहे. मनुष्याने सदैव भगवत्सेवेमध्ये युक्त राहावे, भगवत्प्रसाद ग्रहण करावा, भगवंतांच्या चरणकमलांना अर्पिलेल्या फुलांचा सुगंध घ्यावा, भगवंतांनी लीलास्थळांना भेट द्यावी, त्यांच्या विविध लीलांविषयी अध्ययन करावे, भगवंत आणि त्यांच्या भक्तांमधील प्रेमाच्या आदानप्रदानाबद्दल श्रवण करावे, सदैव दिव्य हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम राम राम हरे हरे/महामंत्राचा जप करावा आणि भगवंत व त्यांच्या भक्तांच्या आविर्भाव अथवा तिरोभाव दिनी उपवास करावा. अशा विधींचे पालन केल्याने मनुष्य सर्व भौतिक कर्मातून पूर्णपणे अनासक्त होतो. जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो, तो गुणात्मकदृष्ट्या भगवंतांच्या समानच असतो.

या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘‘गुणत्रयविभागयोग’ या चौदाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous