No edit permissions for मराठी

TEXT 4

yajante sāttvikā devān
yakṣa-rakṣāṁsi rājasāḥ
pretān bhūta-gaṇāṁś cānye
yajante tāmasā janāḥ

यजन्ते-पूजतात; सात्त्विकाः--सत्त्वगुणी; देवान्-देवता; यक्ष-रक्षांसि-राक्षस; राजसाः रजोगुणी; प्रेतान्-प्रेत; भूत-गणान्-भूतगण; -आणि; अन्ये-इतर; यजन्ते-पूजतात; तामसाः-तमोगुणी; जनाः—लोकः,

सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात.

तात्पर्य: या श्लोकात भगवंतांनी निरनिराळ्या प्रकारच्या उपासकांचे त्यांच्या बाह्य कृतीवरून वर्णन केले आहे. शास्त्रनियमानुसार केवळ भगवंतच पूजनीय आहेत. ज्यांची शास्त्रावर श्रद्धा नाही किंवा जे शास्त्रपारंगत नाहीत ते आपल्या प्राकृतिक गुणातील विशिष्ट स्थितीला अनुसरून विविध प्रतीकांची उपासना करतात. जे सत्वगुणी असतात, ते सामान्यत: देवतांची उपासना करतात. देवतांमध्ये ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्यदेव इत्यादींचा समावेश होतो. अनेक देवदेवता आहेत. सत्वगुणी मनुष्य विशिष्ट देवतेची विशिष्ट हेतूप्रीत्यर्थ उपासना करतात. त्याचप्रमाणे जे रजोगुणी आहेत ते राक्षसांची उपासना करतात. आमच्या लक्षात आहे की, दुस-या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करीत होता, कारण युद्धामुळे काळाबाजार करून त्याने पुष्कळ धन कमाविले होते. त्याचप्रमाणे रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य साधारणत: शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात. त्यांना वाटते की, कोणाचीही परमेश्वर म्हणून पूजा करता येते आणि त्यामुळे परमेश्वराला पूजिल्याने होणारीच फलप्राप्ती होते.

          आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की, जे रजोगुणी आहेत ते अशा कल्पित परमेश्वरांची निर्मिती करतात व त्यांची उपासना करतात आणि जे तमोगुणी आहेत ते भुताखेतांची उपासना करतात. कधी कधी लोक थडग्यांची पूजा करतात. मैथुन सेवेलाही तमोगुणी मानण्यात येते. त्याचप्रमाणे भारतातील दूरच्या खेड्यांमधील लोक भुतांची उपासना करतात. आम्ही भारतात पाहिले आहे की, कनिष्ठ जातीतले लोक कधी कधी अरण्यात जातात आणि त्यांना जर माहीत असेल की, एखाद्या विशिष्ट झाडात भूत आहे तर ते त्या झाडाची पूजा करतात व बळी अर्पण करतात. या विविध प्रकारच्या उपासना म्हणजे वास्तविकपणे परमेश्वराची उपासना नव्हे. जे दिव्य विशुद्ध सत्त्वामध्ये स्थित झाले आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराची आराधना आहे. श्रीमद्भागवतात (४.३.२३) म्हटले आहे की, सत्त्वं विशुद्धं वसुदेव-शब्दितम्- ‘'जेव्हा मनुष्य शुद्ध सत्त्वामध्ये स्थित होतो तेव्हा तो वासुदेवांचे पूजन करतो.' तात्पर्य हे आहे की, जे त्रिगुणांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत आणि ज्यांनी दिव्यत्वाची प्राप्ती केली आहे ते भगवंतांची उपासना करू शकतात.

          निर्विशेषवाद्यांना सत्वगुणी मानले जाते आणि ते पाच प्रकारच्या देवतांची उपासना करतात. ते भौतिक जगातील निराकार विष्णुरूपाची पूजा करतात व हे रूप कल्पिलेले असते. श्रीविष्णू हे भगवंतांचे विस्तारित रूप आहेत; परंतु निर्विशेषवाद्यांचा भगवंतांवर विश्वास नसल्यामुळे त्यांना वाटते की, विष्णुरूप म्हणजे निर्विशेष ब्रह्माचेच एक दुसरे रूप आहे. त्याचप्रमाणे ते कल्पना करतात की, ब्रह्मदेवही भौतिक रजोगुणी निर्विशेष रूप आहे. अशा रीतीने ते कधी कधी पाच प्रकारच्या आराध्य देवतांचे वर्णन करतात, परंतु त्यांना वाटते की, निर्विशेष ब्रह्म हे वास्तविक परम सत्य आहे. म्हणून ते सर्व उपास्य देवदेवतांचा अंततः त्याग करतात. निष्कर्ष, दिव्य स्वभावयुक्त मनुष्यांचा संग केल्याने भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांचे शुद्धीकरण करता येते.

« Previous Next »