No edit permissions for मराठी

TEXT 63

iti te jñānam ākhyātaṁ
guhyād guhya-taraṁ mayā
vimṛśyaitad aśeṣeṇa
yathecchasi tathā kuru

इति-याप्रमाणे; ते-तुला; ज्ञानम्-ज्ञान; आख्यातम्-वर्णिले आहे; गुह्यात्-गुह्याहूनही; गुह्यतरम्-अधिक गुह्य; मया-मी; विमृश्य-विचार करून; एतत्-यावर; अशेषेण-पूर्णपणे; यथा-जसे; इच्छसि-इच्छेला येईल; तथा-तसे; कुरु-कर.

याप्रमाणे मी तुला अत्यधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर.

तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला यापूर्वीच ब्रह्म-भूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे. जो मनुष्य ब्रह्म-भूत अवस्थेत असतो तो सदैव आनंदी असतो. तो कधी शोकही करीत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते. हे गुह्यज्ञानामुळे घडते. श्रीकृष्णांनी परमात्म्याचेही ज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे. हे ज्ञान देखील ब्रह्मज्ञान होय, परंतु हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे.

          या श्लोकामधील यथेच्छसि तथा कुरू-तुझ्या इच्छेस येईल ते कर, हे शब्द दर्शवितात की, परमेश्वर हा जीवांच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टींनी भगवद्गीतेत केले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश होय. सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करून मनुष्याने परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे. यामुळे तो सदैव कृष्णभावनाभावित राहू शकतो. कृष्णभावनेची प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची परमोच्च परिपूर्ण अवस्था होय. अर्जुनाला साक्षात भगवंतच युद्ध करण्याचा आदेश देत आहेत. भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही. शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे या सर्वोत्तम विषयाचा विचार करण्यास मनुष्य स्वतंत्र आहे. भगवंतांचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच मार्ग आहे. असा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असणा-या आध्यात्मिक गुरूकडूनही प्राप्त होतो.

« Previous Next »