TEXT 9
śrotraṁ cakṣuḥ sparśanaṁ ca
rasanaṁ ghrāṇam eva ca
adhiṣṭhāya manaś cāyaṁ
viṣayān upasevate
श्रोत्रम्-कान; चक्षुः-नेत्र; स्पर्शनम्-स्पर्श; च-सुद्धा; रसनम्-जिह्वा; घ्राणम्-घ्राणशक्ती; एव-सुद्धा; च-आणिः; अधिष्ठाय-स्थित होऊन; मनः-मन; च-सुद्धा; अयम्-हा; विषयान्-इंद्रियविषय;उपसेवते-भोग घेतो.
अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र,जिह्वा नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियविषय समूहाचा उपभोग घेतो.
तात्पर्य: हेच दुसर्या शब्दांत सांगावयाचे तर, जीवाने आपली भावना, कुत्र्यामांजरांच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या-मांजराच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो. चेतना ही मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे. परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो. त्याचप्रमाणे चेतनाही शुद्धच असते, कारण आत्मा हा शुद्ध असतो. परंतु भौतिक गुणांच्या संगानुसार चेतनेतही बदल होतो. वास्तविक भावना ही केवळ कृष्णभावनाच असते. म्हणून मनुष्य जेव्हा कृष्णभावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते. तथापि, जर त्याची चेतना कोणत्या तरी भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो. त्याला पुन्हा मनुष्याचेच शरीर मिळेल असे नाही; कुत्रा, मांजर, डुक्कर, देवता किंवा चौ-यांशी लाख योनींपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते.