No edit permissions for मराठी

TEXT 10

kāmam āśritya duṣpūraṁ
dambha-māna-madānvitāḥ
mohād gṛhītvāsad-grāhān
pravartante ’śuci-vratāḥ

कामम्-काम; आश्रित्य-आश्रय घेऊन; दुष्पूरम्-अतृप्त; दम्भ-दंभ; मान-मान; मद अन्विता:-मदाने युक्त; मोहात्-मोहामुळे; गृहीत्वा-घेऊन; असत्-असत्य किंवा अनित्य, ग्राहान्-गोष्टी; प्रवर्तन्ते-त्यांची भरभराट होते; अशुचि-अपवित्रता; व्रताः-व्रतस्थ.

कधीही तृप्त न होणा-या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत, मोहित झालेले आसुरी लोक, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात.

तात्पर्य: आसुरी मनोवृत्तींचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. आसुरी लोक आपल्या कामवासनेने कधीही तृप्त होत नाहीत. विषयोपभोग घेण्यासाठी ते आपल्या कधी तृप्त न होणा-या इच्छांना एकसारखे वाढवीत असतात. क्षणभंगुर गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे ते सदैव जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते अशी कर्मे करीतच राहतात. आपण चुकीच्या दिशेने  मार्गक्रमण करीत आहोत याचे त्यांना मुळी ज्ञानही नसते आणि याबद्दल ते काही सांगूही शकत नाहीत, अनित्य गोष्ठींचा स्वीकार करून असे आसुरी लोक स्वत:च एका परमेश्वराची निर्मिती करतात आणि स्वनिर्मित मंत्रांचे उच्चारण करतात. परिणामत: ते लैंगिक भोग आणि धनसंचय या दोन गोष्टींकडे अधिकाधिक आकर्षित होतात. या संदर्भात अशुचि-व्रता: हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे. असे आसुरी लोक मदिरा, मदिराक्षी, द्यूत आणि मांसाहाराकडे आकर्षित होतात आणि याच त्यांच्या अशुचिर्भूत सवयी असतात. अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने उन्मत झाल्यामुळे ते वेदाशी असहमत असणा-या तथाकथित धर्माचा पुरस्कार करतात. असे लोक जरी जगामधील अत्यंत धृणास्पद लोक असले तरी जग त्यांचा कृत्रिमपणे मिथ्या मानसन्मान करते. ते जरी नरकाच्या दिशेने धावत असले तरी त्यांना वाटते की आपण खूप प्रगती करीत आहोत.

« Previous Next »