TEXT 2
śrī-bhagavān uvāca
kāmyānāṁ karmaṇāṁ nyāsaṁ
sannyāsaṁ kavayo viduḥ
sarva-karma-phala-tyāgaṁ
prāhus tyāgaṁ vicakṣaṇāḥ
श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; काम्यानाम्-आशेसहित; कर्मणाम्-कर्माच्या; न्यासम्-त्याग; सन्यासम्-संन्यास आश्रम; कवयः--विद्वज्जन; विदुः-जाणतात; सर्व-सर्व; कर्म-कर्माचे; फल-फळ; त्यागम्-त्यागाला; प्राहुः-म्हणतात; त्यागम्-त्याग; विचक्षणाः-अनुभवी जन.
श्रीभगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात.
तात्पर्य: फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे. भगवद्गीतेचा हा उपदेश आहे. परंतु ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते ती कर्मे सोडून द्यावयाची आवश्यकता नाही. पुढील श्लोकात हे अधिक स्पष्ट होईल. वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणा-या यज्ञांची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे. चांगली पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वर्गलोकांची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टींकरिता यज्ञ सांगण्यात आले आहेत; परंतु अशा सकाम यज्ञांचा त्याग केला पाहिजे. तथापि, स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरिता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरिता जे यज्ञ असतात त्यांचा त्याग करू नये.