TEXT 7
āhāras tv api sarvasya
tri-vidho bhavati priyaḥ
yajñas tapas tathā dānaṁ
teṣāṁ bhedam imaṁ śṛṇu
आहार:-आहार; तु-निश्चितच; अपि-सुद्धा; सर्वस्य-सर्वांचा; त्रि-विध:-तीन प्रकारचा; भवति-असतो; प्रियः-प्रिय; यज्ञः-यज्ञ; तपः-तपस्या; तथा-सुद्धा; दानम्-दान; तेषाम्-त्यांचे; भेदम्-भेद; इमम्-हे; श्रृणु-ऐक.
प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही तीन प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक.
तात्पर्य: निरनिराळ्या प्राकृतिक गुणांना व स्थितींना अनुसरून आहार, यज्ञ, तप आणि दान यांचेही निरनिराळे प्रकार आहेत. या सर्व क्रिया एकाच स्तरावर होत नसतात. जे योग्य विश्लेषणाद्वारे कोणत्या प्रकारची क्रिया कोणत्या प्राकृतिक गुणामध्ये केली जाते हे जाणू शकतात तेच बुद्धिमान होय. जे सर्व प्रकारचे यज्ञ, आहार किंवा दान एकच समजतात त्यांना विवेकशक्ती नसते व ते मूखच असतात. मनुष्याने स्वेच्छेनुसार काहीही केले तरी सिद्धी प्राप्त होते, असे म्हणणारे काही प्रचारक आहेत. परंतु असे हे मूख प्रचारक शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार प्रचार करीत नाहीत, ते स्वकपोलकल्पित मार्ग निर्माण करीत आहेत आणि सामान्य लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत.