TEXT 9
etāṁ dṛṣṭim avaṣṭabhya
naṣṭātmāno ’lpa-buddhayaḥ
prabhavanty ugra-karmāṇaḥ
kṣayāya jagato ’hitāḥ
एताम्-हीः दृष्टिम्-दृष्टी; अवष्टभ्य-स्वीकारून; नष्ट-नष्ट: आत्मानः-स्वत:च; अल्पबुद्धयः-अल्पबुद्धी; प्रभवन्ति-भरभराट; उग्र-कर्माण:-उग्र कर्म करण्यात संलग्न झालेले; क्षयाय-विनाशाकरिता; जगतः-जगताच्या; अहिता:-अहितकारक.
अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी, आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात.
तात्पर्य: जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले असतात. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की, आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणा-या भौतिकवादी लोकांना वाटते की, आपण प्रगती करीत आहोत; परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत. ते भौतिक जगताचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रियतृप्तीकरिता ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. अशा प्रकारचे भौतिक शोध करणे म्हणजे मानवसमाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते. तथापि, अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशू आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत. एकमेकांशी कसा व्यवहार करावा याची त्यांना जाण नाही. आसुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात. अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते, कारण शेवटी ते अशा गोष्टींचा शोध लावतील किंवा अशी गोष्ट निर्माण करतील, त्यामुळे सर्वांचाच विनाश होईल. अप्रत्यक्षपणे या श्लोकांमध्ये आण्विक शस्त्रास्त्रांच्या संशोधनाची पूर्वसूचनाही दिली नाही आणि आता संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रास्त्रांचा अत्यंत गर्व आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल आणि आण्विक स्फोटके सर्व काही उद्ध्वस्त करू शकतील. अशा गोष्टी केवळ जगताच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात आणि हेच या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. आसुरी वृत्तीमुळे मानवसमाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे; ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाहीत.