No edit permissions for मराठी

TEXT 3

sattvānurūpā sarvasya
śraddhā bhavati bhārata
śraddhā-mayo ’yaṁ puruṣo
yo yac-chraddhaḥ sa eva saḥ

सत्त्व-अनुरूपा-जीवनास अनुरूप; सर्वस्य-सर्वांचे; श्रद्धा-श्रद्धा; भवति-होते; भारत-हे भारताः श्रद्धा-श्रद्धा; मयः-पूर्ण अथवा युक्तः अयम्-हे; पुरुषः-जीव; यः-जो; यत्-असल्यावर; श्रद्धः-श्रद्धा; सः--याप्रमाणे; एव-निश्चितच; सः-तो.

हे भारता! विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते.

तात्पर्य: मनुष्य हा कसाही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते. परंतु त्याने प्राप्त केलेल्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक, राजसिक अथवा तामसिक मानली जाते. अशा रीतीने तो आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट लोकांशी संग करतो. परंतु पंधराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळतः भगवंतांचा अंश आहे. म्हणून स्वरूपतः जीव हा त्रिगुणातीत असतो. मनुष्याला जेव्हा भगवंतांशी असणा-या आपल्या संबंधाचे विस्मरण होते व जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वत:चे अलग असे स्थान निर्माण करतो. परिणामत: प्राप्त होणारी श्रद्धा आणि अस्तित्व (जीवन) हे केवळ भौतिकच असते. मनुष्याला जरी काही धारणा किंवा जीवनविषयक कल्पना असल्या तरी मूळतः तो निगुण अर्थात त्रिगुणातीत असतो. म्हणून भगवंतांशी आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मनुष्याला प्राप्त भौतिक विकारांतून मुक्त झाले पाहिजे. भगवद्धामात परत जाण्याचा कृष्णभावना हाच निर्भय मार्ग आहे. जर मनुष्य कृष्णभावनेत स्थित झाला तर त्या मार्गाद्वारे त्याची मोक्षप्राप्ती सुनिश्चित होते. जर त्याने आत्मसाक्षात्काराच्या या मार्गाचा स्वीकार केला नाही तर तो निश्चितच त्रिगुणांद्वारे प्रभावित होईल.

          या श्लोकातील श्रद्धा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. श्रद्धेचा उद्‌भव मूलतः सत्त्वगुणापासून होतो. मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक परमेश्वरावर अथवा मानसिक तर्कवादावर असू शकते. मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उत्पन्न होते; परंतु भौतिक बद्धावस्थेत कोणतेच कर्म पूर्णतया शुद्ध असू शकत नाही. ती कर्मे मिश्र स्वरूपाची असतात व शुद्ध सत्वगुणयुक्त नसतात. विशुद्ध सत्त्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंतांचे वास्तविक स्वरूप जाणू शकतो. जोपर्यंत मनुष्याची श्रद्धा पूर्णपणे विशुद्ध सत्वगुणाने युक्त होत नाही, तोपर्यंत ती श्रद्धा त्रिगुणांपैकी कोणत्याही गुणाद्वारे प्रदूषित होऊ शकते. हे प्रदूषित प्राकृतिक गुण हृदय व्यापून टाकतात. म्हणून विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या संपर्कात असणा-या हृदयाच्या स्थितीनुसार मनुष्याची श्रद्धा दृढ होते. जर मनुष्याचे अंत:करण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धाही सत्वगुणीच असते हे जाणले पाहिजे. जर त्याचे अंत:करण रजोगुणी असेल तर त्याची श्रद्धाही रजोगुणी असते आणि जर त्याचे अंत:करण तमोगुणी असेल तर त्याची श्रद्धाही तमोगुणाने प्रदूषित झालेली असते. अशा रीतीने जगामध्ये आपल्याला विविध प्रकारची श्रद्धा आढळते आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्मही आढळतात. वास्तविक धर्माची श्रद्धा ही विशुद्ध सत्त्वामध्ये स्थित असते; परंतु आपले हृदय कलुषित असल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारची धर्मतत्त्वे आढळतात. याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना आहेत.

« Previous Next »