No edit permissions for मराठी

TEXT 8

asatyam apratiṣṭhaṁ te
jagad āhur anīśvaram
aparaspara-sambhūtaṁ
kim anyat kāma-haitukam

असत्यम्-असत्य; अप्रतिष्ठम्-निराधार; ते-ते; जगत्-प्राकृत सृष्टी; आहुः-म्हणतात; अनीश्वरम्-ईश्वरावाचून, अपरस्पर-कारणरहित; सम्भूतम्—उत्पन्न झाले आहे; किम् अन्यत्— इतर कोणतेही कारण नाही; काम-हैतुकम्-केवळ कामामुळे. 

ते म्हणतात की, हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही.

तात्पर्य: असुरांचा निष्कर्ष आहे की, हे जगत म्हणजे केवळ एक भ्रम किंवा आभास आहे. याच्या उत्पत्तीस काहीच कार्य कारण, नियंत्रक, प्रयोजन इत्यादी काही कारण नाही, सर्व काही असत्य आहे. ते म्हणतात की, प्राकृत सृष्टीची उत्पत्ती काही विशिष्ट आकस्मिक क्रियाप्रतिक्रियांमुळे होते. परमेश्वराने विशिष्ट हेतूकरिता या सृष्टीची रचना केली आहे असे त्यांना वाटत नाही. त्यांचा सृष्टीच्या उत्पत्तीचा स्वतःचा सिद्धांत असतो; ते म्हणतात की, जगाची आपोआप उत्पत्ती झाली आहे आणि या जगाच्या पाठी परमेश्वर आहे असे म्हणण्यास काहीच कारण नाही. ते जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद मानीत नाहीत तसेच ते परमात्म्याच्या अस्तित्वाचाही स्वीकार करीत नाहीत. सर्व काही केवळ पदार्थच आहे आणि संपूर्ण विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे. त्यांच्या मतानुसार सर्व काही शून्यच आहे आणि आपण जे वैविध्य पाहात आहोत ते केवळ अज्ञानवशच पाहात आहोत. ते निश्चितपणे मानतात की, या सृष्टीतील वैविध्य म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शनच आहे. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत आपण अनेक गोष्टींची निर्मिती करतो; परंतु वस्तुतः अशा गोष्टी मुळीच अस्तित्वात नसतात म्हणून ज्या वेळी आपण जागृत होतो तेव्हा पाहतो की, सर्व काही स्वप्नच होते. वास्तविकपणे असुर जरी म्हणत असले की, जीवन हे केवळ स्वप्नच आहे तरी या स्वप्नाचा उपभोग घेण्यात ते अतिशय तरबेज असतात आणि म्हणून ज्ञानप्राप्ती करण्याऐवजी ते अधिकाधिक आपल्या स्वप्नसृष्टीमध्ये गुरफटत जातात. त्यांचा निष्कर्ष असतो की, ज्याप्रमाणे मुलाचा जन्म केवळ स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगाने होतो त्याप्रमाणे हे जगतही आत्मतत्त्वविरहितच उत्पन्न झाले आहे. त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थाच्या संयोगानेच जीवांची निर्मिती झाली आहे आणि आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याप्रमाणे घामापासून आणि मृत शरीरातून काहीही कारण नसताना अनेक जीव बाहेर येतात त्याप्रमाणे भौतिक सृष्टीतील पदार्थाच्या संयोगातून सर्व सजीव प्राण्यांची निर्मिती झाली आहे. म्हणून या अभिव्यक्तींचे कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे आणि याव्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की, याध्यक्षेण प्रकृति सूयते संचराचरम्‌ माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करीत आहे. या श्रीकृष्णांच्या वचनावर त्यांची श्रद्धा नसते. दुस-या शब्दात सांगावयाचे तर, असुरांना या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे परिपूर्ण ज्ञान नसते. प्रत्येक आसुरी व्यक्तीचा स्वत:चा असा एक सिद्धांत असतो. त्यांच्या दृष्टीने एक शास्त्रार्थ दुस-या शास्त्रार्थाइतकाच प्रमाणभूत असतो कारण शास्त्रांचा एकच प्रमाणभूत असा अर्थ असतो हे त्यांना मान्य नाही.

« Previous Next »