No edit permissions for मराठी

TEXTS 1-3

śrī-bhagavān uvāca
abhayaṁ sattva-saṁśuddhir
jñāna-yoga-vyavasthitiḥ
dānaṁ damaś ca yajñaś ca
svādhyāyas tapa ārjavam

ahiṁsā satyam akrodhas
tyāgaḥ śāntir apaiśunam
dayā bhūteṣv aloluptvaṁ
mārdavaṁ hrīr acāpalam

tejaḥ kṣamā dhṛtiḥ śaucam
adroho nāti-mānitā
bhavanti sampadaṁ daivīm
abhijātasya bhārata

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; अभयम्-निर्भयता; सत्त्व-संशुद्धिः-सत्वशुद्धी किंवा जीवनशुद्धी, ज्ञान-ज्ञानामध्ये; योग-संबंधित होण्याच्या; व्यवस्थितिः-स्थिती; दानम्—दान; दमः-मनाचे संयमन; -आणि; यज्ञः-यज्ञ; -आणि; स्वाध्यायः-वेदाध्ययन; तपः-तपस्या; आर्जवम्-सरळपणा; अहिंसा-अहिंसा; सत्यम्-सत्य; अक्रोधः-क्रोधमुक्तता; त्यागः-त्याग; शान्तिः-शांती; अपैशुनम्-दोष काढण्यापासून तिटकारा असणे; दया-दया; भूतेषु-सर्व जीवांच्या प्रति; अलोलुप्त्वम्-लोभातून मुक्तता; मार्दवम्-सौम्यता; ह्रीः-विनयशीलपणा; अचापलम्-दृढता; तेजः-तेज, उत्साह; क्षमा-क्षमा; धृति:-धैर्य; शौचम्-पावित्र्य; अद्रोहः-निर्मत्सरता; -नाही; अति-मानिता-मानाची अपेक्षा; भवन्ति-आहेत; सम्पदम्-गुण; दैवीम्-दिव्य स्वभाव; अभिजातस्य-जन्मलेल्या; भारत-हे भारत.

श्रीभगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्त्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण, हे भारता!दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात.

तात्पर्य: पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी करण्यात आली आहे. नवव्या अध्यायामध्येही देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले आहे. वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्त्वगुणी कर्माना शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्षपथावर प्रगती करतात. याउलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करीत आहेत त्यांना मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही. त्यांना एक तर या भौतिक जगतात मनुष्यप्राणी म्हणून राहावे लागते अथवा पशुयोनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. या सोळाव्या अध्यायामध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि आसुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोहोंचे वर्णन करतात. त्यानी या गुणांच्या लाभ-हानींचाही निर्देश केला आहे.

          दैवी गुणांनी युक्त असा जन्म प्राप्त झालेल्या संदर्भात योजिलेला अभिजातस्य हा शब्द सारगर्भित आहे. दैवी वातावरणात मुलाला जन्म देणे याला शास्त्रांमध्ये गर्भाधान संस्कार असे म्हटले जाते. जर मातापित्यांना दैवी गुणयुक्त मूल हवे असेल तर त्यांनी मनुष्याच्या सामाजिक जीवनासाठी घालून दिलेल्या दहा तत्वांचे पालन केले पाहिजे. भगवद्गीतेतही आपण पूर्वी पाहिले आहे की, सद्गुणी मुलाला जन्म देण्याकरिता केलेले धर्मसंमत मैथुन म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत. कृष्णभावनेकरिता जर कामजीवनाचा सदुपयोग केला तर ते कामजीवन निषिद्ध नाही. जे कृष्णभावनामय आहेत त्यांनी तरी निदान कुत्र्यामांजरांप्रमाणे प्रजोत्पादन करू नये. जन्मानंतर मुलाला कृष्णभावनाभावित बनविण्यासाठीच त्यांनी प्रजोत्पादन करावे. कृष्णभावनेमध्ये तल्लीन  झालेल्या मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला हा लाभ प्राप्त झाला पाहिजे.

          मानवी समाजाचे जन्मानुसार विभागीकरण करणे हा वर्णाश्रमधर्माचा उद्देश नाही. वर्णाश्रमधर्मातील विभाग हे शैक्षणिक पात्रतेनुसार आहेत. मानवसमाजाला सुखसमृद्ध ठेवण्यासाठी ते विभाग करण्यात आले आहेत. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या गुणांचे वर्णन दैवी गुण असे करण्यात आले आहे व हे गुण मनुष्याने आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करून या भौतिक जगातून मोक्षप्राप्ती करावी यासाठी आहेत.

          वर्णाश्रम धर्मामध्ये संन्याशाला सर्व वर्णाचा आणि आश्रमांचा प्रमुख किंवा आध्यात्मिक गुरू मानण्यात येते. ब्राह्मणाला, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाचा आध्यात्मिक गुरू मानण्यात येते; परंतु वर्णाश्रमाचा प्रमुख असणारा संन्यासी हा ब्राह्मणांचाही आध्यात्मिक गुरू असतो. संन्याशांसाठी सर्वप्रथम आवश्यक गुण म्हणजे निर्भयपणा होय. संन्याशाला विनाआश्रय एकटेच राहावे लागते, त्याला केवळ भगवत्‌कृपेवर विसंबून राहावे लागते. जर मनुष्याला वाटत असेल की, 'मी सर्वसंगपरित्याग केल्यावर माझे रक्षण कोण करील? तर त्याने संन्यास स्वीकारू नये. मनुष्याला पूर्ण दृढ विश्वास असला पाहिजे की, भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयात उपस्थित आहेत, ते सर्व काही पाहात आहेत आणि मनुष्य काय करू इच्छितो हे सुद्धा ते जाणतात. मनुष्याला पुरी खात्री पटली पाहिजे की, श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने त्यांना शरणागत झालेल्या जीवात्म्यांची काळजी घेतात. मनुष्याला वाटले पाहिजे की,  'मी         कधीच एकटा नसेन, मी जरी घनदाट अरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे संरक्षण करतील.' या दृढ निश्चयालाच अभयम् असे म्हटले आहे. संन्यासाश्रमी मनुष्याची मनोवृत्ती अशी असणे आवश्यक आहे.

     नंतर त्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे. संन्यासाश्रमात पालन करावयाची अनेक विधिविधाने आहेत. यांपैकी सर्वांत महत्वपूर्ण म्हणजे संन्याशाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. त्याच्यासाठी एकांतवासात स्त्रीशी बोलणे देखील निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे एक आदर्श संन्यासी होते आणि म्हणून जेव्हा त्यांचे जगन्नाथपुरीला वास्तव होते तेव्हा त्यांच्या स्त्रीभक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळपासही जाऊ शकत नव्हत्या. त्यांना दुरुनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे. हे काही स्त्रीजातीबद्दलच्या द्वेषभावनेचे लक्षण नव्हे तर, स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्याशाला घालून देण्यात आलेला नियम आहे. मनुष्याने स्वतःच्या जीवनशुद्धकरिता आपापल्या आश्रमांच्या विधिविधानांचे पालन केले पाहिजे. संन्याशांसाठी स्त्रियांशी निकट संबध ठेवणे आणि इंद्रियतृप्तीकरिता धनसंचय करणे पूर्णतया निषिध्द आहे. श्री चैतन्य महाप्रभू  हे स्वत: आदर्श संन्यासी होते. आपण त्यांच्या जीवनचरित्रावरून पाहू शकतो की, स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे आचरण अतिशय कडक असे. अत्यंत पतित जीवांचा असले तरी, स्त्रियांशी आचरण करण्याबाबतच्या संन्यासाश्रमाच्या नियमांचे ते कठोरपणे पालन करीत असत. श्री चैतन्य महाप्रभूचा छोटा हरिदास नामक एक पार्षद होता आणि तो महाप्रभूच्या बरोबर इतर अंतरंगा पार्षदांसमवेत संग करीत असे. परंतु कोणत्या तरी कारणाने छोटा हरिदासने एका तरुण स्त्रीकडे कामवासनेने पाहिले. श्री चैतन्य महाप्रभू इतके कडक शिस्तीचे होते की, त्यांनी छोटा हरिदासची आपल्या निकटस्थ पार्षदांच्या सहवासातून तात्काळ हकालपट्टी केली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, 'संन्यासी असो वा कोणीही असो, ज्याला भवबंधनातून सुटण्याची उत्कट इच्छा आहे आणि जो आध्यात्मिक स्तरावर स्वतःची उन्नती करून स्वगृही, भगवद्धामात प्रवेश करू इच्छितो, त्याने इंद्रियतृप्तीकरिता भौतिक संपत्तीचा आणि स्त्रियांचा उपभोग तर घेऊच नये, एवढेच काय पण त्यांच्याकडे तशा वृत्तीने पाहताही कामा नये. कारण अशा कामुक दृष्टीने त्यांच्याकडे केवळ पाहणे देखील इतके निंद्य आहे की, अशी कुवासना उत्पन्न होण्यापूर्वी त्याने आत्महत्या करणे अधिक बरे होईल.' याप्रमाणे हे सारे शुद्धीकरणाचे विधी आहेत.

          पुढील गुण ज्ञानयोगेन व्यवस्थिति-म्हणजे ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न असणे हा आहे. संन्यासी जीवन हे गृहस्थांना आणि ज्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या वास्तविक जीवनाचे विस्मरण झाले आहे त्यांना ज्ञानप्रसार करण्यासाठी आहे. संन्याशाने आपल्या उदरनिर्वाहार्थ दारोदारी भिक्षा मागितली पाहिजे; परंतु याचा अर्थ असा नाही की, तो भिकारी आहे. दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा नम्रता हा सुद्धा एक गुण आहे आणि केवळ नम्रता म्हणूनच तो दारोदारी माधुकरी मागण्यासाठी न जाता गृहस्थांना प्रबुद्ध करण्याकरिता आणि त्यांना कृष्णभावनेचा प्रचार करण्याकरिता जातो. हे संन्याशांचे कर्तव्य आहे. जर तो वास्तविकपणे प्रगत असेल आणि त्याला आध्यात्मिक गुरूचा आदेश असेल तरच त्याने सबळ  शास्त्रप्रमाणांसहित आणि ज्ञानासहित कृष्णभावनेचा प्रचार करावा. जर तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्याने संन्यासाश्रमाचा स्वीकार करू नये. मनुष्याने पुरेशा ज्ञानाअभावी जरी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला असेल तरी त्याने ज्ञानाचे अनुशीलन करण्याकरिता अधिकृत आध्यात्मिक गुरूकडून श्रवण करण्यात पूर्णतया संलग्न झाले पाहिजे. संन्याशांकडे अभय, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग हे गुण असणे अत्यावश्यक आहे.

          दान हा पुढील गुण आहे. दान हे विशेषतः गृहस्थाश्रमीयांकरिता आहे. गृहस्थांनी आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नापैकी पन्नास टके उत्पन्नाचा विनियोग जगभर कृष्णभावनेच्या प्रसाराकरिता करावा. अशा रीतीने ज्या संस्था कृष्णभावनेच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत त्या संस्थांना गृहस्थांनी दान द्यावे. योग्य व्यक्तीलाच दान देण्यात यावे. सत्वगुणी दान, रजोगुणी दान आणि तमोगुणी दान असे दानाचे विविध प्रकार आहेत आणि याचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. सत्त्वगुणी दान हे शास्त्रसंमत आहे, परंतु रजोगुणी व तमोगुणी दान हे शास्त्रसंमत नाही कारण हा धनाचा केवळ अपव्यय आहे. कृष्णभावनेचा संपूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठीच केवळ दान देण्यात यावे आणि हेच सत्वगुणी दान होय.

          दम (आत्मसंयम) या गुणाबाबतीत सांगावयाचे तर आत्मसंयम हा केवळ इतर आश्रमीयांकरिताच आहे असे नव्हे तर तो विशेषकरून गृहस्थाश्रमीयांकरिता आहे. गृहस्थाला पत्नी असली तरी त्याने आपल्या इंद्रियांचा अनावश्यक मैथुनाकरिता उपयोग करू नये. कामजीवनाच्या बाबतीत गृहस्थांवर सुद्धा बंधने आहेत. त्याने केवळ प्रजोत्पादन करण्याकरिताच मैथुन करावे. जर त्याला संतती नको असेल तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करू नये. आधुनिक समाज मुलांची जबाबदारी टाळण्यासाठी गर्भप्रतिबंधक किंवा त्याहूनही निंद्य अशा साधनांचा उपयोग करतो आणि कामजीवनाचा अनिर्बंध उपभोग घेतो. हा दैवी गुण नसून आसुरी गुण आहे. जर मनुष्याला, मग तो गृहस्थही का असेना, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर त्याने संभोगजीवन संयमित केले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरिता मुलांना जन्म देता कामा नये. कृष्णभावनाभावित होऊ शकतील अशा मुलांना जर मनुष्य जन्म देऊ शकत असेल तर तो शेकडो मुलांनाही जन्म देऊ शकतो. परंतु अशी योग्यता नसेल तर त्याने केवळ इंद्रियतृप्तीकरिता संभोग करू नये.

          गृहस्थांनी करावयाचे आणखी एक साधन म्हणजे यज्ञ होय, कारण यज्ञ करण्याकरिता विपुल प्रमाणात धनाची आवश्यकता असते. ब्रह्माचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील इतर लोकांकडे धन नसते. त्यांना भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करावयाचा असतो. म्हणून विविध यज्ञ करणे हे गृहस्थांसाठी संमत आहे. वेदामध्ये गृहस्थांकरिता अग्निहोत्र हा यज्ञ सांगण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत असा यज्ञ करणे हे अत्यंत खर्चीक आहे आणि हा यज्ञ करणे कोणत्याही गृहस्थासाठी शक्य नाही. या युगातील सर्वोत्तम यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ होय. हा संकीर्तन यज्ञ हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम राम राम हरे हरे/ या महामंत्राचा कीर्तनाने होतो. हा यज्ञ अतिश स्वस्त आहे. कोणही हा यज्ञ करून त्यायोगे लाभप्राप्ती करू शकतो. म्हणून दान, आत्मसंयम आणि यज्ञकर्म हे तीन गुण गृहस्थांसाठी आहेत.

          स्वाध्याय किंवा वेदाध्ययन हे ब्रह्मचा-यांसाठी आहे. ब्रह्मचा-याचा स्त्रीशी मुळीच संबंध असू नये. त्यांनी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनाकरिता आपले मन वेदांचे अध्ययन करण्यामध्ये संलग्न करावे. यालाच स्वाध्याय असे म्हटले जाते.

          तपस्या ही विशेषकरून निवृत्त जीवनासाठी आहे. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमी राहू नये. तर त्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की, जीवनाचे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम आहेत. म्हणून गृहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे. जर मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षांचे असेल तर त्याने पंचवीस वर्षे ब्रह्मचारी, पंचवीस वर्षे गृहस्थ, पंचवीस वर्षे वानप्रस्थ आणि उर्वरित पंचवीस वर्षे संन्यासाश्रमात व्यतीत करावी. हे वैदिक धार्मिक अनुशासनाचे नियम आहेत. गृहस्थाश्रमातून निवृत्त झालेल्या मनुष्याने शरीर, मन आणि जिह्म यांचे तप केले पाहिजे. हीच तपस्या होय. संपूर्ण वर्णाश्रम धर्म हा तपस्या करण्याच्या दृष्टीने रचण्यात आला आहे. तपस्येविना मोक्षप्राप्ती करता येत नाही. जीवनात तपस्येची आवश्यकता नाही आणि मनुष्याने तर्क करणे चालू ठेवावे म्हणजे सर्व काही ठीक होईल ही कल्पना वेदांमध्ये आणि भगवद्गीतेतही सांगितलेली नाही. अशी मते, अधिकाधिक अनुयायी गोळा करण्याच्या मागे लागलेल्या तथाकथित दिखाऊ अध्यात्मवाद्यांनी निर्माण केली आहेत. कारण त्यांना वाटते की, काही बंधने, नियम, विधिविधाने जर ठेवली तर लोक आपल्याकडे आकृष्ट होणार नाहीत. म्हणून केवळ दिखाव्याकरिता ज्यांना धर्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करण्याची इच्छा असते ते आपल्या शिष्यांच्या तसेच स्वत:च्या जीवनावरही निर्बंध घालत नाहीत. परंतु हा सर्व प्रकार वेदसंमत नाही.

          आर्जवम अर्थात, सरळपणा या ब्राह्मणांच्या गुणाच्या बाबतीत सांगावयाचे तर हा गुण विशिष्ट आश्रमातील लोकांनीच अंगी बाणावावा असे नाही तर प्रत्येक व्यक्तीने तो अंगी बाणविला पाहिजे, मग तो ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी असो. मनुष्याने सरळ आणि निःस्पृह असावे.

          अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. त्याने विचार करू नये की, शरीराच्या हत्येनंतरही आत्मा हा कधीच मारला जात नाही म्हणून इंद्रियतृप्तीकरिता पशूची हत्या करण्यात काहीच भेद नाही. धनधान्य, फळफळावळे, दूधदुभत्याचा विपुल पुरवठा असूनही आजकाल लोक मांसाहार करण्याच्या अधीन झाले आहेत. पशुहत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही. हा आदेश सर्वांकरिताच आहे जेव्हा दुसरा काहीच पर्याय नसतो तेव्हा मनुष्य पशुवध करू शकतो, पण तो पशूही यज्ञार्पणच करावा. कसेही असले तरी मानवसमाजासाठी विपुल प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा असताना जे लोक आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांनी पशूची मुळीच हिंसा करू नये. वास्तविक अहिंसा म्हणजे, कोणाच्याही प्रगतीला प्रतिबंध करू नये. एका पशुयोनीतून दुस-या पशुयोनीत असे उत्क्रांती करणारे पशूदेखील उन्नतीच करीत आहेत. जर एखाद्या विशिष्ट प्राण्याचा वध केला तर त्याची प्रगती रोखली जाते. जर एखादा पशू विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये अमुक दिवस आणि अमुक अमुक वर्षासाठी राहात आहे आणि अकालीच जर त्याला मारले गेले तर, दुस-या योनीमध्ये उत्क्रांतीत होण्यासाठी त्याच प्रकारच्या देहात पुन्हा येऊन उर्वरित दिवसांचा अवधी त्याला पूर्ण करावा लागतो. म्हणून स्वत:च्या जिह्मलौल्याला शमविण्याकरिता पशृंच्या उत्क्रांतीला प्रतिबंध करू नये. हीच अहिंसा होय.

          सत्यम् अर्थात, मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरिता सत्याचे विकृतीकरण करू नये. वैदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत परंतु त्यांचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरुककडून शिकले पाहिजे. वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे. श्रुति म्हणजे मनुष्याने प्रमाणित व्यक्तींकडून श्रवण केले पाहिजे. मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये. भगवद्गीतेच्या मूळ आशयाचा अनर्थ करणारी अनेक भाष्ये आहेत. शब्दांचा वास्तविक आशय प्रस्तुत केला पाहिजे आणि हे प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडून शिकले पाहिजे.

          अक्रोध म्हणजे क्रोधसंयमन करणे होय. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे, कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध हा रजोगुणाचा व कामवासनेचा परिणाम आहे. म्हणून जो दिव्यावस्थेत स्थित आहे त्याने स्वत:ला क्रोधापासून आवरले पाहिजे. अपैशुनम् म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहू नये किंवा विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये. अर्थात, एखाद्या चोराला चोर म्हणणे म्हणजे काही अपराध नव्हे; परंतु जो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो त्याने एखाद्या प्रामाणिक मनुष्याला चोर म्हणणे ही अत्यंत अपराधपूर्ण गोष्ट आहे. हृी म्हणजे मनुष्याने विनयशील असावे आणि कोणतेही घृणास्पद कार्य करू नये. अचापलम् अर्थात, दृढनिश्चय म्हणजे मनुष्याने आपल्या प्रयत्नात कधीही क्षुब्ध किंवा वैफल्यग्रस्त होऊ नये. कोणताही प्रयत्न करताना अपयश येऊ शकते, पण मनुष्याने त्यामुळे खिन्न होऊन जाऊ नये. त्याने धैर्याने आणि दृढनिश्चयाने प्रगती केली पाहिजे.

          या ठिकाणी योजिलेला तेजस्‌ हा शब्द क्षत्रियांकरिता आहे. दुर्बलांना अभय देण्यास समर्थ होण्या इतपत क्षत्रियांनी बलशाली असेल पाहिजे. आपण अहिंसक आहोत असे त्यांनी कधीच दाखवू नये. हिंसेची आवश्यकता असल्यास त्यांनी हिंसा करण्यास तयार असले पाहिजे. परंतु जो मनुष्य आपल्या शत्रूचे दमन करू शकत असेल तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकती. तो लहानसहान अपराधांना क्षमा करू शकती.

          शौचमू या शब्दाचा अर्थ मन, शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असा आहे. व्यापा-यांनी काळाबाजार करू नये, म्हणून विशेष करून हा गुण आहे. नातिमानिता-अर्थात, मानाची अपेक्षा न करणे. हा गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वांत खालच्या दर्जाच्या शूद्र लोकांसाठी आहे. त्यांनी व्यर्थ प्रतिष्ठेने किंवा मानाने फुगून जाऊ नये आणि आपल्या दर्जाला अनुरूप असेच राहावे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शूद्रांनी उच्च वर्णातील लोकांचा आदर करावा हे त्यांचे कर्तव्य आहे.

          या ठिकाणी वर्णन केलेले सर्व सव्वीस गुण हे दिव्य गुण आहेत. विविध वर्ण आणि आश्रमांनुसार या गुणांचे अनुशीलन करण्यात यावे. सारांश हाच आहे की, भौतिक परिस्थिती जरी दुःखकारक आणि प्रतिकूल असली तरी सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांच्या अभ्यासाद्वारे विकास केला तर ते हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तराप्रत प्रगत होऊ शकतात.

« Previous Next »