No edit permissions for मराठी

TEXT 1

arjuna uvāca
ye śāstra-vidhim utsṛjya
yajante śraddhayānvitāḥ
teṣāṁ niṣṭhā tu kā kṛṣṇa
sattvam āho rajas tamaḥ

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; ये-जे; शास्त्र-विधिम्-शास्त्रविधी; उत्सृज्य-त्याग करून; यजन्ते—पूजतातः श्रद्धया-पूर्ण श्रद्धेने; अन्विताः-युक्त; तेषाम्-त्यांची; निष्ठा-निष्ठा; तु-परंतु:का-काय; कृष्ण-हे कृष्ण; सत्त्वम्-सत्वगुणामध्ये; आहो—अन्यथा; रजः-रजोगुणी; तमः-तमोगुणी.

अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण! जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते सत्त्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात?

तात्पर्य: चौथ्या अध्यायाच्या एकोणचाळिसाव्या श्लोकात म्हटले आहे की, विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत होतो आणि शांतीसमृद्धीच्या परम सिद्धीला प्राप्त होतो. सोळाव्या अध्यायात म्हटले आहे की, जो शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाही, त्याला असुर म्हटले जाते आणि जो श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन करतो, त्याला देवता म्हटले जाते. आता, जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रांमध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती जाणावी या अर्जुनाच्या शंकेचे निरूपण श्रीकृष्णांनी करावयाचे आहे. जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात, ते सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी आहेत. अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्ती होते काय? वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वत:ची परमोच्च सिद्धावस्थेप्रत उन्नती करणे त्यांना शक्य आहे का? जे लोक शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाहीत, परंतु ज्यांची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवदेवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते काय? हे सर्व प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांपुढे मांडीत आहे.

« Previous Next »